शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2024 (08:30 IST)

कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष उमेदवारीसाठी चर्चा, मात्र त्या डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव करू शकतील?

Kamala Harris
शनिवारी (6 जुलै) दुपारी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस न्यू ऑरलेन्स येथील ब्लॅक कल्चरल फेस्टिव्हलमध्ये व्यासपीठावर बसल्या होत्या. त्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत होत्या आणि व्हाइट हाऊस मधील कामगिरीवर भाष्य करत होत्या.
 
या समारोहात पहिल्यांदाच एका कृष्णवर्णीय आणि दक्षिण आशियाई अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांनी गेल्या साडेतीन वर्षांत नियमितपणे हजेरी लावली आहे. नाहीतर फक्त राष्ट्राध्यक्षांच्या मागे राहण्यामुळे त्यांची भूमिका तुलनेने कमी असते.
 
तिकडे हजारो किलोमीटर दूर वॉशिंग्टनमध्ये डेमोक्रॅट पक्षाचे समर्थक 81 वर्षीय जो बायडन यांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी देऊ नये अशी मागणी करत होते.
 
कारण प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात त्यांनी अगदीच सुमार कामगिरी केली आहे. त्यामुळे हॅरिस यांच्यामागे फिरणाऱ्या पत्रकारांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे.
 
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आणि दौऱ्यावर असतनाही उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस यांनी बायडन यांनी उमेदवारी मागे घ्यावी का किंवा ते या पदासाठी फिट आहेत का या प्रश्नांना बगल दिली.
 
मात्र आपला मार्ग कसा चोखाळावा किंवा महत्त्वाकांक्षा पूर्ण कराव्या याबद्दल या कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रेक्षकांना लोकांचं बोलणं फारसं मनावर न घेण्याची सूचना केली.
“तुमच्या आयुष्यातील लोक तुम्हाला सांगतील की ही योग्य वेळ नाही. आता तुम्हाला संधी नाही. तुमच्यासारखं आधी कोणीही केलेलं नाही. त्यांचं अजिबात ऐकू नका,” त्या म्हणाल्या.
27 जून रोजी सीएनएनवर झालेल्या भीषण डिबेटनंतर त्यांनी त्यांचे बॉस बायडन यांची कायमच पाठराखण केली आहे.
 
डिबेटच्या व्यासपीठावर 90 मिनिटं काय बोलले यावरून त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीची समीक्षा करू नका, असं त्यांनी म्हटलं.
 
बायडन यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून आपणच राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार राहणार असल्याचं ठासून सांगितलं आहे.
 
तरी बायडन यांनी उमेदवारी मागे घ्यावी ही मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. काही उच्चपदस्थ डेमोक्रॅट्स 59 वर्षीय हॅरिस यांनी बायडन यांच्या जागी निवडणुकीला उभं राहण्याची मागणी करत आहेत.
 
रविवारी (7 जुलै) खासदार अ‍ॅडम श्चिफ यांनी कॅलिफोर्निया येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, बायडन यांनी दणदणीत विजय मिळवावा किंवा ही कमान कोणालातरी सोपवावी. कमला हॅरिस ट्रंप यांच्याविरोधात दणदणीत विजय मिळवतील असे ते म्हणाले.
 
यामुळे डेमोक्रॅट पक्षातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यात बायडन यांच्या निकटवर्तीयांचाही समावेश आहे.
 
2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत कमला हॅरिस यांना पहिलं मत पडण्याच्या आधी त्यांची उमेदवारी सिद्ध करता आली नाही. व्हाइट हाऊसमध्येही त्यांना फारसा ठसा उमटवता आला नाही आणि आपली छाप उमटवण्यास त्यांना बराच संघर्ष करावा लागला असं त्यांचं म्हणणं आहे.
 
याउलट डेमोक्रॅट पक्षाचे खासदार श्चिफ आणि दक्षिण कॅरोलिनाचे खासदार जिम क्लायबर्न यांचं हॅरिस यांच्या उमेदवारीला समर्थन आहे. तसंच पक्षाच्या मागणीला बायडन यांनी न्याय द्यावा अशीही मागणी ते करत आहेत.
 
हॅरिस यांचे समर्थक काही सर्वेक्षणांचा हवाला देत आहेत आणि त्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांपेक्षा निवडणुकीत चांगली कामगिरी बजावतील आणि ट्रंप यांच्याविरुद्ध विजयी होतील असं म्हणत आहेत. हॅरिस या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या आहेत, तसंच तरुण मतदारांना आकर्षित करणं आणि निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करणं हे निवडणुकीच्या चार महिन्यांआधी करता येईल असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.
 
हॅरिस यांना तिकीट मिळालं तर त्यांच्या कारकीर्दीला कलाटणी मिळेल. काही दिवसांपूर्वी त्या दुर्बळ असल्याचं व्हाइट हाऊसमधील ज्येष्ठ नेत्यांचं मत होतं. इतकंच काय तर बायडन यांनीही सुरुवातीच्या काही दिवसात त्यांचा उल्लेख ‘वर्क इन प्रोग्रेस’ असा केला होता.
मात्र हॅरिस यांचे माजी कम्युनिकेशन डायरेक्टर आणि दीर्घकाळापासून डेमोक्रॅटिक पक्षाचे रणनीतीकार असलेले जॅमल सिमन्स म्हणाले की हॅरिस यांना बऱ्याच काळापासून कमी लेखण्यात आलं आहे.
 
“त्या राष्ट्राध्यक्षांच्या सहकारी म्हणा किंवा या निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवार म्हणा, ट्रंप आणि रिपब्लिकन पक्षाने त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे.” असं सिमन्स यांनी बीबीसीला सांगितलं.
 
जेव्हापासून डिबेटचं प्रकरण झालं आहे तेव्हापासून कमला हॅरिस सातत्याने राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर आहेत. त्या बुधवारी एका अत्यंत उच्चस्तरीय बैठकीला हजर होत्या. या बैठकीत बायडन यांनी काही ज्येष्ठ डेमोक्रॅटिक गव्हर्नरबरोबर स्वत:च्या उमेदवारीबदद्ल चर्चा केली.
 
त्यानंतर चार जुलैला म्हणजेच अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाला हॅरिस यांनी त्यांची नेहमीची परंपरा मोडली. या दिवशी त्या अग्निशमन दलाच्या जवानांना आणि सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सना त्यांच्या लॉस एंजलिसच्या घरी हॉट डॉग खाऊ घालतात. मात्र यावेळी त्या बायडन यांच्याबरोब व्हाइट हाऊस येथील समारंभात उपस्थित होत्या.
 
तसंच हॅरिस यांनी त्या डिबेटनंतर ट्रंप यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. ट्रंप हे लोकशाहीला आणि स्त्रियांच्या हक्काला मारक आहेत त्यामुळे मतदारांनी त्यांच्यावर का विश्वास ठेवावा असा प्रश्न त्या विचारत आहेत. त्याचवेळी बायडन यांच्याप्रति असलेला पाठिंबा आणखी मजबूत केला आहे.
 
उपराष्ट्रध्यक्षांना कायमच महत्त्वाकांक्षा आणि निष्ठा यांच्यामधील संतुलन राखायचं असतं. मात्र या क्षणी राष्ट्राध्यक्ष आणि आपल्यात काही स्पर्धा किंवा मतभेद आहेत हे दाखवण्याची ही योग्य वेळ नाही याची त्यांना जाणीव आहे.
 
मात्र ज्याप्रमाणे चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे बायडन यांना कमला हॅरिस हा एकमेव पर्याय नाही. बायडन यांना पर्याय म्हणून अनेक उमेदवार आहेत. त्यात मिशिगनचे गव्हर्नर ग्रेचन व्हाईटमर, कॅलिफोर्नियाचे गर्व्हनर गेव्हिन न्यूजॉम, पेन्सेलव्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो आणि इलियॉनिसचे गव्हर्नर जेबी प्रिटझ्केर या लोकप्रिय गव्हर्नरचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वाहतूक सचिव पेट बटगिग, आणि कॅलिफोर्नियाचे खासदार रो खन्ना यांचाही समावेश आहे.
हॅरिस आणि त्यांच्या स्टाफने लोकांच्या अंदाजबांधणीबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र पडद्यामागे काय चर्चा सुरू आहे याची त्यांना पुरती जाणीव आहे कारण त्यांच्या पक्षाचे काही सदस्य एकवटले आहेत.
 
एक ऑनलाईन निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यात राजकीयदृष्ट्या दुर्बळ असुनसुद्धा त्यांनी निवडणूक का लढावी याबद्दल सविस्तर युक्तिवाद केला आहे.
 
त्यांच्याशिवाय आणखी कुणाची निवड केली तर निवडणुकीचा प्रचार भरकटेल आणि डेमोक्रॅटिक पक्ष फारसा महत्त्वाचा नाही हे प्रसारमाध्यमात सातत्याने येत राहील असंही या निवेदनात म्हटलं आहे.
 
बायडन यांनी उमेदवारी सोडली आणि हॅरिस यांना ती मिळाली तर डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना आणि त्यांच्यासारख्याच कृष्णवर्णीय नेत्यांना धक्का बसेल
 
“अशा परिस्थितीत पक्षाने हॅरिस यांच्यासाठी काम करावं” असं अमेरिकन संसदेतील आघाडीचे कृष्णवर्णीय नेते क्लायबर्न यांनी गेल्या आठवड्यात MSNBC ला सांगितलं.
 
बायडन यांच्या जागी हॅरिस या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार असतील असं रिपब्लिकन पक्षाचंही म्हणणं आहे.
 
साऊथ कॅरोलिनाचे खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी रविवारी इशारा दिला की रिपब्लिकन पक्षाने एका वेगळ्याच लढतीसाठी तयार रहावे कारण हॅरिस या उमेदवार होऊ शकतात.
 
ग्रॅहम म्हणाले की कॅलिफोर्नियातील प्रगितीशील नेत्या आहेत. त्या धोरणांच्या बाबतीत बायडन यांच्यापेक्षा डाव्या विचारसरणीच्या बर्नी सँडर्स यांच्याशी चांगले सूर जुळले होते. हॅरिस उमेदवार झाल्या रिपब्लिकन पक्ष त्यांच्यावर काय हल्ला करणार याची ही एक झलक होती.
 
डोनाल्ड ट्रंप यांनी डिबेट झाल्याच्या दिवसापासून त्यांची ‘संतापजनक’ अशी संभावना केली आहे
 
मात्र हॅरिस ट्रंप यांना पराभूत करू शकतील का हाच कळीचा प्रश्न डेमोक्रॅट्स आणि त्यांना देणग्या दोणाऱ्या लोकांसमोर आहे. या प्रश्नाचे उत्तर अनिश्चित आहे.
 
सीनएनएनने केलेल्या सर्वेक्षणाचा हवाला देत हॅरिस बॅकर्स यांनी सूचित केलं की नोव्हेंबरमध्ये निवडणुकीत त्या ट्रंप यांचा पराभव करू शकतात. अमोरासमोर झालेल्या सामन्यात त्या रिपब्लिकन पक्षापेक्षा दोन पॉइंट्सने पिछाडीवर होत्या. बायडन सहा पॉइंट्सने मागे होते. बायडन यांच्यापेक्षा हॅरिस यांनी उत्तम कामगिरी बजावल्याचे या सर्वेक्षणात समोर आलं आहे.
 
मात्र अनेक निवडणूक तज्ज्ञांचा या सर्वेक्षणावर विश्वास नाही. जर बायडन गेले आणि दुसरा उमेदवार आला तर मतदारांचा मूड बदलेल असं त्यांचं मत आहे.
एका निवडणूक तज्ज्ञाच्या मते हॅरिस यांच्या उमेदवारीने पक्षाच्या मतांमध्ये नक्कीच वाढ होईल पण त्या काय वेगळं काम करतील याबद्दल शंका आहे. ट्रंप आणि हॅरिस यांच्या लढतीबद्दलच्या सर्वेक्षणाला काही अर्थ नाही असं त्यांचं मत हे. त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर हे मत व्यक्त केलं कारण त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्याची परवानगी नाही.
 
हॅरिस यांची आई भारतीय होती आणि वडील जमैकन होते. कृष्णवर्णीय, लॅटिन अमेरिकन वंशाचे आणि तरुण मतदारांच्या सर्वेक्षणात त्या बायडन यांच्यापेक्षा आघाडीवर असतात. त्यांना जर उमेदवारी मिळाली तर या मतदारांना त्या आकर्षिक करू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
माज्ञ त्या तरुण कृष्णवर्णीय मतदारांना आकर्षित करू शकतील का हा सध्याचा अनिश्चित प्रश्न आहे. “आता फक्त वेट अँड वॉच इतकंच आपल्या हातात आहे” असं एक निवडणूकतज्ज्ञ सांगतात.
 
हॅरिस यांची प्रतिमा प्रगतिशील अशी आहे. त्यामुळे पेनसेल्व्हेनिया, मिशिगन आणि व्हिस्कॉन्सिन येथील ब्लू कॉलर मतदार गमावण्याची भीती आहे. या राज्यांमधून 2020 च्या निवडणुकीत बायडन यांना अगदी काठावर मतं मिळाली होती. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना इथून भरघोस मतं घ्यावी लागणार आहेत.
 
मग त्यांना तिकीट मिळावं का या प्रश्नाला उत्तर देताना काही डेमोक्रॅट्स म्हणाले की पेनसेल्व्हेनियाचे गव्हर्नर जॉश शापिरो किंवा नॉर्थ कॅरोलिनाचे गव्हर्नर रॉय कुपर यांना उमेदवारी द्यावी कारण यामुळे मध्य पूर्व राज्यांमधील सेंट्रिस्ट विचारांच्या मतदारांना आकर्षित करता येईल
 
ट्रंप आणि बायडन यांचं वय पाहता, दोन्ही पक्ष उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांवरही अधिक लक्ष केंद्रित करत आहेत, असं डेमोक्रॅटिक पक्षाच्या निवडणूक तज्ज्ञ सेलिंडा लेक यांचं मत आहे. त्यांनी 2020 मध्ये बायडन यांच्या प्रचारमोहिमेत काम केलं होतं.
 
रिपब्लिकन पक्षाचा विचार केला असता, ट्रंप यांनी अजून उपराष्ट्राध्यपदाचा उमेदवार निवडलेला नाही. ते नॉर्थ डॅकोटाचे गव्हर्नर डॉग बर्गम किंवा ओहायोचे खासदार जे.डी.वॅन्स यांची निवड करतील असा अंदाज आहे.
 
राष्ट्राध्यक्षापदाच्या निवडणुकीत हॅरिस यांची किती ताकद हा सुद्धा डेमोक्रॅट्ससाठी चिंतेचा विषय आहे कारण 2020 मध्ये पक्षातर्फे जो उमेदवार ठरवला जातो त्यात हॅरिस पराभूत झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बायडन यांच्यावर सुरुवातीच्या डिबेट्समध्ये टीका केली होती. पण पहिल्या आयोवा कॉकसच्या आधीच माघार घेतली होती.
टीकाकारांच्या मते हॅरिस स्वत:ला उमेदवार म्हणून सिद्ध करू शकलेल्या नाहीत. त्यांच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळाबद्दलही लोकांचं हेच मत आहे. त्यांची व्हाइट हाऊसमधील सुरुवात विस्कळीत झाली. अनेक मुलाखतीत त्या गोंधळल्या, स्टाफ आणि इतरांनीही त्यांचा लगेच स्वीकार केला नाही.
 
अमेरिकेच्या दक्षिण भागातील सीमेवर स्थलांतर रोखण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. मात्र ते कमी होण्याऐवजी गेल्या तीन वर्षांत ते सर्वात जास्त वाढलं आहे. निवडणूक प्रचारात तो एक मोठा मुद्दा होऊन बसला आहे.
 
त्यामुळे सार्वजनिक व्यासपीठावर जाताना त्या बऱ्याच सावध होऊन जात असत. अनेक मतदारांच्या मते त्या प्रभावहीन आहेत.
 
“लोकांना त्यांच्याविषयी अधिक माहिती हवी, कोणत्या आर्थिक मुद्यांची त्यांना माहिती आहे आणि त्यांनी काय काम केलं आहे याची लोकांना माहिती हवी.” असं लेक म्हणाले.
 
गेल्या वर्षांत मात्र त्यांनी प्रशासनावर पकड मिळवली. गर्भपाताच्या अधिकाराबद्दल बोलताना हे प्रकर्षाने जाणवलं. डेमोक्रॅट्ससाठी हा मुद्दा मिड टर्म निवडणुकीत यश देणारा ठरला आणि याच मुद्द्यावर ते नोव्हेंबरमध्ये अनेक मतदारांची मनं जिंकतील
 
कमला हॅरिस माजी वकील आहेत. त्यांनी लैंगिक अत्याचाराच्या अनेक केसेस हाताळल्या आहेत. ज्या महिलांचा बाथरुममध्ये गर्भपात झाला किंवा रुग्णालयाने ज्या बायकांना परत पाठवलं अशा स्त्रियांच्या कहाण्या सांगून त्यांनी मतदारांना या मुद्द्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला.
 
निवडणूक प्रचारात तरुणांच्या मुद्दयांनाही हात घातला. त्यात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाची माफी, हवामान बदल आणि बंदुकांमुळे होणारा हिंसाचार या मुद्द्यांचा समावेश होता. त्यामुळे व्हाइट हाऊसनेही हे मुद्दे मांडण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं.
 
तरीही मतदारांचं शंकानिरसन करण्यात त्या अद्याप अयशस्वी ठरल्या आहेत. फाईव्ह थर्टी एट या संस्थेने केलेल्या एका पाहणीत, त्यांच्याप्रति असलेला स्वीकार्हातेचा दर 37% आहे. बायडन आणि ट्रंप यांच्याइतकाच तो आहे.
पक्षाच्या दबावाला बळी पडून बायडन उमेदवारी मागे घेतली तर ठीक. अन्यथा सामान्य कार्यकर्त्यांनी सध्याच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला नकारच दिला आहे.
 
न्यू ऑरलेन्समध्ये झालेल्या इसेन्स फेस्टिव्हलमध्ये इयाम क्रिस्टियन टकर या 41 वर्षीय उद्योजिका आल्या होत्या. त्यांच्यामते उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचं नाही.
 
त्यांना कमला हॅरिस आवडतात. मात्र एखादी कृष्णवर्णीय स्त्री निवडणूक जिंकेल याची त्यांना खात्री नाही.
 
“मी काहीही झालं तर डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात मतदान करणार आहे.” असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
ग्रेह हॉवेल (67) यांनी मॅडिसन मध्ये बायडन यांच्या मॅडिसन, विस्कॉन्सिन येथे झालेल्या सभांमध्ये उपस्थिती नोंदवली. त्यांनी हॅरिस यांना 2020 मध्ये पाठिंबा दिला होता. आपण त्यांचे चाहते असल्याचे ते म्हणाले. तरी देशात स्त्रियांच्या विरोधात वातावरण असल्याचं ते म्हणाले.
“मला वाटतं की त्या उत्तम राष्ट्राध्यक्ष होतील, तरी मला वाटतं की बायडन जिंकतील” असं ते पुढे म्हणाले

Published By- Priya Dixit