बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 26 नोव्हेंबर 2025 (12:35 IST)

Sant Rohidas Punyatithi 2025 रोहिदास महाराजांची चमत्कारिक भक्ती: विठ्ठल स्वतः आले मदतीला

Sant Rohidas Punyatithi 2025 date
संत रोहिदास महाराज हे १५ व्या आणि १६ व्या शतकादरम्यान होऊन गेलेले भक्ती चळवळीतील एक महान संत, कवी आणि समाजसुधारक होते. त्यांना रैदास, रविदास, रोहिदास यांसारख्या अनेक नावांनी ओळखले जाते. संत रोहिदास हे भगवान विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि त्यांची पुण्यतिथी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात साजरी केली जाते. संत रोहिदास पुण्यतिथी 2025 मध्ये 27 नोव्हेंबर रोजी आहे.
 
त्यांचा जन्म माघ महिन्यातील पौर्णिमेला झाला. ही तिथी त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. त्यांचा जन्म साधारणपणे इ.स. १३७६ किंवा १३९८ च्या दरम्यान काशी (वाराणसी) जवळच्या मांडूर किंवा गोवर्धनपूर या गावात झाला असे मानले जाते. त्यांच्या आईचे नाव माता काळसी (घुरबिनिया) आणि वडिलांचे नाव रघुराम (संतोख दास/संतोरवदास) होते. त्यांचे पालक चर्मकार (चांभार) समाजातले होते आणि त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय चामड्यापासून पादत्राणे बनवण्याचा होता.
 
ते रामानंद स्वामींचे १२ शिष्यांपैकी एक होते, त्यामुळे त्यांचे गुरु स्वामी रामानंद होते. संत कबीर हे त्यांचे समकालीन आणि गुरुबंधू होते. मेवाडची महाराणी संत मीराबाई ही त्यांची प्रमुख शिष्या होती. तिने त्यांच्याकडून आध्यात्मिक ज्ञान घेतले.
 
विठ्ठलाचे निस्सीम भक्त
संत रोहिदास हे व्यवसायाने चांभार होते. ते भगवान श्रीकृष्णाचे रूप असलेल्या भगवान विठ्ठलाचे सतत ध्यान करत असत. ते देवतेला समर्पित भजन म्हणत असत.
 
आख्यायिका अशी आहे की एकदा भगवान विठ्ठल संत रोहिदासांसमोर १००० जोडे बनवण्यास मदत करण्यासाठी आले. त्या प्रदेशाच्या राजाच्या सूचनेनुसार त्यांना १००० जोडे तयार करवायचे होते. त्यांनी मदतीसाठी सर्वत्र शोध घेतला पण त्यांना कोणीही सापडले नाहीत.
 
असे म्हटले जाते की विठ्ठल एका लहान बालकाच्या रूपात प्रकट झाले आणि संत रोहिदास यांना जोडे बनवताना भजन गात राहण्यास सांगितले. संत रोहिदास त्या लहान मुलाचा वेग पाहून आश्चर्यचकित झाले. ते भजन गात राहिले आणि एका रात्रीत सर्व जोडे तयार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तरुण मुलाने सांगितले की तो स्नान करून परत येईल.
 
संत रोहिदासांनी ते जोडे राजाकडे नेले, राजा त्यांच्या कामावर खूश झाला. त्यांना चांगले बक्षीस मिळाले. पण संत रोहिदास परत आल्यावर त्यांना तो मुलगा सापडला नाही. लवकरच त्यांना कळले की त्यांना मदत करण्यासाठी आलेला मुलगा विठ्ठल आहेत.
 
अस्वीकारण: ही माहिती विविध स्तोत्रांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.