रविवार, 5 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. ब्लॉग-कॉर्नर
Written By वेबदुनिया|

अदितीचं पुस्तकायन

- अभिनय कुलकर्णी

PRPR
मराठी ब्लॉगविश्वात फिरताना अनेक चांगले चांगले ब्लॉग सापडतात. पुस्तकायन हा त्यातलाच एक. अनुवादित साहित्य मराठीत हल्ली फार वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर येत आहे. या साहित्याची ओळख व काही साहित्यकृतींचा अनुवाद असे या ब्लॉगचे स्वरूप आहे. पुण्यात रहाणारी अदिती हा ब्लॉग लिहिते. अदिती स्वतः उत्तम वाचक आहे. त्यामुळे जे जे उत्तम तिला भावते, ते ती इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ब्लॉगमार्फत करते. या ब्लॉगवर आल्यानंतर दर्जेदार साहित्याचा आस्वाद घ्यायला मिळतो. शिवाय काय वाचले पाहिजे याचा संकेतही मिळतो. त्यामुळे जालावर भटकंती करताना हा ब्लॉग चुकवून चालत नाही.

अनुवादित साहित्याचे महत्त्व सांगताना अदिती म्हणते, ''सध्याच्या काळात परदेशगमन पूर्वीपेक्षा फारच सोपं झालं आहे. पण परदेशगमनाइतकंच मनोरंजक असतं ते परदेश समजून घेणं जे बरेचदा तिथे प्रत्यक्ष जाऊनही जमत नाही. पण परभाषांमधल्या उत्कृष्ठ साहित्यात ही किमया करण्याची शक्ती असते. त्या त्या प्रांतातल्या साहित्यकृतींमधून तिथल्या लोकजीवनाचं, त्यातल्या प्रेरणांचं,सुखदुःखाचं आणि एकूणच साऱ्या मानवी जीवनाचं एक प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. एक असं प्रतिबिंब जे खरं असतं. निर्मळ असतं. आपल्या मनातले विचार समाजातीत इतरांना सांगण्याच्या प्रक्रियेतून जन्माला आलेलं असल्यामुळे ते अतिशय प्रामाणिक, क्वचित रोकठोक सुद्धा असू शकतं. या साहित्याचा जर मुळातून आस्वाद घेता आला तर ते फारच छान असतं पण जगातल्या सर्वच भाषा सगळ्यांना येणं जे अशक्य आहे. म्हणून आपल्यासमोर पर्याय उभा राहतो तो भाषांतराचा.''

अदितीच्या ब्लॉगची सुरवात आनंदी आनंद गडे या लेखाने झाली आहे. अनुवादित साहित्य वाचण्याची आवड कशी लागली हे सांगणारा लेखही वाचनीय आहे. लहानपणी ग्रंथालयात गेल्यानंतर भा. रा. भागवतांनी आनंदी आनंद गडे या नावाने भाषांतरीत केलेल्या एका इंग्रजी पुस्तकाने अदितीचे लक्ष वेधून घेतले आणि हे हातात घेतलेल्या पुस्तकच तिच्या आवडीला कारणीभूत ठरले. जगन्नाथ कुंटे यांचे नर्मदेच्या परिक्रमेवरचे 'नर्मदे हर' हे पुस्तक खूप गाजले. या पुस्तकाविषयी अदितीने लिहिलेला लेख वाचनीय आहे. शिवाय तिला भावलेल्या काही पुस्तकांविषयी तिने जे काही लिहिलेय त्यावरून ती पुस्तके वाचण्याची नक्कीच ओढ निर्माण होते.

मार्जोरी किनन रेलिंग्ज या लेखिकेने लिहिलेल्या द यर्लिंग या पुस्तकाचे राम पटवर्धनांनी पाडस या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. हे पुस्तक काय आहे नि ते का आवडावे यावर अदितीने लिहिलेला लेख अगदी आवर्जून वाचावा असा आहे.

अदिती अनुवादित साहित्याच्या पुस्तकांची ओळख करून देण्यावरच थांबत नाही. तिनेही काही अनुवाद यावर पोस्ट केले आहेत. त्यातील जेफ्री आर्चरची 'डू नॉट पास गो' या कथेचा अनुवाद मस्त जमला आहे. याशिवाय ऑर्थर कॉनन डायल याच्या होम्सकथांचेही अदितीने अनुवाद केले आहेत. यातील प्रॉयॉरी स्कूल ही अतिशय रंजक व औत्सुक्यपूर्ण कथा अदितीने त्याच शैलीत अनुवादीत केली आहे. होम्सकथांची मोहिनी अदितीवर बरीच आहे. म्हणूनच त्याच्या आणखी एका कथेचा तीन विद्यार्थी म्हणून केलेला अनुवादही सरस उतरला आहे. याशिवाय नौदलाच्या कराराचा मसुदा, संत्र्याच्या बिया या होम्सकथाही वाचवल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

अदितीवर होम्सकथांचा प्रभाव एवढा का असावा याचे विश्लेषण तिनेच 'माझे हिरोज' नावाच्या लेखात केले आहे. त्यात ती म्हणते, ''डोक्यावर टोपी, तोंडात पाईप असलेली त्याची मुद्रा मलपृष्ठावर असलेलं ते पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं तेंव्हा त्याचं नाव मी नुसतंच उडत उडत ऐकलं होतं. त्याची थोरवी किंवा त्याचा 'बाप'पणा मला अजिबात माहीत नव्हता. तरीपण शंभर वर्षांपूर्वीच्या त्या कल्पनेतल्या खाजगी गुप्त पोलिसाने म्हणजे अर्थातच शेरलॉक होम्सने माझा पुरता कब्जा घेतला. आपण वाचतोय ते काहीतरी विलक्षण आहे हे मला जाणवलं. पण होम्स वाचल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया मला अजून आठवते. याला रेल्वेगाड्या वेळेवर कशा मिळतात? तारा अचूक पत्त्यावर कशा येतात? केवळ रेल्वे वेळापत्रक आणि आपलं घड्याळा एवढ्या गोष्टींच्या साहाय्याने तो आपला दिनक्रम कसा काय आखू शकतो?''

'माझे हिरो'ज हा अदितीने लिहिलेला लेख वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तिला आवडलेल्या लेखकांविषयी, पुस्तकांविषयी व त्यातील नायकांविषयी आहे. भा. रा. भागवतांच्या फास्टर फेणेपासून तर अगदी आताच्या हॅरी पॉटरपर्यंत अनेक हिरो तिला या वाचनाच्या प्रवासात भेटले. मधल्या काळात मृत्यूंजयमधील कर्ण, फाऊंटनहेडमधील रोआर्क हेही तिच्या मनावर ठसले. त्याविषयी अदितीने अगदी आसूसून लिहिले आहे. वाचन वैयक्तिकदृष्ट्या किती समृद्ध करणारा अनुभव असतो ते हा लेख वाचल्यानंतर कळते. आदितीचा ऍगाथा ख्रिस्तीच्या द सीक्रेट ऍडव्हर्झरी वरील परिचयात्मक लेखही उत्तम आहे.

अदितीचा ब्लॉग चुकवून चालत नाही, हे तिच्या ब्लॉगच्या या परिचयावरूनही कळलं असेलच. मग तिच्या ब्लॉगला भेट देणार ना?

ब्लॉग- पुस्तकायन
ब्लॉगर- अदिती
ब्लॉगचा पत्ता- http://pustakayan.blogspot.com/