1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 एप्रिल 2015 (12:43 IST)

हडकुळ्या मॉडेल्सना होणार 50 लाख रुपये दंड

जगाची फॅशन कॅपिटल अशी ओळख असलेल्या फ्रान्सने नुकताच संसदेत मतदान घेऊन एक कायदा पास केला आहे. त्यानुसार अतिकृश किंवा हडकुळ्या मॉडेल्सना 75 हजार युरो म्हणजे 50 लाख रुपये दंड व सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकणार आहे.

जगभरातील मॉडेल एजन्सीजनी या कायद्याचा निषेध केला असला, तर इस्त्रायल, स्पेन आदी देशांनी मात्र त्याचे समर्थन केले आहे. नवीन कायद्यानुसार ज्या महिलात बॉडी मास इंडेक्स कमी आहे. त्यांना मॉडेलिंगची परवानगीच दिली जाणार नाही. तसेच नियम मोडल्यास त्यांना 75 हजार युरो दंड व सहा महिने शिक्षाही सुनावली जाणार आहे. बॉडी मास इंडेक्स हा शारीरिक सुदृढता मोजण्याचे मानक आहे. त्यावरूनच अशक्त, कृश, नॉर्मल, ओव्हरवेट, स्थूल अशी विभागणी केली जाते.

व्यक्तीच्या शारीरिक वजनाला त्याच्या मीटरमधील उंचीच्या वर्गाने भागल्यानंतर हा इंडेक्स मिळतो. फ्रान्सच्या आरोग्यमंर्त्यांनी हा नियम ज्या महिला मॉडेल्सना आदर्श मानतात. त्यांच्या फायद्यासाठी बनविला गेल्याची पुष्टी केली आहे.

मॉडेल्सनीही तब्येत राखायलाच हवी असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र मॉडेल एजन्सीच्या म्हणण्यानुसार या कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धात फ्रान्सच्या मॉडेल्समागे पडतील अशी तक्रार केली आहे. फ्रान्समध्ये 40 हजारांहून अधिक कृश व्यक्ती असून त्यातील 90 टक्के महिला आहेत.