रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2020 (15:48 IST)

चीन विगर मुस्लीम : तीन वर्षांनी एकत्र येणाऱ्या कुटुंबाची कहाणी

तीन वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात एका विगर व्यक्तीला आपल्या पत्नी आणि मुलांना भेटता आलं आहे. त्यांची चीनच्या शिनजियांग प्रांतातून सुटका करण्यात आली.
 
हा क्षण ऑस्ट्रेलियन नागरिक सद्दाम अबूसालामू यांच्यासाठी अत्यंत विशेष क्षण होता. तीन वर्षांनी ते आपली पत्नी नादिला वुमाएर आणि तीन वर्षांचा मुलगा लुत्फीला भेटत होते.
 
एका मुत्सद्दी करारानंतर सद्दाम यांच्या कुटुंबाला चीन सोडण्याची परवानगी मिळाली. वुमाएर या सुद्धा चीनमधील अल्पसंख्यांक विगर मुस्लीम समुदायातील आहेत. त्यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं, असं त्या सांगतात.
 
तीन वर्षांनी जेव्हा हे कुटुंब सिडनी विमानतळावर एकत्र आलं तेव्हा तो अत्यंत भावनिक क्षण होता. हा क्षण त्यांनी कॅमेरात बंदिस्त करून घेतला. 2017 साली जन्मलेल्या आपल्या मुलाला सद्दाम पहिल्यांदाच भेटत होते.
 
सद्दाम यांनी या आनंदाच्या क्षणी एक ट्वीट करुन सर्वांना धन्यवाद दिले. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं, 'आभार ऑस्ट्रेलिया, सर्वांचे आभार.'
तीन वर्षांच्या विरहाची कहाणी
सद्दाम गेली दहा वर्षं ऑस्ट्रेलियात राहात आहेत. 2016 साली ते आपली प्रेयसी वुमाएरशी लग्न करण्यासाठी चीनला गेले होते. त्यानंतर ते 2017 साली ऑस्ट्रेलियात परतले. स्पाऊस व्हीसा मिळण्यापर्यंत त्यांची पत्नी चीनमध्येच थांबली. त्याच वर्षी त्यांच्या मुलाचा जन्म झाला. मात्र चीन सरकारने त्यांना व्हीसासाठी परवानगी दिली नाही.
 
मुलाच्या जन्मानंतर काही काळातच वुमाएर यांना ताब्यात घेतलं गेलं. त्यांना दोन आठवड्यांनी सोडलं पण पासपोर्ट जप्त केला गेला. त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं.
 
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन सरकारने सद्दाम यांची पत्नी आणि मुलाला सोडण्यासाठी अनेकदा विनंती केली, मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
 
सद्दाम यांच्या पत्नीला अद्याप ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व मिळालेलं नाही. परंतु सद्दाम यांनी विनंती केल्यानंतर त्यांच्या मुलाला ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व देण्यात आलं.
 
सद्दाम आणि वुमाएर यांचा विवाह चीनच्या कायद्यानुसार अमान्य आहे आणि वुमाएर यांनी चीनमध्येच राहाण्याची इच्छा दर्शवली आहे असं चिनी अधिकाऱ्यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात सांगितलं होतं.
 
ही गोष्ट त्यांनी ऑसट्रेलियातील एका टीव्ही कार्यक्रमात सांगितल्यावर सद्दाम यांनी आपल्या पत्नी आणि मुलाचा एक फोटो ट्वीट केला. या फोटोत वुमाएर यांच्या हातातील कागदावर, 'मला जायची इच्छा आहे आणि मला पतीबरोबर राहायचं आहे,' असं लिहिलं होतं.
 
मात्र यानंतरही या जोडप्याला सहा महिने आणखी वाट पाहावी लागली. त्यांचे वकील मायकल ब्रेडली यांनी बीबीसीला सांगितलं, "त्यांना चीन सोडता येऊ शकेल हे आम्हाला दोन तीन महिन्यांपूर्वी समजलं."
 
शुक्रवारी शांघाय- हाँगकाँग- ब्रिस्बेन असा 48 तासांचा प्रवास करून सिडनीला पोहोचल्यावर सद्दाम यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र खात्याला धन्यवाद दिले. यांनी आपल्या वकिलांसह माध्यमांप्रतीही आभार व्यक्त केले.
 
ते म्हणाले, "हा दिवस प्रत्यक्षात येईल असं वाटलं नव्हतं. प्रत्येक विगर माणसाला आपल्या कुटुंबाला भेटता यावं असं माझं स्वप्न आहे."
चीनवर आरोप
चीनने सुमारे दहा लाख विगर आणि इतर मुसलमानांना बंदिगृहात ठेवल्याचा आरोप मानवाधिकार संघटना करत आहेत. चीनने हे आरोप फेटाळले असून या शिबिरांमध्ये या लोकांना पुन्हा शिक्षित करून कट्टरवाद आणि धार्मिक कट्टरतेशी आपण लढत आहोत, असं चीन म्हणतं.