Marathi Biodata Maker

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ३३

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (14:17 IST)
 
मग गोरक्षच्या आज्ञेनें, चौरंगी आपला पिता जो शशांगार राजा, त्याच्या पायां पडला व आपण पुत्र असल्याची त्यानें ओळख दिली. ओळख पटतांच राजानें त्यास पोटाशी धरिलें. नंतर राजा गोरक्षनाथाच्या पायां पडला. मग त्या उभयतांचीं चौरंगीच्या प्रतापाविषयीं भाषणें झाली. इतक्यांत चौरंगीनें वज्रांस्त्र सोडून पर्वतास्त्राचा मोड केला.
 
थोड्या वेळानें राजानें घरीं येण्याबद्दल गोरक्षनाथास अति आग्रह केला; पण चौरंगीनें राजास सांगितलें कीं, तुझ्या घरीं आम्हीं येणार नाहीं, कारण सावत्र आईच्या कपटी बोलण्यावर विश्वास ठेवुन तूं माझे हातपाय तोडिलेस. असें बोलून मुळारंभापासुन खरा घडलेला वृत्तांत त्यानें सांगितला. त्यासमयीं आपलीं भुजावंती स्त्री जारिणी आहे असें समजून राजास तिचा अत्यंत राग आला. त्यानें राणीस मारीत झोडीत तेथें घेऊन येण्याची सेवकांस आज्ञा केली, परंतु तसें करण्यास चौरंगीनें किरोध केला. घरींच तिला शिक्षा करावी असें त्याचें मत पडलें. मग त्या दोघांस पालखीत बसवुन राजा आपल्या वाड्यांत घेऊन गेला. तेथें राजानें राणीचा अपराध तिच्या पदरांत घालून तिला शिक्षा केली व घरांतुन घालवून दिलें. नंतर गोरक्षनाथानें राजाचे शांतवन करून दुसरी स्त्री करण्याची आज्ञा केली व आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून वंश वाढेल असा आशीर्वाद दिला. तेथें गोरक्षनाथ एक महिना राहून चौरंगीनाथास घेऊन तेथून पुढें गेला.
 
कौंडण्यापूर सोडल्यावर ते फिरत फिरत प्रयागास गेले तेथें स्नान करून शिवालयात देवाचें दर्शन घेतल्यानंतर पूर्वीच्या गुरविणीस बोलावून गोरक्षनाथानें तिला गुरुच्या देहाबद्दल विचारलें तेव्हां ती भयभीत होऊन थरथरां कापूं लागली. अडखळत बोलूं लागली. ती त्याच्या पायां पडली व म्हणाली, महाराज,रेवती राणीनें मला धमकी देऊन विचारल्यावरून मी खरी गोष्ट तिच्यापाशीं सांगितली. गुरुच्या देहाची कय व्यवस्था झाली आहे ती प्रत्यक्ष जाऊन पाहावी. असा जेव्हां तिच्या बोलण्याचा आशय दिसला, तेव्हां गोरक्षाच्या मनांत संशय उत्पन्न झाला. तो लागलाच भुयाराकडे गेला व दार उघडून पाहातो तो आंत मच्छिंद्रनाथाचें प्रेत दिसेना. तेव्हा तो शोक करूं लागला. तें पाहून गुरविणीनें त्यास सांगितलें कीं, तुम्हीं अंमळ स्वस्थ बसा; मी राणीस भेटून तिनें प्रेताची काय व्यवस्था केली आहे, तें विचारून येतें. असे सांगून ती लागलीच तेथून निघाली.
 
नंतर तिनें राजवाड्यांत जाऊन राणीची भेट घेतली आणि राणीस म्हटलें, मच्छिंद्रनाथाच्या शरीराबद्दल मी तुमच्यापाशीं गोष्ट काढून बारा वर्षाची मुदत सांगितली होती, ती पुरी झाली म्हणुन मला आज त्या गोष्टीचें स्मरण झाल्यावरून आपल्याकडे आलें आहें, तें तिचें भाषण ऐकून राणी तिला एकीकडे घेऊन गेली व म्हणाली राजा त्रिविक्रमाच्या देहांत मच्छिंद्रनाथानें प्रवेश केला व आपला राजा त्रिविक्रमाच्या देहांत मच्छिंद्रनाथानें प्रवेश केला व आपला देह शिष्याकडून शिवालयाच्या भुयारांत लपवून ठेविला वगैरे हकीकत तुं मला सांगितलीस. त्यानंतर थोड्याच दिवसांत तुझ्या नकळत मीं त्याच्या शरीराचे तुकडे करून ते रानांत टाकून दिले. या गोष्टीस आज पुष्कळ दिवस झाले. ते तुकडे किडीमुंग्यांनीं खाऊन सुद्धां टाकले असतील. अशा रीतीनें मी चिंतेचें बीज समूळ खणुन टाकिलें. आतां तूं निर्धास्त राहा.
 
राणीचें हे भाषण ऐकून ती फारच घाबरली. परंतु नशिबावर हवाला ठेवुन व आतां पुढें काय भयंकर परिणाम होणार अशी भीति मनांत आणुन तिनें परत येऊन गोरक्षनाथास ती हकीकत सांगितली. तेव्हां त्यास अत्यंत राग आला आणि राणीस शिळा करण्याचें त्याच्या मनांत आलें. परंतु आतां ती मच्छिंद्रनाथाची स्त्री असल्यामुळें आपली माता झाली. असा विचार येऊन तिला शिक्षा करण्याचा विचार त्यानें सोडून देला. त्यानें मनांत विचार केला कीं, गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असले तरी ते नाश पावावयाचे नाहींत. कोठें तरी पडलेले असतील, ते शोधून काढावे. नंतर त्या उद्योगास लागल्याचें त्यानें ठरविलें आणि तो चौरंगीस म्हणाला, मच्छिंद्रनाथाच्या देहाचा शोध करण्याकरितां मी माझा देह येथें ठेवून सूक्ष्मरूपानें जातों, माझ्या शरिराचें तूं नीट संरक्षण कर. येथील राणी रेवती हिनें मच्छिंद्राच्या देहाचा जसा नाश केला तसा ती माझ्याहि शरीराचा नाश करील. यास्तव फार सावधगिरी ठेव. असें सांगून गोरक्षनाथ शरीरांतुन प्राण काढून जिकडे तिकडे पाहूं लागला. त्यानें सुक्ष्म रूपानें सर्व पृथ्वी, पाताळ, स्वर्ग आदिकरून सर्व ठिकाणी धूंडून पाहिलें; पण पत्ता लागेना. शेवटी तपास करीत करीत तो कैलासास गेला व शिवगणांस पाहू लागल. तेथें मच्छिंद्रनाथाच्या अस्थि, त्वचा, मांस वगैरे त्यास दिसुन आलें.
 
त्या वेळेस त्या शिवगणांस वीरभद्र सांगत होता कीं, बारा वर्षांची मुदत पुरी झाली; आतां मच्छिंद्रनाथाच्या शरीराचें रक्षण करण्यास फारच सावध राहा. कारण, त्याचा शिष्य गोरक्षनाथ हा शोध करण्यासाठीं केव्हां कोणत्या रूपानें येईल याचा नेम नाहीं.हे वीरभद्राचे शब्द गोरक्षनाथाच्या कानीं पडतांच तो तेथून निघुन पुनः परत येऊन आपल्या देहांत शिरला. मग गोरक्षनाथ व चौरंगीनाथ एक विचार करून भस्म व झोळी घेऊन युद्धास सिद्ध झाले. गोरक्षनाथानें सूर्यावर प्रथम पर्वतास्त्राची योजना केली, तेणेंकरून त्याचा रथ चालेना. सूर्यानें वज्रास्त्रानें पर्वतास्त्राचा मोड केला व मला अडथळा करण्यासारखें पर्वतास्त्र सोडणारा कोण, ह्याचा सूर्यानें मनांत शोध केला, तो गोरक्षनाथाजवळ आला. त्याचा ताप लागूं नये म्हणुन गोरक्षनाथानें चंद्रास्त्राची योजना करुन कोटी चंद्र निर्माण केले; तेणेंकरून थंडावा येऊन सूर्याचा ताप लागेनासा झाला. नंतर गोरक्ष व चौरंगी हे दोघेहि सूर्याच्या पायां पडले. ह्या वेळेस मला हैराण करण्याचें कारण कोणतें, म्हणुन सूर्यानें विचारल्यावर गोरक्षनाथानें सांगितलें कीं, मच्छिद्रनाथाचा देह शिवगणांनी कैलासास नेला आहे. यास्तव आपण मध्यस्थी करून तो आमच्या हातांत येईल असें करावें. म्हणजे आपले आम्हांवर मोठें उपकार होतील.
 
गोरक्षनाथाचें तें भाषण ऐकून शिष्टाई करण्याचें कबूल करुन सूर्य कैलासास गेला. त्यास पाहतांच शिवगणांनीं त्याच्या पायां पडून येण्याचें कारण विचारिल्यावर गोरक्षनाथकडून मध्यस्थीचें काम घेऊन आलों आहें. असें सांगून सूर्यानें त्यांस मच्छिंद्रनाथाचें शरीर परत द्यावें म्हणुन फारच सुरस बोध केला व गोरक्षनाथाचा प्रतापहि वाखाणिला. परंतु सूर्याच्या बोलण्याचें वीरभद्राजवळ वजन पडलें नाहीं. त्यानें उत्तर दिलें कीं, मच्छिंद्रनाथानें आम्हांस अत्यंत त्रास देऊन दुःसह दुःखे भोगावयास लावून आमचे प्राण सुद्धा धोक्यात घातले; असा शत्रु अनायासें आमच्या तावडीत आलेला असल्यानें प्राण गेले तरी आम्ही त्यास सोडून देणार नाहीं, जर गोरक्ष युद्ध करील तर त्याचीहि मच्छिंद्राप्रमाणें अवस्था करुं. असें वीरभद्राचें वीरश्रीचें भाषण ऐकून सूर्यानें त्यास सांगितलें कीं,एवढे पाणी जर तुमच्यामध्यें होतें तर मच्छिंद्रनाथानें मागें तुमच्यी दुर्दशा करून प्राणावर आणुन बेतविलें, तेव्हां तुमचा प्रताप कोणीकडे लपून राहिला होता ? आतां तो सहज तुमच्या हातात आला म्हणून तुम्हीं इतकी मिजाज करित आहां. पण मच्छिंद्र आणि गोरक्ष हे दोघे सारखे बलवान आहेत. शिवाय त्या वेळेस मच्छिंद्रनाथ एकटाच होता. आतां गोरक्षानाथाच्या साह्यास चौरंगीनाथ आला आहे, यास्तव तुझ्या या अविचारी व दांडगाईच्या उत्तरेनें चांगला परिणाम घडून येणार नाहीं. परंतु सूर्यानें सांगितलेलें हें सर्व भाषण फुकट गेलें व कांहीं झालें तरी मच्छिंद्राचा देह परत देणार नाहीं, असें वीरभद्रादिकांनीं स्पष्ट सांगितलें.
 
मग सूर्याने त्यास सांगितलें कीं , तुम्हीं आतां इतकें करा कीं, हें युद्ध कैलासास न होतां पृथ्वीवर होऊं द्या. कैलासास झालें तर कैलासाचा चुराडा होऊन जाईल; असें सांगुन सूर्य तेथून निघाला.
 
सूर्य निघून गेल्यावर युद्धाकरितां तुम्हीं पुढें चला मी मागाहून लवकर येतों असा वीरभद्राचा शिवगणांस हुकूम झाला. त्याप्रमणें अष्टभैरव, गुण आदिकरून सर्व युद्धास येऊन थडकले.बहात्तर कोटि चौर्‍याऐंशीं लक्ष गण शस्त्रास्त्रांसह युद्धांस आले असे पाहून गोरक्ष व चौरंगी सावध झाले. दोन्हीं बाजु जयाची इच्छा धरून लढू लागल्या. शेवटीं चौरंगीच्या मोहिनी व वातास्त्रांनी वीरभद्राच्या दळांतील लोकांचा मोड होऊन ते भ्रमिष्टासारखे होऊन देहभान विसरले. इतक्यांत वीरभद्र चामुंडांसह येऊन दाखल झाला. आपल्या दळाचा पराभव झाला असें पाहून वीरभद्र गोरक्षनाथावर चवताळला. त्यांनी एकमेकांच्या नाशास उद्युक्त होऊन शस्त्रास्त्रांचा एकसारखा मारा चालूं केला. परंतु गोरक्षाच्या शक्तीमुळें वीर भद्राचीं अनेक शस्त्रें व अस्त्रें दुर्बल झाली. शेवटीं गोरक्षनाथानें संजीवनीं अस्त्राची योजाना करुन सकल दानव उठविले. त्यात त्रिपुर, मधु महिषासुर , जलंधर काळयवन, अद्यासुर , बकासुर, हिरण्यापक्ष, हिरण्याकशिपु , मुचकुंद, वक्रंदत, रावण, कुंभकर्ण इत्यादि अनेक महापराक्रमी राक्षस युद्धासाठीं येऊन पोचलें. त्यावेळीं तेहतीस कोटि देवांनीं रणक्षेत्र सोडून आपपली विमानें पळविली व त्यांना मोठी चिंत्ता उप्तन्न झाली. त्यांनीं वैकुंठास जाऊन हा सर्व प्रकार श्रीविष्णुच्या कानांवर घातला. तेव्हां अतां पुनः अवतार घ्यावा लागेल, असें वाटून त्यालाहि काळजी पडली, मग विष्णुनें शंकरास बोलावून आणुन सर्व वृत्तांत त्यास सांगितला व वीरभद्राच्या वेडेपणानें या पल्ल्यास गोष्ट आली, असें सांगितलें.
 
मग तंटा मिटवून विघ्न टाळण्यासाठीं ते गोरक्षनाथाकडे गेले व त्यास त्यांनी पुष्कळ प्रकारांनी समजावून सांगितलें. परंतु गुरुचें शरीर माझ्या स्वाधीन करा म्हणजे तंटा मिटेल, असें गोरक्षनाथानें स्पष्ट उत्तर दिलें, मग शंकरानें चामुंडास पाठवुण मच्छिंद्रनाथाचा देह आणविला. व गोरक्षनाथाच्या स्वाधीन केला आणि राक्षसांस अदृश्य करावयास सांगितले. तेव्हा गोरक्ष म्हणाला, अस्त्राच्या योगानें राक्षस उप्तन्न न होतां संजीवनीं मंत्रप्रयोग केल्यामुळें राक्षस उप्तन्न झालें आहेत. यास्तव पुनः अवतार घेऊन त्यास मारुन टाका किंवा वीरभद्राची आशा सोडा. दोहोंतुन जसें मला सांगाल तसें मी करितो. हें ऐकून शकरानें सांगितलें कीं, मधुदैत्य माजला त्या वेळेस आम्ही रानोमाळ पळुन गेलों, शेवटीं एकादशीस अवतार घेऊन त्याचा नाश करावा लागला. अशीं संकटें अनेक वेळां सोसावीं लागली यास्तव आतां विलंब न लावितां लौकरच राक्षसांचा बंदोबस्त कर; आम्हीं वीरभद्राची आशा सोडून दिली असें शिव व विष्णु त्यास म्हणूं लागले. त्या वेळीं प्रतापवान वीरभद्र एकटाच त्या राक्षसमंडळींशीं लढत होता. तें पाहून गोरक्षनाथानें वाताकर्षण अस्त्राची योजना केली आणि मंत्र म्हणुन भस्म फेंकतांच वीरभद्रासह सर्व राक्षस गतप्राण होऊन निश्चेष्ट जमिनीवर पडले. तेव्हां शंकर व विष्णु यांनीं गोरक्षनाथाची स्तुति केली. मग गोरक्षनाथानें अग्न्यस्त्र योजून निश्चेष्ट पडलेल्यांस जाळून टाकलें हा वाताकर्षण प्रयोग नाथपंथावांचून देवदानवांस ठाऊक नव्हता.

सर्व पहा

लग्नापूर्वी हळद का लावली जाते? या विधीचा खरा अर्थ जाणून घ्या

पांडुरंगाच्या कानात मासे का? जाणून घ्या त्यामागचे रहस्य!

आषाढी एकादशी 2026: उपवासाचे नियम, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि पारणाची योग्य वेळ

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी दत्तगुरूंना अर्पण करा ही १ वस्तू; आर्थिक अडचणी कमी होतात, अशी मान्यता

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments