शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (16:14 IST)

दिवाळीच्या बोनसमधून खर्चाचं नियोजन असं करा

सणासुदीचा हंगाम सुरू होताच कपड्याच्या दुकानांपासून ते किराणा दुकानांपर्यंत सर्वच वस्तूंवर सवलती मिळायला सुरुवात होते. आणि दिवाळीच्या काळात तर विचारूच नका.
 
पूर्वी अशा जाहिराती देण्यासाठी पत्रकं वाटली जायची किंवा लाऊडस्पीकरद्वारे जाहिराती केल्या जायच्या.
 
पण आजच्या भरभराटीच्या ई-कॉमर्सच्या जगात शू-स्टोअर्सपासून फॅशन स्टोअर्सपर्यंत प्रत्येकजण आपल्याला सणासाठी असलेल्या ऑफर किंवा सवलतींबद्दल माहिती देण्यासाठी फोनवर मेसेज करतात किंवा व्हॉट्सॲपवर माहिती पाठवतात.
 
अशावेळी जाहिरातींना भुलून मध्यमवर्गीयांचा आलेला सगळा बोनस खर्च होण्याची शक्यता जास्त असते. नियोजित खर्च करूनही, काहीवेळा तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करता. त्यामुळे कर्जाचा बोजा होण्याची शक्यता आहे.
 
अशा सणासुदीच्या काळात काटकसरीने खर्च कसा करायचा याबाबत अर्थतज्ज्ञ काही सल्ले देतात.
 
दिवाळी बोनसचे नियोजन कसे करावे?
सणासुदीच्या काळात पैसे वाचवण्याबाबत अर्थतज्ज्ञ सोमा वल्लीप्पन सांगतात की, गरज ओळखून खर्च करायला हवा.
 
"प्रत्येकाला पैशाची गरज असते. त्याचप्रमाणे, तो पैसा प्रत्येक गोष्टीसाठी उपलब्ध व्हायला हवा. मागणी असते आणि तेव्हा पैसे उपलब्ध होतात ही मोठी समस्या आहे."
 
"एखादी व्यक्ती दरमहा 10,000 रुपये कमावते. परंतु जर त्याचा मासिक खर्च 11,000 रुपये असेल आणि 10 महिन्यांनंतर त्याला सणासुदीचा बोनस म्हणून 40,000 रुपये मिळाले, तर त्याच्याकडे 30,000 रुपये असतील जे त्याने पुढच्या 10 महिन्यांसाठी नियोजन करून राखून ठेवले पाहिजेत. त्यातील निम्म्याहून अधिक पैसे त्याने साठवून खर्चाचे नियोजन केले पाहिजे."
 
एखाद्या व्यक्तीने त्याच्या बोनसच्या अर्ध्याहून अधिक पैसे राखून ठेवले पाहिजेत, याचं कारण स्पष्ट करताना सोमा वल्लीप्पन सांगतात, "पुढील महिन्यांत त्याचे उत्पन्न आणि खर्च यात एक हजार रुपयांची कमतरता असेल. त्यामुळे, त्याला मिळत असलेल्या पैशातून तो पुढील महिन्यांचा खर्च भागवू शकतो."
 
सणासुदीच्या काळात बोनस मिळाला म्हणून तो दिवाळीतच खर्च करायलाच पाहिजे असं नाही.
 
"आवश्यक खर्च करावा. थोडे पैसे खर्चासाठी ठेवले पाहिजेत आणि उरलेले पैसे बचतीसाठी ठेवले पाहिजेत."
 
बोनसचे व्यवस्थापन करताना काय करावं?
त्याचप्रमाणे अर्थतज्ज्ञ नागप्पन सांगतात की, सणासुदीच्या काळात लोकांनी त्यांचा खर्च कमी करण्यासाठी अगोदर लागणाऱ्या वस्तूंची यादी तयार करावी.
 
"जे लोक दिवाळी बोनसची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांनी त्या पैशातून खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची यादी तयार करावी. अशाप्रकारे यादी तयार करताना फक्त आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी कराव्या."
 
नागप्पन सांगतात की, "तसेच, जर आपण आधीच अशी यादी बनवली तर आपल्याला समजतं की यातल्या काही वस्तूंची आपल्याला गरजच नाहीये. अशावेळी पैशांची बचत होते."
 
त्याचवेळी काटकसरीच्या नावाखाली जीवनावश्यक वस्तूंची खरेदी टाळू नये किंवा पुढे ढकलू नये, असा इशाराही नागप्पन यांनी दिला.
 
"जर आपण काही वस्तू विकत घेत असू ज्याने आपली कार्यक्षमता वाढत असेल तर आपण जास्त विचार न करता त्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत."
 
पैसे कसे वाचवायचे?
अर्थशास्त्रज्ञ सोमा वल्लीप्पन आणि नागप्पन, दोघेही सांगतात की, जोखमीशिवाय पैसे वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सोन्यात गुंतवणूक करणे.
 
सोमा वल्लीप्पन सांगतात की, "पहिली पसंती सोन्याला द्यावी. त्यानंतर म्युच्युअल फंड गुंतवणुकीत कमी जोखीम घेऊन पैसे गुंतवावे. कर्ज असेल तर गुंतवणूक करण्यापूर्वी कर्ज फेडावे."
 
ते पुढे सांगतात की, "कर्जाच्या बाबतीत, गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज या दोघांमधील वैयक्तिक कर्जाची पहिल्यांदा परतफेड करावी."
 
कारण वैयक्तिक कर्ज ही पैशाची उधळपट्टी आहे. तर गृहकर्जाला आयकरातून सूट मिळते. त्यामुळे अशा प्रकारे कर्जाची परतफेड करणे ही देखील एक प्रकारे बचतच असल्याचं ते म्हणतात.
 
बचतीबद्दल बोलताना नागप्पन सांगतात, "सोने आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीव्यतिरिक्त तुम्ही सोने, रिअल इस्टेट, बाँड्स आणि शेअर बाजार यांचा समावेश असलेल्या वैविध्यपूर्ण गुंतवणुकीही करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची जोखीम कमी आहे आणि त्याच वेळी तुम्ही पैसे वाचवू शकता."
 
त्याचप्रमाणे, कर्जाच्या परतफेडीबद्दल बोलताना नागप्पन म्हणाले, "जर कर्जाचा व्याजदर 10% पेक्षा जास्त असेल तर कर्जाची परतफेड करणे चांगले."
 
"जर कर्जाचा व्याजदर 10% किंवा त्यापेक्षा कमी असल्यास, कर्जाची परतफेड करण्याऐवजी, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येऊ शकते."
 
शेवटी काय करायचं आणि जाहिरातींना किती बळी पडायचं हे तुमचं तुम्ही ठरवायला पाहिजे असं नागप्पन सांगतात.