शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 मे 2023 (08:09 IST)

डोनाल्ड ट्रंप लैंगिक गैरवर्तनाप्रकरणी दोषी, कोर्टाने ठोठावला 50 लाखांचा दंड

Donald Trump
न्यूयॉर्कमधील एका न्यायालयाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना लैंगिक गैरवर्तना प्रकरणी दोषी ठरवलं आहे.
 
एका मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरलने ट्रंप यांच्यावर 1990 साली लैंगिक गैरवर्तनाचा तसंच खोटं ठरवून आपली बदनामी केल्याचा आरोप केला होता.
 
कोर्टाने कॅरल यांना नुकसानभरपाई म्हणून 50 लाख डॉलर देण्याचा निर्णय सुनावला आहे. अर्थात, एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये कॅरलवर बलात्कार केल्याच्या आरोपामध्ये कोर्टाने ट्रंप यांना दोषी ठरवलं नाहीये. कारण हे प्रकरण दिवाणी न्यायालयात सुरू होतं, क्रिमिनल कोर्टात नाही.
 
मॅनहॅटन फेडरल कोर्टात दोन आठवडे चाललेल्या सुनावणीला ट्रंप उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोपही फेटाळून लावले.
 
पुढच्या वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. तज्ज्ञांच्या मते ट्रंप यांच्या ही निवडणूक लढविण्याच्या मनसुब्याला या निर्णयामुळे खीळ बसू शकते.
 
ट्रंप यांचं निवेदन
कोर्टाने कॅरल यांना 50 लाख डॉलर देण्याचा निर्णय सुनावला आहे. यातील 30 लाख डॉलर हे नुकसानभरपाई म्हणून दिले जातील आणि 20 लाख डॉलर लैंगिक गैरवर्तनासाठीचा दंड म्हणून द्यायचे आहेत. 90 च्या दशकात ट्रंप यांनी हे वर्तन केल्याचं कॅरल यांनी म्हटलं होतं.
 
डोनाल्ड ट्रंप यांनी याप्रकरणी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरून प्रतिक्रिया दिली आहे.
 
त्यांनी म्हटलं आहे की, ही महिला कोण आहे याची मला कल्पना नाही. हा निर्णय म्हणजे अपमानच आहे.
 
ट्रंप यांच्या प्रवक्त्याने एक निवेदन प्रसिद्ध करून हे प्रकरण राजकीय हेतून प्रेरित असल्याचं म्हटलं. ही डेमोक्रॅटिक पक्षाची ‘ट्रंप’ यांच्याविरोधातील मोहीम असल्याचं म्हटलं आहे.
 
या निर्णयाविरूद्ध अपील करणार असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं आहे.
Published By -Smita Joshi