मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: बुधवार, 6 नोव्हेंबर 2024 (19:22 IST)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्रातील लढवत असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध केला.या घोषणापत्रात 11 नवीन आश्वासने देण्यात आली आहे. 

या वेळी बारामतीतून अजित पवार, गोंदिया मधून राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल,नाशिकांतून ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, तसेच विविध मतदार संघातील उमेदवार दूरदृश्य प्रणालीतून उपस्थित असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला.या घोषणापत्रात लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपया पर्यंत वाढवण्यातअसल्याचे जाहीर केले.

शेतकऱ्याची कर्जमाफ होणार असून भात शेतकऱ्यांसाठी 25 हजार प्रति हेक्टरी बोनस देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात 45 हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन देण्यात आलेशिवाय अडीच लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रशिक्षणाद्वारे एक लाख विद्यार्थ्यांना दहा हजार मासिक स्टायपेंड देणार आहे.

अंगणवाडी आणि आशा वर्कर कर्मचाऱ्यांना 15हजार मासिक वेतन, सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देताना वीजबिल 30 टक्के कमी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर आळा, वृध्द पेंशन धारकांना महिन्याला 2100 रुपये अशी आश्वासनेही देण्यात आली आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुमारे 36 पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर महाराष्ट्रवादी घोषणापत्र असे छापण्यात आले आहे. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच लढवत असलेल्या मतदारसंघनिहाय पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सरकार स्थापनेनंतर 100 दिवसात नवीन महाराष्ट्राचे व्हिजन जाहीर करु असे बारामतीतून माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यात बदल घडवणाऱ्या योजने जनतेसाठी जाहीर केल्या असून त्या केवळ घोषणापूर्ती नसून त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

या योजनांमध्ये लाडकी बहीण योजना, 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, 52 लाख कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना मोफत शिक्षणाचा समावेश, गरीब, मध्यमवर्गीय, युवक, महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजनांचा समावेश करण्यात आला आहे. 
 
योजनांना फार मोठा प्रतिसाद राज्यातील कानाकोपऱ्यातून मिळाला आहे. विशेष म्हणजे या सर्व योजना कुटुंब असेल किंवा युवक, महिला-भगिनींना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. असे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit