बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 4 ऑगस्ट 2024 (12:46 IST)

इस्रायल-लेबनॉनमधील परिस्थिती चिघळली; 'मिळेल ते तिकीट घेऊन लेबनॉन सोडा', अमेरिकेचं आवाहन

Israel Hamas war
मध्यपूर्वेतील वाढता तणाव लक्षात घेऊन लेबनॉनची राजधानी बैरुत येथील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना मिळेल ते तिकीट घेऊन लवकरात लवकर लेबनॉन सोडण्यास सांगितले आहे.याआधी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांनीही असाच इशारा दिला होता. या भागातील परिस्थिती झपाट्याने बिघडू शकते, असे लॅमी म्हणाले होते.
 
भारतीय दूतावासाने 1 ऑगस्ट नागरिकांना लेबनॉनला जाणं टाळण्याचं आवाहन केलं आहे. तसेच लेबनॉनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना तात्काळ लेबनॉन सोडण्याचं आवाहन केलं आहे.
इराणची राजधानी तेहरान येथे झालेल्या एका हल्ल्यात हमासचे नेते इस्माईल हानिये यांच्या मृत्यूनंतर इराणने इस्रायलवर आरोप करत आम्ही इस्रायलविरुद्ध बदल घेणार असल्याचं सांगितलं होतं.
 
हिजबुल्लाचा कमांडर फुआद शुकर याची इस्रायलने हत्या केल्याच्या काही तासांनंतरच इस्माईल हानियेची हत्या करण्यात आली.
 
शनिवार-रविवारच्या मध्यरात्री (3-4 ऑगस्ट) रात्री हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलच्या बीट हिलेल भागात अनेक रॉकेट डागले.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये इस्रायलची आयर्न डोम यंत्रणा या रॉकेट्सना अडवताना दिसत आहेत. आत्तापर्यंत तरी कोणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
 
जॉर्डनच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही इशारा दिला असून त्यांनी जॉर्डनच्या नागरिकांना तात्काळ लेबनॉन सोडण्याचं आणि तिथे न जाण्याचं आवाहन केलं आहे.
 
कॅनडाने त्यांच्या नागरिकांना लेबनॉनला जाऊ नये अशी सूचना आधीच दिली असून, वाढता संघर्ष पाहता इस्रायलला जाण्याचं देखील टाळावं असं सांगितलं आहे. 'कोणत्याही क्षणी तिथली परिस्थिती खराब होऊ शकते' असं कॅनडाने बजावलं आहे.
इस्रायलला प्रत्युत्तर देत असताना इराणचे समर्थन असणाऱ्या हिजबुल्ला या संघटनेची महत्त्वाची भूमिका असू शकते अशा चर्चा आहेत.
 
अमेरिकेच्या दूतावासाने शनिवारी सांगितलं की ज्या नागरिकांना लेबनॉनमध्ये राहायचं आहे त्यांनी 'आपत्कालीन योजना' तयार ठेवावी आणि एखाद्या सुरक्षित ठिकाणी बराच काळ राहण्याची तयारी ठेवावी.
 
बऱ्याच एअरलाईन्सनी त्यांची लेबनॉनला जाणारी विमानं रद्द केल्याचं बोललं जात आहे, अनेक विमानांची तिकिटं देखील संपली आहेत. पण अजूनही लेबनॉन सोडण्यासाठी व्यावसायिक विमानं सुरु आहेत.
 
पेंटागॉनने सांगितलं की, इराण आणि इतर संघटनांकडून इस्रायलवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांपासून इस्रायलचं संरक्षण करण्यासाठी अमेरिका या प्रदेशात अतिरिक्त युद्धनौका आणि लढाऊ विमानं तैनात करत आहे.
यूकेने सांगितलं की नागरिकांना लेबनॉनबाहेर पडण्यात सहकार्य करण्यासाठी ते अतिरिक्त लष्करी कर्मचारी, कॉन्सुलर कर्मचारी आणि सीमा बल अधिकारी पाठवत आहेत. असं असलं तरी ब्रिटनच्या नागरिकांनी 'व्यावसायिक उड्डाणं सुरु असताना'च लेबनॉन सोडण्याचं आवाहन केलं आहे.
 
दोन ब्रिटिश लष्करी जहाजे आधीच या प्रदेशात आहेत आणि रॉयल एअर फोर्सने वाहतूक हेलिकॉप्टर स्टँडबायवर ठेवले आहेत.
 
लॅमी म्हणाले की "हा संघर्ष संपूर्ण प्रदेशात पसरणे कोणाच्याही हिताचे नाही".
 
दरम्यान, हमासच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार गाझामध्ये, विस्थापितांना आश्रय देणाऱ्या शाळेवर झालेल्या एका इस्रायली हल्ल्यात किमान 17 लोक हल्ल्यात ठार झाले आहेत.
 
इस्रायली लष्कराचं असं म्हणणं आहे की गाझा शहरातील शेख रदवान परिसरातील हमामा शाळेचा वापर दहशतवाद्यांसाठी कमांड सेंटर म्हणून केला जात होता. हमासने सार्वजनिक जागांचा वापर त्यांच्या कारवाईसाठी करत नसल्याचं सांगितलं आहे.
 
शनिवारी इस्रायलने त्यांच्या मंत्र्यांना सॅटेलाईट फोन देऊन घरी पाठवलं. जेणेकरून एखादा हल्ला झाला आणि संदेशवहनाची यंत्रणा कोलमडली तर त्यांना संपर्क साधता यावा आणि आपत्कालीन परिस्थितीत ते सुसज्ज असावेत.
एप्रिल महिन्यात इराणने इस्रायलवर हवाई हल्ला केला होता. 170 ड्रोन, 30 क्रूझ क्षेपणास्त्रं आणि किमान 110 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करून हा हल्ला करण्यात आला होता.
 
इस्रायलने सीरियातल्या दमास्कसमध्ये असणाऱ्या इराणी दूतावासावर केलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणने हा हल्ला केला होता. अनेकांना इराण यावेळीदेखील तसाच हल्ला करू शकतो अशी भीती वाटत आहे.
युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांच्याशी फोनवरून बोलताना इराणचे कार्यवाहन परराष्ट्र मंत्री अली बाकेरी कानी यांनी इस्रायलला शिक्षा देण्याच्या त्यांचा अधिकार असल्याचं सांगितलं आहे. इराण या अधिकाराचा नक्की वापर करेल असंही ते म्हणाले.
 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलच्या नागरिकांना इशारा देताना सांगितलं आहे की, "पुढचे काही दिवस आव्हानात्मक असतील. आम्ही सर्व बाजूंनी धमक्या ऐकल्या आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत."
 
इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाईट्सवर झालेल्या हल्ल्यात 12 लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतरच इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढला.
 
इस्रायलने या हल्ल्यासाठी हिजबुल्लाला जबाबदार ठरवत आम्ही या हल्ल्याला उत्तर देऊ असं सांगितलं होतं. हिजबुल्लाने मात्र या हल्ल्यात ते सहभागी असल्याचं नाकारलं होतं.
 
त्यानंतर काही दिवसांनी हिजबुल्लाचा कमांडर फुआद शुकर याची इस्रायलने बेरूतमध्ये हत्या केली. त्या हल्ल्यात फुआद शुकर यांच्याव्यतिरिक्त दोन लहान मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला होता.
 
त्यानंतर काही तासांनी हमासचे नेते इस्माईल हानिये यांची इराणमध्ये हत्या करण्यात आली. इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या अभिनंदन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ते इराणला आले होते.
 
इस्माईल हानिये यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात इराणचे सर्वोच्च नेते, अयातुल्लाह अली खोमेनी यांच्या नेतृत्वात नमाज पठण करण्यात आलं. त्याआधी इस्रायलला या हल्ल्याची कठोर शिक्षा भोगावी लागणार असल्याची शपथ खोमेनी यांनी घेतली होती.
Published By- Priya Dixit