रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By

स्त्री भृणाचा आक्रोश मांडणारा काव्यसंग्रह - आक्रोश लेखणीचा

‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ असे म्हटले जाते. शब्द कवीला स्वस्थ बसू देत नाहीत. म्हणून शब्दाला शब्द जोडत गेले की, कविता निर्माण होते असे ही नाही. शब्दाला आकार देत आशय सौंदर्याचं नवं शिल्प घडविण्याचं काम कवीला करावं लागतं. कविता लिहिण्यास प्रारंभ केल्यावर प्रत्येक कवी प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलण्यासच प्रथम प्राधान्य देतो. अनामिक प्रेयसीला, सखीला मनात साठवून शब्दकुंचल्याने तिचे चित्र रेखाटण्यातच धन्यता वाटू लागते. प्रेम या अडीच अक्षराच्या वर्तुळातच तो फिरू लागतो. वर्तुळाच्या परिघाबाहेरही जग आहे याची जाणीव जेव्हा त्याला होते तेव्हा समाज मनाला गृहीत धरून अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे, समाज प्रबोधन करण्याकडे त्याचा काळ दिसू लागतो. प्रेयसीच्या प्रेमात ‘सैराट’ झालेल्या मनामध्ये समाज जागृतीची ‘झिंग’ आणण्याचे काम करणे हे म्हणावे तितके सोपेही नसते. पण ही झिंग चढली की, ‘झिंगाट’ झालेले कवी मन ‘तराट’ होवून एकेका विषयांवर, प्रश्नांवर आसूड ओढू लागते. समाजातील सलणा-या विकृतींवर फटके मारत घोंगावणा-या भयाण वादळाला थोपविण्याचे, शांत करण्याचे प्रयत्न करू लागते.
 
शेख हकीम मन्नुभाई अर्थात अब्दुल हकीम (अंबड) यांचे कविमन हे याच प्रकारातले. प्रेम कविता करण्यापेक्षा समाजातील प्रश्नांवर परखडपणे लिहिण्याचे धाडस त्यांनी केले आहे. स्त्री - पुरुष समानता पाहिजे असे म्हणणा-या एकविसाव्या शतकातल्या स्त्री पुढे ‘स्त्री भृणहत्या’ हा ज्वलंत प्रश्न फार मोठे संकट बनून समोर आले आहे. या प्रश्नाला जबाबदार कोण? हा प्रश्नच सर्वांना अंतर्मुख करावयास लावणारा आहे. स्त्रीचे अस्तित्व नाकारण्याचे, कळीला जन्म द्यायचे नाही हे धाडस कोण करतो आहे? समाजातील प्रत्येक जण यासाठी कारणीभूत आहेच. स्त्री भृण जन्माला आल्यानंतर होणारा नात्यांचा गोतावळा आज तिला जन्मापूर्वीच मारून टाकण्याचा विचार करतो आहे. सर्व नात्यांमध्ये असणारी पुरुष आणि स्त्री ही दोन नातीच तिचा कर्दनकाळ बनली आहेत.
 
एकीकडे मुलींची संख्या घटत असून निसर्ग चक्र चालणार कसे? अशी ओरड करायची आणि दुसरीकडे स्त्रीयांना पन्नास टक्के आरक्षण हवे म्हणून आंदोलनेही करायची ही दुय्यम भूमिका समाजाने स्वीकारली आहे. या समाजात आपणही एक घटक आहोत हे आपण जाणून बुजून सोयीस्करपणे विसरलो आहोत की, विसरण्याचे नाटक करीत आहोत? याचा विचार करणे गरजेचे बनले आहे. कवी अब्दुल हकीम यांनी या विचारला एक प्रकारे गती देण्याचे काम केले आहे. स्त्री भृणहत्या या एकाच विषयांवर वारंवार मत मांडत असतांना त्यात एकसुरीपणा कोठेच जाणवत नाही. त्यापेक्षा या विषयावरील त्यांची पकड आणि प्रभुत्वच अधोरेखीत होते हे विशेष म्हणावे लागेल. त्यांच्या प्रत्येक कवितेमधून, लिखाणामधून वेगळा विचार देण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणूनच कौतुकास्पद ठरतो. स्त्री भृणहत्येचा विषय अतिशय तडपेने मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मनातील दु:ख, वेदना, चीड यांचा ‘आक्रोश’ लेखणीच्या माध्यमातून समाज मनाची ‘चौकट’ मोडून वेशीपर्यंत आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत. या छोट्याशा प्रयत्नातून एक जरी स्त्री भृणहत्या टाळली गेली तर मला मिळालेला तो सर्वात मोठा पुरस्कार असेल असे कवी अब्दुल हकीम म्हणतात. या शब्दांतून, या भावनांतून कवीची, अब्दुल हकीम यांची या प्रश्नासंदर्भातली तळमळ दिसून येते.
 
‘आक्रोश लेखणीचा’ या काव्यसंग्रहाला सुरुवात करतांना स्त्री भृणहत्येला प्रत्यक्षात जबाबदार असणा-या ‘डॉक्टर’ या महत्वाच्या घटकालाच प्रथम विनवण्याचे काम कवी अब्दुल हकीम यांनी केले आहे. आई ‘मुलगी’ होती म्हणून डॉक्टर तुमचा जन्म झाला आहे, तेव्हा भृणहत्या न करणा-यांचे आभार माना, असा सल्ला टे डॉक्टरला देत आहेत. पन्नास टक्के आरक्षणाच्या माध्यमातून देशात महिलाराज असतांना सायना, सानिया, कल्पना, सुनिता आदींनी अवकाशही कवेत घेतले असतांना ‘ती जिंकतेच जन्मल्यावर सदा नेहमी, फक्त पोटातील लढाई तिने का हरावी?’ असा प्रश्न विचारून एक मोठी शोकांतिकाही व्यक्त करतात.
 
आईचे पोट मसणवाट झाली असून अनेक चिमुरड्यांची राजरोस रोज कत्तल होत आहे. अशा वेळी कवीचे हळहळणारे मन या निष्पाप मुलींना लेखणीद्वारे या प्रश्नावर जमेल तेवढे प्रहर करण्याची हमी देतो. ‘आक्रोश करते लेखणी माझी, मी लेखणीची तलवार करतो,’ असा विश्वासही देतो.
 
‘मी काय म्हणतो, ऐकलंय का?’ या कवितेत कवी अतिशय जहाल भाषेत समाजाला फटकारतो आहे. ‘मुलीवर मत्सर असतांना बरं, देवी तरी मानावी कशाला?’ असा रोखठोक सवाल तो करतो. ‘पूजा करताय मूर्तीची तर प्रतिकासही माना आधी’ हा सल्ला तो देतो आहे.
 
‘लढा’ या कवितेत कवीने भृणहत्या विरोधातील लढा कसा असावा यावर भाष्य केले आहे. मंदिर, दर्ग्यात प्रवेश मिळाला अथवा मिडीयाच्या लख्ख कॅमे-यासोबत ही लढाई लढून जिंकता येणार नाही असे त्याचे स्पष्ट मत आहे. ‘ज्या ठिकाणी आई - बापच रक्त पिपासू झालेले असतील, तिथे लढाई साधी सुधी असेल काय?’ हा मोठा प्रश्न तो समाजाला विचारतो आहे.
 
कवी ‘सिंधुजी’ या उपहासात्मक कवितेत मल्लेश्वरी, मेरी, सायना, सानिया यांचे सारखे यश पाहूनही लोक आंधळे होतात, सिंधूची कीर्ती ऐकून बहिरे होतात अशा वेळी माझ्या सारख्या हकीमाकडूनही यावर इलाज, उपचार होत नाहीत अशी खंत व्यक्त करतो. आपले गुणगान करणारे मुलगाच हवा असा हट्ट का धरतात? हा सिंधुजींना पडलेला प्रश्न आपणालाही सुन्न करतो. हे वास्तव तो मान्य करतो.   
 
मुलींच्या व्यथा मांडतांना कवी अब्दुल हकीम हे नि:शब्द, निराश होतात. व्यथित आणि अगतिक होतात. हैवानापेक्षा भयानक मानव जातीत आपण जगतोय याची त्याला लाज वाटते. आपण काहीच करीत नसल्याचे शल्य त्याच्या मनाला छिन्न करते. तेव्हा कवितेतीलच एक मुलगी कवीला बिनधास्त लिहिण्याचा सल्ला देते, पण त्याच वेळी कवीला त्याचाही पानसरे, कलबुर्गी होण्याची भीती वाटते की, ‘काका तुमच्याही घरात आहे एखादी दफनभूमी?’ असा प्रश्न विचारून भृणहत्येचा विषय येताच नि:शब्द का होता? हा बोचणारा सवाल करून कवीची अगतिकता दाखवूनही देते.
 
अशा वेळी कवी कन्या जन्माचे स्वागत, जगू द्या तिला अशा कवितेतून प्रश्नाला सहजपणे स्पर्श करणा-या चारोळ्या, द्विपात्री बाल नाट्याच्या माध्यमातून स्त्री जन्म हे जगासाठी वरदान असल्याचे स्पष्ट करतो.
 
‘लढतो, लढणार निष्पाप मुलींनो
बघा होईल बदल आपोआप मुलींनो
शब्दांशब्दात मी रोज मांडतोय हेच
की तुम्ही वरदान, नाही शाप मुलींनो...’
 
या ओळीतून पुन्हा पुन्हा लढण्याची जिद्दही तो दाखवितो.
 
कानडगाव, तालुका - अंबड, जिल्हा - जालना येथील रहिवाशी  आणि झोडेगाव ग्रामपंचायतीमध्ये संगणक परीचालक म्हणून काम करणा-या कवी अब्दुल हकीम यांनी अतिशय ‘बोलक्या’ भाषेत वरील प्रश्नाला जिवंत केले आहे. कवीच्या तळमळीला आणि त्याच्या मनात खदखदणा-या ‘अंगाराला’ सातासमुद्रापार नेण्याचे मोठे अवघड काम ‘कवितासागर’ प्रकाशन संस्था, जयसिंगपूरचे संपादक आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी ई-बुकच्या माध्यमातून चोखपणे केले आहे. कवी अब्दुल हकीम यांचा लेखणीच्या माध्यमातील ‘आक्रोश’ मानवजातीच्या विचारांना बदलण्यास निश्चितच भाग पाडेल अशी आशा वाटते. कवी अब्दुल हकीम आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा!   
                
- संजय आप्पासो सुतार