Dharma Sangrah

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ३२

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (14:15 IST)
 
इकडे जिवंत झालेला त्रिविक्रमराजा ( मच्छिंद्रनाथ ) राजावाड्यांत गेल्यानंतर मनांत कांहीं किंतु न आणतां सर्व कारभार पाहूं लागला. राणीबरोबर त्याची त्रिविक्रमाप्रमाणेंच भाषणें होऊं लागली. तो पूर्ण ज्ञानी असल्यानें राजाच्या शरीरांत प्रवेश केल्यानंतर माहितगाराप्रमाणें सर्व व्यवस्था चालवूं लागला व राज्यप्रकरणीं सर्व कारभार सुरळीत चालूं झाला.
 
पुढें एके दिवशीं, त्रिविक्रमराजाच्या स्वरूपांत मच्छिंद्र्नाथ त्या देवालयांत गेला व गोरक्षनाथास तेथें पाहून विचारपूस करूं लागला. गोरक्षनाथानें त्यास उत्तरें देऊन आपण कोण, कोठले ह्याचा खुलासा केला. तसेंच, मच्छिंद्रनाथाचें शरीर सांभाळून ठेविलें होतें ती जागाहि नेऊन दाखविली व बर्बर भाषेंत सर्व हकीकत सांगितली. मग राजा क्षणभर तेथें बसून आपल्या राजवाड्यांत गेला. याप्रमाणें राजा नित्य शिवालयांत जात असे व आपलें शरीर ठेवलेली जागा पाहात असे. तो कांहीं वेळ शिवाजवळ व कांहीं वेळ गोरक्षाजवळ बसून प्रेमपूर्वक गोष्टी करीत असे. ह्याप्रमाणें तीन महिने एकसारखा क्रम चालला असतां एके दिवशीं, गोरक्षनाथानें राजास सांगितलें कीं, आतं आम्ही तीर्थयात्रेस जातों. आपण योगासाधन करून स्वस्थ असावें व स्वहित साधून स्वशरीराचें संरक्षण करावें. तें गोरक्षनाथाचें सर्व म्हणणें मच्छिंद्रनाथानें मान्य करून त्यास तीर्थयात्रा करावयास जाण्याची आज्ञा दिली व गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला.
 
पुढें सहा महिन्यांनीं रेवती राणी गरोदर राहिली. नऊ महिने पूर्ण होतांच ती प्रसुत होऊन पुत्ररत्‍न झालें. बारावे दिवशीं मुलास पाळण्यांत घालून 'धर्मनाथ' असें नांव ठेविलें. त्या मुलाचें वय पांच वर्षाचें झाल्यावर एके दिवशीं राजा व राणी शिवालयांत पूजा करावयास गेलीं. तेथें राणीनें शिवाजी पूजा केल्यावर प्रार्थना केली कीं, हें शंकरा ! हे उमापते ! राजा त्रिविक्रम याच्याआधीं मला मरण दे. मी सुवाशीन असतां मरणें, हें उत्तम होईल.
 
रेवती राणीनें केलेली प्रार्थना ऐकतांच तेथील गुरविणीस खदखदां हसूं आलें. तें पाहून राणीनें तिला विचारलें कीं, कांहींतरी आश्चर्य वाटल्याशिवाय तुला हसूं येत नाहीं, तरी तुला कोणतें नवल वाटलें तें तूं मनांत संशय न धरतां मला सांग. तेव्हां गुरवीण म्हणाली कीं, तुम्ही ती हकीकत विचारूं नये व मलाहि खरी हकीकत तुम्हांपाशीं बोलतां येणार नाहीं; कां कीं, कदाचित् अनर्थहि घडून यावयाचा, म्हणुन मला भय वाटतें. आम्ही दुर्बळ असून तुम्ही सत्ताधीश आहांत आणि मी सांगेन ती हकीकत ऐकून तुम्हांस क्रोध आल्यास आमच्या जिवावर येऊन बेतायचें ! तें ऐकून, माझ्यापासून तुला कोणत्याहि प्रकारचें दुःख व जिवास कांहीं एक भीति होणार नाहीं, असें राणीनें तिला वचन दिलें. मग गुरविणीनें तिला मुळापासुन शेवटपर्यंत संपूर्ण वृत्तांत निवेदन केला. शेवटीं ती म्हणाली, त्रिविक्रमराजा मरण पावला असून त्याच्या देहांत मच्छिंद्रनाथानें संचार केला आहे; ह्या कारणानें तूं विधवा असतां सुवाशीव म्हणवितेस म्हणुन मला हसूं आलें; परंतु तुं आतां इतकेंच कर कीं, ही गोष्ट कोणाजवळ बोलूं नको.
 
नंतर, राणीच्या आग्रहावरून गुरविणीनें तिला मच्छिंद्रनाथाचें शरीर भुयारांत होतें तें नेऊन दाखविलें. तें पाहून रेवती उदास होऊन राजवाड्यांत गेली; तिला चैन पडेना. नाना प्रकारच्या कल्पना तिच्या मनांत येऊं लागल्या. ती म्हणाली, दुदैवानें पतिव्रतापणास मी अंतरलें हें खचित.योगायोग होता त्याप्रमाणें घडून आलें, पण पुढें येणार्‍या परिस्थितीचा आतांपासून बंदोबस्त केला पाहिजे. स्वस्थ बसून राहतां कामा नये. वास्तविक पाहूं गेले असतां, मच्छिंद्रनाथाचाचा हा हल्लींचा संसार आहे. परंतु बारा वर्षांनी पुन्हां येणारें संकट टाळलें पाहिजे. मच्छिंद्रनाथ परकायाप्रवेश पूर्णपणें जाणत असल्यामुळें तो भुयारांत ठेविलेल्या आपल्या शरीरांत प्रवेश करील. पण आपला मुलगा त्या वेळीं लहान राहून मीहि निराश्रित होऊन उघड्यावर पडेन. तरी मच्छिंद्रनाथाचा देह छिन्नभिन्न करून टाकला, हाच एक उत्कृष्ट उपाय दिसतो. देह नसल्यावर मच्छिंद्रनाथ कोठें जाणार ? अशी कल्पना मनांत आणुन त्याच्या देहाचा नाश करून टाकण्याचा तिनें पक्का निश्चय केला. नंतर कोणास न सांगतां एकां दासीस बरोबर घेऊन ती मध्यरात्रीस भुयारांत दरवाजा उघडून शस्त्रानें मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे करून बाहेर नेऊन टाकून दिले आणि पूर्वीप्रमाणें गुहेचें द्वार लावून ती राजवाड्यांत गेली.
 
इतकें कृत्य झाल्यावर पार्वती जागृत झाली. तिनें शंकरास जागें केलें व रेवती राणीनें मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे करून टाकल्याचें त्यास सांगितलें. तेव्हां आज आपला प्राण गेला असे शंकरास वाटलें. मग त्यानें याक्षिणींस बोलावून मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासास पाठवून देण्याबद्दल पार्वतीस सांगितलें. तिनें बोलावितांच कोटि चामुंडा येऊन दाखल झाल्या. त्यांस शरीराचे तुकडे वेंचून नीट जतन करून ठेवण्याची व वीरभद्राच्या स्वाधीन करण्याची पार्वतीनें आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणें शरीराचे तुकडे वेंचून चामुंडा कैलासास गेल्या व ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करून त्यास सर्व वृत्तांत समजाविला. शेवटीं त्या वीरभद्रास म्हणाल्या कीं, आमचा व तुमचा शत्रु मच्छिंद्रनाथ हा मरण पावला आहे. त्यानें आम्हांस नग्न करुन आमची फारच फजिती केली होती. तसेंच अष्टभैरवांची दुर्दशा केली, तुमचीहि तीच दशा केली, मारुतीचाहि तोच परिणाम; सर्व देवांना भारी असा प्रबळ शत्रु अनायासें तावडीनें सांपडला आहे. तरी ह्याचें शरीर नीट जतन करून ठेवावें. ह्या मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ महान् प्रतापी आहे, तो हें शरीर घेऊन जाण्याकरितां येईल; यास्तव फर सावध राहावें. तें ऐकून वीरभद्रानें चौर्‍यांयशीं कोटि बहात्तर लक्ष शिवगण रक्षणासाठी बसविले व कोटि यक्षिणी, चामुंडा, डंखिणी व शंखिणी यांचा खडा पहारा ठेविला.
 
इकडे त्रिविक्रमराजा ( मच्छिंद्रनाथ ) नित्य शिवालयांत गेल्यावर भुयाराकडे जाऊन पाही, पण खूण जशीच्या तशीच असल्यामुळें हा घडलेला प्रकार त्याच्या समजण्यांत आला नाही. त्याची बारा वर्षांची मुदत भरली. गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला होता तोहि मुदत पुरी झाली म्हणून सावध झाला.

सर्व पहा

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढवणारे स्तोत्र : सरस्वती अष्टकम

सुंदर कविता: वारी; पंढरपूरचा विठु काल अचानक आला घरी

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments