शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: टोकिओ , सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (16:02 IST)

जपानमध्ये शंभरी ओलांडलेल्या व्यक्तींच्या संख्येत वाढ

वयाची 100 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या जपानमध्ये वाढली असून ती 67,782 एवढी झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या 2000 ने अधिक आहे. विशेष म्हणजे या शतायुषी लोकांमध्ये महिलांचे प्रमाण 88 टक्के एवढे मोठे आहे, असे आरोग्य, श्रम आणि कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.
 
जपानमध्ये सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे, असे ‘एफे’या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. जपानमध्ये 1971 सालापासून दरवर्षी शंभर वर्षे पूर्ण केलेल्या लोकांची संख्या वाढत आहे. देशातील प्रगत आरोग्यमान आणि आरोग्याबद्दल जागरूकता अशा सुविधांमुळे ही संख्या वाढतच जाईल, अशी अपेक्षा मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
 
किकाई या बेटावर राहणारी नबी ताजीमा ही महिला 117 वर्षांची असून ती जपानमधील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे. तिचा जन्म ऑगस्ट 1900 मध्ये झाला होता. दक्षिण होकाइडो बेटावरील अशोनो येथे जन्मलेले मासाजो नोनाका (जन्म जुलै 1905) यांचे वय 112 वर्षे असून ते जपानमधील सर्वात वयोवृद्ध पुरुष आहेत.