आजपासून सुरु होणार 15 स्पेशल ट्रेन, मुंबईतून आज सुटणार ‘स्पेशल’ राजधानी
करोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर २५ मार्चपासून बंद झालेली रेल्वेची प्रवासी वाहतूक आजपासून टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. सुरुवातीला नवी दिल्लीहून १५ राजधानी मार्गावर या फेऱ्या पूर्ण क्षमतेनिशी धावणार आहेत. १५ मोठ्या शहरांमधून या रेल्वेगाड्या धावतील.
रेल्वेने नवी दिल्लीतून देशभरातील विविध ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या एकूण ३० फेऱ्या चालवण्यासाठी रविवारी मंजुरी दिली गेली. या गाड्यांचे आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर ११ मे पासून सायंकाळी ४ वाजता सुरू झाले. मात्र या गाड्यांची माहिती मिळवण्यात व आरक्षण करण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. नंतर आरक्षण सुरू होताच गाड्या हाऊसफुल्ल झाल्या. १८ मे पर्यंतच्या या गाडीचे आरक्षण फुल्ल असल्याची माहिती रेल्वेने दिली.
दरम्यान, मुंबईतून पहिली गाडी आज मंगळवारी सुटेल. गाडी क्रमांक ०२९५१ मुंबई सेन्ट्रल येथून सायंकाळी ५.३० वाजता सुटणार आहे आणि नवी दिल्ली येथे बुधवारी सकाळी ९.०५ वाजता पोहोचेल.