जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदाच बेवसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस
रोहिणी हट्टंगडी हे नाव अख्ख्या चित्रपट सृष्टीला माहित आहे. हिंदी-मराठी फिल्म्स, सिरियल्स, नाटक या प्रत्येक ठिकाणी आपल्या अभिनयाची छाप त्यांनी सोडली आहे. आता त्यांना प्रथमच एका वेबसिरीज मध्ये पाहता येणार आहे. वननेस फिल्म्स निर्मित ‘रिलेशन कनेक्शन’ या वेबसिरीज मधील ‘आजीची पोतडी’ या लघुकथेत त्या दिसतील. आजकाल मोबाइल, सोशल मीडिया, व्हाट्सऍप च्या जमान्यात संवाद कुठे तरी हरवत चालला आहे आणि नक्की काय हरवत चाललं आहे हे या कथेमध्ये सहजतेने मात्र ठळकपणे मांडले आहे.
रिलेशन म्हणजेच नातं. ते कोणासोबत सुद्धा असू शकतं, कोणतही असू शकतं. एखाद्या व्यक्तीशी, वस्तुशी, प्राण्याशी किंवा स्वतःशीही. कधी आपण प्रेमात पडतो, मैत्री निभावतो, कधी अनोळखी व्यक्ती अचानक आपलीशी वाटू लागते आणि कधी कधी तर एखादी निर्जीव वस्तू आपली सोबती होते. काही घटना, सुख दुःखाचे प्रसंग आपल्या आजूबाजूला, आपल्या सोबत घडतात. अशाच काही कथा वननेस फिल्म्स निर्मित रिलेशन कनेक्शन या वेबसीरिज मध्ये तुम्ही पाहू शकता. सारा श्रवण, तेजस्वी पाटील, नवीन प्रभाकर, रोहिणी हट्टंगडी यांसारखे अनेक मराठी कलाकार या वेबसीरिज मध्ये तुम्हाला पाहता येतील. वननेस फिल्म्स व समर्थ क्रिएशन्स निर्मित या लघुकथेचे दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी केले आहे. अभिनव पाठक हे “आजीची पोतडी” लघुकथेचे निर्माते आहेत. साध्या, सोप्या, हळुवार पण लोकांना भावणाऱ्या अशा कथा करायला मला नेहेमीच आवडत असे दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी सांगितले.
याआधी वननेस फिल्म्स निर्मित लघुपटांनी विविध फेस्टिवल्स मध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. या वेबसीरिजने आपले वेगळेपण जपले आहे. सरळसाध्या आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशाच कथा या वेबसीरिज मध्ये सामाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. आजीची पोतड ही लघुकथा तुम्हाला वननेस फिल्म्सच्या यूट्यूब चॅनेल वर १ ऑगस्टपासून पाहता येईल.