शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 1 डिसेंबर 2016 (14:50 IST)

मल्हारी नवरात्र : मार्तंडभैरव षड:रात्रोत्सव

जयमल्हार
मार्तंडभैरव षड:रात्रोत्सव

बुधवार दिनांक ३०/११/२०१६ रोजी देवदीपावली आणि मार्तंडभैरव षडःरात्रोत्सव प्रारंभ होत आहे. देवीच्या नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे मातीचा घट स्थापन केला जातो त्याप्रमाणे षडःरात्रोत्सवामध्ये कलश स्थापन केला जातो. घटस्थापना विधीची आणि षडःरात्रोत्सवातील कुलाचाराची सविस्तर माहिती खास मल्हार भक्तांसाठी येथे देत आहोत.
घटस्थापनेच्या दिवशी आपल्या घरातील देवघर स्वच्छ साफ करून घ्यावे. सर्व देवतांच्या मूर्तींची स्वच्छ पाकाळणी (प्रक्षालन) करून पंचामृताने ( दुध, दही, तूप, मध, साखर.) अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलीतोपचारे पूजा करावी. देवघरातील सर्व टांक आणि मूर्तींना नूतन वस्त्रासोबत विड्याच्या पानांचे आसन द्यावे.
नंदादीप घासून पुसून स्वच्छ करून सहा दिवस सतत तेवत राहील या पद्धतीने वात लावून प्रज्वलित करावा. ताम्हणामध्ये तांदुळ किंवा धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडावे, श्रीफळ कलशाची विधीवत पूजा करावी, त्याला बाहेरील बाजूने फुले-पानांची माळ बांधावी. अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर पाच अथवा सात पानांची माळ टांगती अड्कवावी. गोड नैवेद्य दाखवून आरती करावी.
☘ जयमल्हार ☘

मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया ते मार्गशीर्ष शुद्ध पंचमी
(बुधवार दि. ३०/११/२०१६ ते रविवार दि. ०४/१२/२०१६)
रोज सकाळी नियमितपणे देवाची पूजा करावी देवाला गोड नैवेद्य दाखवावा. फुलांची माळ तयार करून घटावर लावावी. शक्य असेल तर दररोज वेगवेगळ्या फुलांची माळ लावावी, आणि शक्य नसेल तर उपलब्ध असलेल्या फुलांची माळ लावावी. उत्सव कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय ठेवावे.
मल्हारी महात्म्य, मार्तंड विजय ग्रंथ यांचे पारायण, मल्हारी नामस्मरण करावे,

मार्गशीर्ष शुद्ध पंचमी
(रविवार दि. ०४/१२/२०१६)
श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये श्रींना तैलस्नान घातले जाते, त्याला श्रीखंडोबा आणि म्हाळसा विवाहातील तेलवण विधी असे म्हणतात. या दिवशी तिन्हीसांजेला आपल्या घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे आणि दोन मुटके तयार करावेत त्यासोबत पुरणाचे पाच दिवे तयार करून घ्यावेत. सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे.
☘ जयमल्हार ☘ 

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठी
(सोमवार, दि. ०५/१२/२०१६)
चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले.

देवघरातील सर्व देवतांच्या मूर्तींची पंचामृताने ( दुध, दही, तूप, मध, साखर.) अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलीतोपचारे पूजा करावी, चाफ्याची फुले देवाला अर्पण करावीत. घटावर फुलांची माळ लावावी.दिवटी प्रज्वलीत करून देवांना ओवाळावी. पुरणा - वरणाचा नैवेद्य आणि त्यासोबत भरित रोडग्याचा नैवेद्य देवाला दाखवावा, घोडा, कुत्रा आणि गाय यांना घास द्यावा. घटोत्थापनकरून आप्तेष्ठांना सोबत घेऊन तळीभंडार करावा, उपस्थितांना भंडार लावून पानसुपारी खोबरे द्यावे...
॥ श्रीमार्तंड भैरवार्पणमस्तू II
जयमल्हार