शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: सोमवार, 6 नोव्हेंबर 2023 (23:25 IST)

टाइम आउट SL vs BAN : अँजलो मॅथ्यूज कसा आऊट झाला? पिचवर नेमकं काय घडलं?

Angelo Mathews
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 146 वर्षांच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेला प्रसंग सोमवारी (6 नोव्हेंबर) रोजी घडला. श्रीलंकेचा ऑल राऊंडर अँजलो मॅथ्यूज हा ‘टाईम आऊट’ मुळे बाद झालेला पहिला खेळाडू ठरलाय.
मॅथ्यूजला एकही बॉल खेळू न देता मैदानातील अंपायरनं बाद घोषित करत परत जाण्यास सांगितलं.
 
क्रिकेट विश्वषक 2023 मध्ये श्रीलंका विरुद्ध बांगलादेश या दिल्लीतल्या सामन्यातली ही घटना आहे.
 
नेमकं काय झालं?
श्रीलंकेच्या इनिंगमधील 25 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन ही ओव्हर टाकत होता.
 
शाकीबनं त्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर सदीरा समरविक्रमाला बाद केलं. त्यानंतर श्रीलंकेकडून अँजलो मॅथ्यूज मैदानात उतरला.
 
अँजलो मॅथ्यूजच्या हेल्मेटमध्ये काहीतरी अडचण होती. त्याच्या हेल्मेटचे स्ट्रॅप खराब होते. त्यामुळे तो फलंदाजीसाठी तयार झाला नाही. त्यानं राखीव खेळाडूकडं नवं हेल्मेट मागवलं.
या संपूर्ण प्रकारात काही वेळ गेला. त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसननं अंपायरकडं ‘टाईम आऊट’ साठी अपिल केलं.
 
शाकीब आणि बांगलादेशच्या संघानं केलेलं अपिल अंपायरनं ग्राह्य ठरत मॅथ्यूजला ‘टाईम आऊट’ घोषित केलं.
 
मॅथ्यूजनं अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यानं आपलं हेल्मेट खराब असल्याचं सांगितलं. यावेळी मॅथ्यूज आणि अंपायर यांच्यात मैदानात वाद झाल्याचंही दिसलं.
 
मॅथ्यूजच्या विनंतीनंतरही शाकीबनं अपिल मागं घेतलं नाही. त्यामुळे अंपायरनं नियमानुसार मॅथ्यूजला मैदान सोडण्याची सूचना केली. त्यानंतर मॅथ्यूजनं नाराजीनंच मैदान सोडलं.
 
नियम काय सांगतो?
आयसीसीच्या वन-डे विश्वचषकातील नियमानुसार एखादा फलंदाज बाद किंवा निवृत्त झाल्यानंतर पुढील फलंदाजानं 2 मिनिटांच्या आत बॅटींगसाठी सज्ज असलं पाहिजे.
 
या नियमाचं पालन फलंदाजाने केलं नाही तर त्याला बाद देण्याचा अधिकार हा मैदानातील अंपायर्सना आहे. ‘टाईम आऊट’ नुसार बाद देण्यात आलेल्या फलंदाजाची विकेट कोणत्याही गोलंदाजाच्या खात्यात जमा होत नाही.
 
मॅथ्यूजनं पुढील बॉल खेळण्यास 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लावला.
 
त्यामुळे बांगलादेशच्या संघाकडून ‘टाईम आऊट’ चं अपिल करण्यात आलं. ते मैदानातील अंपायरनं मान्य केलं.
 
स्पिरिट ऑफ क्रिकेटचं काय?
मॅथ्यूजच्या विनंतीनंतरही शाकीब अल हसननं त्याचं अपिल मागं घेतलं नाही. त्याची ही कृती ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ म्हणजे खिलाडूवृत्तीला साजेसी नाही, अशी टीका क्रिकेट फॅन्सकडून होत आहे.
 
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्यापूर्वीच बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका झाली होती.
 
त्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा गोलंदाज हसन महमूदनं ईश सोढीला बॉल टाकण्यापूर्वीच रन आऊट (मंकड) केले होते.
त्यावेळी बांगलादेशचा त्या सामन्यातील कर्णधार लिटन दासनं सोढीविरुद्धचे अपिल मागे घेतले. लिटन दासच्या त्या खिलाडूवृत्तीचं अनेकांनी कौतुक केलं.
 
अर्थात यंदा तशी परिस्थिती नव्हती. हा विश्वचषकातील सामना आहे. त्यामुळे हा सामना जिंकणं दोन्ही संघासाठी प्रतिष्ठेचं आहे.
 
या सामन्याचा निकाल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील दोन्ही संघाचं भवितव्य देखील ठरवू शकतो. हा सर्व विचार करुनच शाकीबनं नियमावर बोट दाखवत अपिल मागं न घेण्याचा निर्णय घेतला असावा.
 
... तर सचिन ठरला असता पहिला फलंदाज
अँजलो मॅथ्यूज टाईम आऊटमुळे बाद झालेला पहिला फलंदाज ठरलाय. पण, हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर नोंदवला गेला असता. पण, तसं झालं नाही.
 
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2007 साली झालेल्या कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि वासिम जाफर झटपट बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकरला मैदानात उतरण्यास तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला.
पण सचिननं ही चूक जाणीवपूर्वक केली नव्हती. खरंतर तो पॅड बांधून मैदानात येण्यासाठी सज्ज होता.
 
पण त्या कसोटीच्या आदल्या दिवशी सचिन काही काळ मैदानात नव्हता. त्यामुळे आणखी काही काळ त्याला फलंदाजीसाठी जाता येणार नाही, अशी सूचना फोर्थ अंपायरनी केली होती.
 
टीम इंडियानं हा प्रकार जाणीवपूर्वक केला नव्हता, हे अंपायर्सनी दक्षिण आफ्रिकन टीमच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर मैदानातील अंपायर डॅरेल हार्पर यांनी अपिल न करण्याची विनंतीी केली.
 
हार्पर यांच्या सूचनेनुसार दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथनं सचिनविरोधात अपिल केलं नाही.
 
सचिन तेंडुलकरच्या ऐवजी सौरव गांगुली फलंदाजीसाठी आला. त्यावेळी तब्बल सहा मिनिटं उलटली होती.
 
हे फलंदाज झाले होते टाईम आऊट
अँजलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट झालेला पहिला फलंदाज ठरला, पण याआधी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये काही वेळा अशा विकेट पडल्या होत्या.
 
रणजी ट्रॉफीमध्ये 1997-98  च्या मोसमाात त्रिपुराच्याा हेमुलाल यादवना टाईम आऊट देण्यात आलं होतं. ओरिसाविरुद्ध कटकमधल्या सामन्यात हेमुलाल बॅटिंगला निघाले आणि बाऊंडरीलाईनवर टीम मॅनेजरशी चर्चा करत होते. ते वेळेत क्रीजमध्ये न पोहोचल्यानं टाईम्ड आऊट झाले.
 
1987-88 मध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या प्रथमश्रेणी सामन्यात अँड्र्यू जॉर्डन आदल्या दिवसअखेर नॉट आऊट होते. सकाळी पुरामुळे रस्ते बंद झाल्यानं ते ग्राऊंडवर वेळेत पोहोचू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांना टाईम्ड आऊट ठरवण्यात आलं.
 
2002 मध्ये वेस्ट इंडीजचा वॅसबर्ट ड्रेक्स दक्षिण आफ्रिकेच्या ईस्ट लंडन शहरातील सामन्यासाठी वेळेत पोहोचू शकला नाही. त्याची बॅटिंगची वेळ आली तेव्हा तो विमानाच होता. साहजिकच तो टाईम आऊट ठरला.
 
इंग्लंडचा अँड्र्यू जेम्स हॅरिस 2003 साली नॉटिंगहम विरुद्ध डरहॅम या सामन्यात वेळेत क्रीझवर न पोहोचल्यानं बाद झाला. जांघेच्या दुखापतीमुळे तो वेळेत क्रीझमध्ये पोहोचू शकला नव्हता.











Published By- Priya Dixit