मालिकावीर स्पर्धेत युवराजपुढे आफ्रिदी
मालिकावीर पुरस्काराच्या शर्यतीत भारताचा युवराजसिंहसुद्धा आहे. त्याला सहा गुण मिळाले आहेत. मात्र पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी युवराजपेक्षा एका गुणाने पुढे आहे. युवराजने इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरूद्ध तडाखेबंद फलंदाजी केली आहे. पाकिस्तानच्या संघातील मिसबाह उल हक, युनूस खान, शोएब मलिक यांनाही पाच गुण मिळाले आहेत. त्यामुळे तेही मालिकावीर पुरस्काराच्या स्पर्धेत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या स्टुअर्ट क्लार्कसह आफ्रिदी सर्वाधिक विकेट मिळविणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दोघांनी बारा बळी मिळविले आहेत. आफ्रिदी त्याच्या तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. पण स्पर्धेत आतापर्यंत त्याच्या फलंदाजीपेक्षा गोलंदाजीसाठीच तो ओळखला जातोय. सहा सामन्यात त्याने केवळ ९१ धावाच काढल्या आहेत. पण वैशिष्ट्य हे की या धावाही फक्त ४५ चेंडूतील आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने सर्वाधिक धावा केल्या आहेत.