गीतकार रोहित राऊत!
नितीन फलटणकर
लातूरच्या रोहित राऊतला आता कुणी ओळखत नसेल, असा महाराष्ट्रात तरी नक्कीच कोणी नसेल. झी टीव्हीच्या हिंदी आणि मराठी सारेगमपच्या ‘लिटल चँप्स’ या पर्वात रोहितने आपला ठसा उमटवला आहे. नुकत्याच झालेल्या मेगाचॅलेंजमध्येही तो सहभागी असलेला महाराष्ट्राचा ग्रुप विजयी ठरला आहे. यानंतर आता रोहित नवा अल्बम घेऊन लोकांसमोर येणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या या गप्पा... संगीतकार बनणे हे रोहितचे स्वप्न आहे. पण त्याच्या आगामी अल्बमचा गीतकारही तोच असल्याने या अल्बमविषयी विशेष उत्सुकता आहे. गोड गळा, संगीताची जाण या जोडीलाच आता गीतकार हीसुद्धा त्याची ओळख बनणार आहे. खरे तर लिटल चँप्सनंतर रोहित गाण्याकडे गंभीरपणे बघायला लागला. त्यातल्या शब्दांविषयी त्याची आवड वाढली. यातूनच एके दिवशी दोन ओळी सुचल्या, ‘काश मेरे जिंदगी में ऐसा कोई होता, जिसे सिर्फ मेरे लिए बनाया होता’ओळींमध्ये दम नसल्याचे मला वाटले. मी बाबांना सांगितले, ते म्हणाले, रोहित तू चांगले लिहू शकतोस. प्रयत्न कर. आणि पाहता-पाहता मी आठ हिंदी गाणी लिहिली, रोहित सांगत होता. मूळचे नागपूरचे असल्याने घरात हिंदी वातावरण आहे. याचाच फायदा हिंदीत गाणे लिहिण्यासाठी झाल्याचे तो सांगतो. पण मराठी गाणीही त्याला खूप आवडतात. वाचनाचीही प्रचंड आवड असलेला रोहित वेळ मिळेल तेव्हा फास्टर फेणे, बोक्या सातबंडे, ही पुस्तके वाचतो.
गुलजार यांच्या कविता त्याला खूप आवडतात. त्यांची गाणी त्याने अतिशय बारकाईनी ऐकली आहेत. आपल्यावर कोणत्याही लेखकाचा प्रभाव नसल्याचे रोहितचे म्हणणे आहे. रोहितच्या आगामी अल्बमची सर्व गाणी हिंदी आहेत. पण आवाज खुलत असल्याने त्यात बदल होत आहे. म्हणूनच सध्या त्याने गाणे बंद ठेवले आहे. नवीन अल्बमची तयारी सुरू झाली नसली तरी, आगामी वर्षभरात हा अल्बम आपण लॉंच करणारच असा निश्चय त्याने केला आहे. त्यामुळे किमान वर्षभर तरी या अल्बमसाठी वाट पहावी लागणार आहे.
आपल्या अल्बमविषयी आत्ताच काही लोकांसमोर यावे असे त्याला वाटत नाही. त्यामुळे त्याविषयी सध्या तरी काही बोलण्यास तो फार उत्सुक नाही. पुढील वर्षात त्याची दहावीची परिक्षा आहे. त्यामुळे सध्या तो त्याच्या अभ्यासत व्यस्त आहे. गीतकार ही त्याची नवी ओळख होणार असली तरी करीयर गायक नि संगीतकार म्हणूनच करायचे आहे, हेही त्याने आठवणीने सांगितले.