शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: रविवार, 11 एप्रिल 2021 (11:42 IST)

|| शरीरी वसे रामायण ||

जाणतो ना कांही आपण
शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ ||
 
आत्मा म्हणजे रामच केवळ,
मन म्हणजे हो सीता निर्मळ !
जागरुकता हा तर लक्ष्मण,
शरीरी आपुल्या वसे रामायण ||१||
 
श्वास, प्राण हा मारुतराया,
फिरतो जगवित आपुली काया |
या आत्म्याचे करीतो रक्षण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||२||
 
नील जाम्बुवंत रक्त नसा या,
फिरती शोधत जनक तनया
गर्वच म्हणजे असतो रावण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||३||
 
रक्त पेशी त्या सुग्रीव, वानर,
भाव भावना त्यातील वावर
मोहांधता करी आरोग्य भक्षण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||४||
 
नखें केंस त्वचा शरीरावरती,
शरीर नगरीचे रक्षण करती
बंधु खरे हे करती राखण
शरीरी आपुल्या वसे रामायण ||५||
 
क्रोध म्हणजे कुंभकर्ण तो,
शांत असता घोरत पडतो
डिवचताच त्या करी रणक्रंदन
शरीरी आपुल्या वसे रामायण ||६||
 
गर्वे हरले सौख्य मनाचे
कांसाविस हो जीवन आमुचे
संकटी येई शरीर एकवटून
शरीरी आपुल्या वसे रामायण ||७||
 
मनन करता भगवंताचे,
रक्षण होईल आरोग्याचे
राम जपाचे अखंड चिंतन
शरीरी आपुल्या वसे रामायण ||८||
 
||  रामार्पणमस्तु  ||