1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (15:42 IST)

हिजाबवरून इराण पेटले, महिलेचा पोलिस कस्टडीत मृत्यू

iran hijab issue
इराणमध्ये पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर देशात महिला ठिकठिकाणी निदर्शनं करताना दिसत आहेत. इराणमध्ये असलेल्या कठोर हिजाब नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 22 वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
 
पोलीस कस्टडीत असताना या महिलेचा मृत्यू झाला. त्या महिलेचा मृत्यू हा हृदयविकाराने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पण पोलिसांच्या अत्याचारामुळेच त्या महिलेचा मृत्यू झाला असावा असे लोक म्हणत आहे.
 
या घटनेचा निषेध करण्यासाठी इराणमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या आहेत आणि त्यांनी हिजाब जाळून आपला निषेध नोंदवला आहे.
 
गेल्या पाच दिवसांपासून इराणमध्ये निदर्शनं सुरू आहेत आणि याचा प्रभाव अनेक शहरांमध्ये दिसून आला आहे.
 
तीन दिवस कोमात राहिल्यानंतर 22 वर्षीय महसा अमिनीचं रुग्णालयात निधन झालं.
 
तेहरानच्या सारी भागात आंदोलक जमा झाले आणि त्यांनी हिजाब पेटवून निषेध व्यक्त केला.
 
अमिनी यांना इराणच्या मोरालिटी पोलिसांनी अटक केली होती. महिलांनी आपले केस हिजाबने पूर्णपणे झाकावेत आणि हात, तसेच पायांवर सैल वस्त्रं असावेत असा नियम आहे.
 
पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर अमिनी या कोसळल्या आणि नंतर त्या कोमात गेल्या.
 
पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या दंडुक्याने त्यांच्या डोक्यावर प्रहार केल्यानंतर त्या कोसळल्या असं म्हटलं जात आहे. त्यांना पकडल्यानंतर त्यांचं डोकं वाहनांवर आदळल्याचे वृत्त आहे असं युनायेटेड नेशन्सचे मानवाधिकार उच्चायुक्त नदा अल नशीफ यांनी म्हटले आहे.
 
अमिनी यांच्याशी गैरवर्तणूक केल्याचे पोलिसांनी फेटाळले आहे. अमिनी यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे त्यांनी सांगितले. पण अमिनींच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे की अमिनी या सदृढ होत्या.
 
ज्या भागात अमिनी राहत होत्या त्या कुर्दीस्तान भागात 3 निदर्शकांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.
 
इराणचे राष्ट्राध्यक्ष अयातुल्ला अली खमेनेई यांच्या सहकाऱ्यांनी अमिनी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जर काही नियमांचे उल्लंघन झाले असेल तर त्यावर कारवाई करून न्याय मिळवून दिला जाईल असे, त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले.
 
ज्येष्ठ खासदार जलाल रशिदी कुची यांनी मोरालिटी पोलिसांवर उघड टीका केली आहे. अशा प्रकारचे सैन्य निर्माण करणं ही घोडचूक होती, यामुळे इराणला केवळ नुकसानच सहन करावे लागले आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
 
हुकूमशाह मुर्दाबादच्या घोषणा
या निदर्शनांमुळे 38 जण जखमी झाल्याचे मानवाधिकार संघटना हेंगवाने सांगितलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की शनिवारी आणि रविवारी पोलिसांनी कुर्दिस्तान भागातील सागेज आणि सनांदाजमध्ये गोळीबार केला, रबरी गोळ्या चालवल्या, अश्रुधुराचा वापर केला.
 
महिलांनी आपल्या डोक्यावरील हिजाब काढून फेकले आणि हुकूमशहा मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. न्याय, स्वातंत्र्य आणि हिजाब सक्ती नसावी अशा घोषणा या महिलांनी दिल्या.