मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय यंत्रणांना काही महत्त्वाचे निर्देश 'असे'
इंग्लंडसह युरोपातील काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवान प्रकार आढळून आला आहे. याचा प्रसार वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना काही महत्त्वाचे निर्देशही दिले.
नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही -
ठाकरे म्हणाले, 'कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी प्रचंड मेहनत घेतली. आता दुसऱ्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. याला रोखण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. यासाठी औषधी, ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर्सचा पुरेसा साठा करून ठेवावा, विलगीकरणाची व्यवस्था सज्ज ठेवण्यात यावी. ज्या वेगाने हा विषाणू पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांचीही क्षमता ठेवावी. एवढेच नाही, तर स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये काही जेनेटिक बदल होतात का? तसेच, या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपचाराच्या पद्धतीसंदर्भातही टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी अभ्यास करावा.
करोना चाचण्यांवर अधिक भर द्या -
आपण उन्हाळा आणि पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविले. मात्र, आता हिवाळ्यातील सर्दी, खोकला आणि ताप हे आजार वाढले आहेत. हे लक्षात घेऊन करोना चाचण्यांवर अधिक भर द्यावा. यासाठी राज्यातील करोना चाचणीच्या प्रयोगशाळांचा संपूर्ण क्षमतेनिशी वापर करावा. आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत सहव्याधी असलेल्या लोकांची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा रुग्णांशी संपर्क साधावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मास्कचा वापर बंधनकारक करण्यात यावा -
यावेळी ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाच्या तयारीसंदर्भातही आढावा घेतला. तसेच, लसीकरण करणारी यंत्रणा, ज्यांना पहिल्या टप्प्यात लस द्यायची आहे, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती पाठवणे, शीतगृहांची व्यवस्था तसेच प्रशिक्षण आदींचा आढावा घेतला. तसेच जिल्हा टास्क फोर्सने लसीकरणासंदर्भात बैठका घ्याव्यात, असा आदेशही त्यांनी दिला आहे. याशिवाय मास्क वापरल्याने करोनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध घालता येतो. यामुळे नागरिकांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात यावा. तसेच मास्क न वापरणाऱ्यांना दंड आकारण्यात यावा आणि मास्कचा वापर, हात धुणे आणि सोशल डिस्टंसिंगसंदर्भात पुन्हा जनजागृती करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.