शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 22 जून 2016 (14:38 IST)

वडिलांनी दिला फिटनेसचा गुरुमंत्र - रीना वळसंगकर, अभिनेत्री

माझे वडील मधुकर वळसंगकर यांना बॉडी बिल्डींग आणि फिटनेसची आवड आहे. त्यांनी लहानपणापासूनच आमच्याही आरोग्याकडे पूर्ण लक्ष दिले. त्यांनी तारुण्यात अनेक शरीरसौष्टव स्पर्धेमध्ये अनेक खिताब मिळवले. त्यामुळे त्यांनी व्यायाम आणि फिटनेसची आवड आमच्यातही निर्माण केली. मला आणि माझ्या बहिणीला त्यांनी सर्वच बाबतीत मोकळीक दिली आहे. अगदी करियर निवडण्यापासून ते आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय घेण्यापर्यंत ते आमच्या पाठीशी उभे असतात. त्यांनी कधीही मुली असल्यामुळे आम्हाला बंधनात ठेवले नाही. शाळेत असतानाच स्वसंरक्षणासाठी स्विमिंग, जुडो याचेही प्रशिक्षण त्यांनी घ्यायला लावले. स्वतःच्या विचारांबाबत आणि आरोग्याविषयी जागरूक राहण्याचा गुरुमंत्र त्यांनी दिला आहे. बाबांच्याच पाठिंब्यामुळे आज आम्ही घडलो आणि स्वत:च्या पायांवर उभे आहोत.

वडीलांची खंबीर साथ आहे - दिपाली सय्यद - नर्तिका/ अभिनेत्री   
आज मी जे काही आहे ते माझ्या बाबांमुळेच. बाबांचा हात माझ्या आयुष्यात खूप मोठा आहे. मी ३ वर्षाची असताना बाबांनीच माझ्यातली नर्तिका सर्वप्रथम हेरली होती. त्यांनीच पुढाकार घेत मला डान्स क्लास मध्ये घातले. तसेच आठवीला असताना मला एलर्जेटिक अस्थमाचा त्रास होऊ लागला होता. अनेक हॉंमियोपॅथिक उपचार करूनही त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. अशावेळी माझ्या बाबांनी स्वतः अॅलोपॅथीचा अभ्यास करत, माझ्या आजारावर औषध बनवलं. व्यवसायाने कॉम्प्यूटर बोरिंग ऑपरेटर असणारे माझे बाबा माझ्यासाठी अॅलोपॅथीक डॉक्टर झाले. माझ्या प्रत्येक निर्णयाचा आणि पसंतीचा बाबांनी नेहमीच आदर केला. बॉबीसोबत लग्न करण्याच्या माझ्या निर्णयालादेखील त्यांनी विरोध केला नाही. मुस्लिम मुलाशी सोयरिक केली म्हणून समाज बोल लावेल, अशी भीती देखील त्यांना वाटली नाही. त्यांनी केवळ माझ्या सुखाचा विचार केला. असे हे माझे बाबा सदैव माझ्या पाठीशी खंबीर उभे असतात.  

बाबा माझे पहिले स्टाईल गुरु - चेतन चिटणीस, अभिनेता 
फादर्स डे हा एका दिवसासाठी मर्यादित राहू नये, तो दररोजच साजरा करायला हवा. आपले वडील रोज आपल्या सुखासाठी धडपडत असतात. बाबा आपल्या पाठीशी आहेत या एका भावनेमुळेच आपण निश्चिंतपणे हसत हसत जगत असतो. प्रत्येक मुलीचा आणि मुलाचा हिरो हे त्यांचे बाबाच असतात. तुम्ही त्यांच्याकडूनच जगण्याचा आदर्श घेत असतात. माझ्या बाबांच्या बाबतीत एक गमतीदार आठवण सांगायची म्हणजे मी त्यांना लहानपणापासून रेबेनचा गॉगल वापरताना पाहिले आहे. ते त्यात फारच हॅण्डसम दिसायचे. मलाही त्यांच्यासारखेच दिसायची इच्छा निर्माण झाली. माझे बाबाच माझे सर्वात पहिले स्टाईल गुरु आहेत. माझ्या आगामी 'फोटोकॉपी' चित्रपटासाठीही ते मला वेळोवेळी टिप्स देत आले आहेत. मी त्यांच्याकडूनच आता स्टाईलिश रहायला शिकलोय. 

वडिलांसोबत मैत्रीचे नाते - सिद्धार्थ मेनन, अभिनेता 
माझ्या वडिलांचे आणि माझे नाते वडील-मुलाचे नसून मित्रांसारखेच आहे. त्यामुळेच माझ्या आगामी '& जरा हटके' चित्रपटात भूमिका साकारताना मला सोपे गेले. अगदी खऱ्या आयुष्यातसुध्दा माझ्या बाबांमध्ये आणि माझ्या नात्यात खुलेपणा आहे. आमच्यात कोणत्याच गोष्टींचा आडपडदा नसतो. दोन मित्र एकमेकांशी ज्या मोकळेपणाने बोलतात, वागतात तसेच आम्ही नेहमी वागतो. मात्र ज्यावेळेस ते ऑफिसच्या कामाचा, किंवा इतर कोणत्या टेन्शनमध्ये असतात तेव्हा मी त्यांचा मित्र नसून मुलगा होऊन त्यांना समजून घेतो. प्रसंगी त्यांचा वडीलसुध्दा होतो. असे आमचे वडील-मुलगा-मित्र असे नाते आहे. ते माझे खरे हिरो आहेत.