रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. ब्लॉग-कॉर्नर
Written By वेबदुनिया|

नेत्रसुखद पक्षीजीवन

PR
मराठी ब्लॉगविश्वाचा परिघ चांगलाच रूंदावतोय. नवनवीन आणि वेगवेगळ्या विषयांचे ब्लॉग मायबोलीत सुरू झाले आहेत. नेटवर फेरफटका मारताना एक चांगला आणि वेगळ्या विषयावरचा ब्लॉग सापडला. मागे फुलपाखरांवरच्या युवराज गुर्जरच्या ब्लॉगची माहिती या सदरात दिली होती. यावेळी पक्ष्यांची माहिती देणार्‍या 'भटक्या विमुक्त उनाड' या ब्लॉगची माहिती देणार आहे.

या ब्लॉगचा लेखक आहे 'पम्या'. रहाणार शहर पुणे. आवड पक्षीनिरिक्षण आणि त्या पाठोपाठ येणार्‍या भटकंतीची. त्यामुळे हा ब्लॉग माहितीपूर्ण तर आहेच. पण तितकाच नेत्रसुखदही. पम्यातला पक्षीनिरिक्षक, भटक्या आणि उत्तम छायाचित्रकारही या ब्लॉगमधून दिसून येतो. २००६ मध्ये त्याने हा ब्लॉग सुरू केला. ब्लॉगवरच्या नोंदी विरळ असल्या तरी त्यात काही एक नियमितता आहे. मुख्य म्हणजे माहिती आहे.

सामान्यपणे आपल्याला पक्ष्यांविषयी फारशी माहिती नसते. असलीच तर ती आजूबाजूच्या रोजच्या वावरण्यातल्या पक्ष्यांचीच. त्यापलिकडे आपल्या माहितीचं आकाश विस्तारत नाही. पम्या मुळातच पक्षीनिरिक्षक असल्याने वेगळे पक्षी त्याच्या ब्लॉगमधून भेटायला येतात. पक्ष्यांची छायाचित्रे दाखवून पम्या थांबत नाही, तर त्यांची माहिती, वैशिष्ट्ये आणि त्याला आनुषांगिक अशी इतर माहितीही तो देतो.

  PR
वैशिष्ट्य म्हणजे माहिती देताना ती गद्य स्वरूपातच असली पाहिजे असेही नाही. उदा. त्याने बहिरी ससाण्याचा एक फोटो टाकून त्याच्याविषयी जुनून या म्युझिकल ग्रुपने तयार केलेलं गाणंच दिलं आहे. ससाण्याची वैशिष्ट्य त्यातून दिसून येतात. ससाण्याला हिंदीत शाहीन म्हणतात. या शाहीविषयी या गाण्यात म्हटलंय.
तू शाहीन है, परवाझ है काम तेरा, काम तेरा
तेरे सामने आसमां और भी है, और भी है

तू शाहीन है, बसेरा कर, पहडों की चट्टानों पर
तू शाहीन है! तू शाहीन है! तू शाहीन है!

ससाण्याचं किती मार्मिक वर्णन यात केलंय नाही? दरवर्षी रोहित अर्थात फ्लेमिंग पक्षी आल्याचं चित्र जवळपास सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतं. या पक्ष्याविषयी छान माहिती पम्यानं दिलीय. फ्लेमिंगो या नावाच खुलासा अनेकांना ते नाव अनेकदा उच्चारूनही माहित नसतो. फ्लेमिंगोला मराठीत अग्निपंख किंवा रोहित पक्षी असं म्हणतात. हा पक्षी उडत जाताना ज्वाळाच उडत जातेय की काय असे वाटते म्हणून Flamingo (Flame is going) असे त्याला म्हटले जाते.

  PR
महाराष्ट्रात दोन प्रकारचे फ्लेमिंगो दिसतात. एक ग्रेटर व दुसरे लेसर. लेसर फ्लेमिंगो मुंबईत शिवडी बंदरात आढळतात आणि ग्रेटर फ्लेमिंगो पुण्याजवळ, भिगवण, सातार्‍याजवळ मायणी, वीरेश्वर तलाव आदी ठिकाणी सापडतात, अशी माहिती तो देतो. त्याच्या स्थलांतराची कारणं म्हणजे अन्न हेच असल्याचंही त्याने नमूद केलंय. या पक्ष्याचे वेगवेगळ्या एंगलमधले फोटो इथे पहायला मिळतात.

सासवडच्या एका सफरीत आढळलेल्या पक्ष्यांची छान माहितीही त्याने दिलीय. त्यात क्वेल, वेडा राघू, होला, सिंगींग, बुशलार्क, विष्फुल्लिंग नर आणि मादी यांची अतिशय देखणी चित्रे या नोंदीत आहेत. विष्फुल्लिंग या पक्ष्याचे घरटे सापडल्यानंतर त्याचे निरिक्षण करण्याचा अनुभवही छान वाटतो. पक्षीनिरिक्षणातील काही संकल्पनाही या निमित्ताने समजून येतात. उदा. टाईम बजेटिंग करणं. टाइम बजेटिंग म्हणजे नर आणि मादी किती वेळ घरट्यावर असतात? किती वेळा अन्न आणले जाते? कोण भरवते? अंडी कोण उबवते? नर किती वेळ गाणी म्हणतो? या सगळ्याचा आलेख. 

  PR
कवडीपाट येथील पक्ष्यांचे आणि निसर्गाचे फोटोही अप्रतिम आहेत. सूर्योदयाचे फोटो म्हटलं म्हणजे डोंगरावरून टिपलेले किंवा समुद्रातून वर येणारा सूर्य डोळ्यासमोर येतो. पण पम्याने रेल्वे क्रॉसिंगवरून टिपलेला सूर्योदय निव्वळ अप्रतिम. लालिम्यातून उगवणारा तो पिवळाजर्द गोळा आणि त्याच्या किरणांच्या स्पर्शाने उजळलेले रेल्वेरूळ....अतिशय निराळा एंगल घेतला आहे.

पम्या पक्षीनिरिक्षक असल्याने दिसलेला पक्षी कोणता नि त्याचे कूळ खोदून काढण्याचा त्याला भलताच नाद आहे. या नादातून त्याने युवराज या पक्ष्याचे कूळ शोधून काढले. सिंहगडावर एकदा फिरायला गेला असताना त्याला युवराज हा पक्षी दिसला. सुरवातीला त्याचे नाव माहित नव्हते. उपलब्ध पुस्तकातही ते नव्हते. अचानक एका रद्दीवाल्याकडून घेतलेल्या पुस्तकात त्याला त्याचे नाव व इतर माहिती कळाली. ही माहिती देण्याची त्याची शैलीही छान आहे. युवराज या नर व मादी पक्ष्याविषयी लिहाताना तो म्हणतो,

''काळे कुळकुळीत पोट, चॉकलेटी पाय, चिलखत घातल्याप्रमाणे दिसणारे ब्रॉंझ रंगाचे पंख, जिरेटोपाची आठवण करुन देणारा तुरा, त्याचे ते छाती फ़ुगवून बसणे, डोळ्यातली ती चमक आणि एकूणच वागणे, सगळे एखाद्या "बिगडेदिल शहजाद्या" सारखे. हे वर्णन झाले नराचे.''

  PR
''मादी आपली बापुडी एखाद्या गरीब घरच्या शालीन, सोज्जवळ मुलीसारखी असते. रंगाने अगदी चिमणी, न तुरा, न तो डौल. भपकेबाज पणाचा पूर्ण अभाव. म्हणूनच की काय ही त्या राजपुत्रा मनात भरते. अगदी परस्परानुकुल जोडा आहे हा. अशा ह्या पक्षाला जजी एकदा पाहिल, आणि ह्याच्या प्रेमात न पडेल, तर ते त्याच्या/तिच्या मधील सौंदर्याभिरुचीचा अभाव दाखवते.''

सासवड भागात पम्या आणि त्याच्या टीमने रातवा या पक्ष्याला शोधून काढून त्याचे फोटो घेतले आहेत. त्याची माहितीही दिली आहे. हे सगळेच वाचायला मजा येते. यानिमित्ताने देणारी इतर माहितीही वाचकाच्या ज्ञानात भर घालणारी असते. उदा. आपण नेहमी बेचका या शब्दाचा वापर करतो. बेचक्यात अडकला वगैरे. पण बेचका म्हणजे काय तर झाडाच्या दोन फांद्या जिथून फुटतात, तो बेचका. पण त्याही पुढे जाऊन तीन फांद्या फुटतात त्याला 'तिचका' म्हणतात ही नवी माहितीही या ब्लॉगमध्ये वाचायला मिळते.

पक्षीजीवनाविषयी जाणून घेण्यासाठी आणि नितांतसुंदर, देखण्या आणि खिळवून ठेवणार्‍या छायाचित्रांसाठी या ब्लॉगला चुकवून चालणारच नाही.

ब्लॉगचे नाव- भटक्या विमुक्त उनाड- पम्या
ब्लॉगर- पम्या
ब्लॉगचा पत्ता- http://bhatavimuktaunad-pamya.blogspot.com