शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (09:22 IST)

भारत-पाकिस्तान सामनाः कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच खेळणार भारतीय महिला क्रिकेट संघ

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंग या जेव्हा बर्मिंघमच्या एजबॅस्टन मैदानावर टॉससाठी उतरतील तो दिवस तब्बल 24 वर्षानंतर पुन्हा आला असेल. कारण कॉमनवेल्थ गेम मध्ये आता क्रिकेटचा पुन्हा प्रवेश झाला आहे.
 
कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेटचं आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ असेल. 29 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत जगातील आठ संघांची सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांसाठी लढत होईल.
 
याआधी 1998 च्या क्वालालंपूर कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुष क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं होतं. 50 ओव्हर्सच्या या सामन्यात 16 संघांनी भाग घेतला होता.
 
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुवर्णपदक, ऑस्ट्रेलियाने रौप्य आणि न्यूझीलंडने कांस्यपदक जिंकलं होतं.
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांनी यावेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेटचा समावेश केलाय.
 
यावेळी 20-20 ओव्हर्सचे सामने खेळवले जातील. यजमान संघ असल्याने इंग्लंड आपोआपचं पात्र ठरला आहे. सध्याच्या महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड सोडून पाच संघ वरच्या क्रमात आहेत. यात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे संघ आहेत. या संघांना आयसीसी महिला टी 20 क्रमवारीच्या आधारे एन्ट्री मिळाली आहे.
 
तेच श्रीलंकेच्या संघाने क्वालिफाईंग टूर्नामेंट जिंकून प्रवेश मिळवला आहे. वेस्ट इंडीज बेटांमधील बार्बाडोसच्या संघाला 2019 सालची टी-20 ब्लेझ टूर्नामेंट जिंकल्यामुळे प्रवेश मिळाला आहे.
 
बी ग्रुपमध्ये श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत तर ए ग्रुपमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस आणि पाकिस्तान हे संघ आहेत.
 
दोन्ही ग्रुपमधील अव्वल दोन संघ सेमिफायनल्समध्ये पोहोचतील. फायनल्स मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एका ग्रुपच्या टॉप संघाला दुसऱ्या ग्रुपमधील 2 क्रमांकावर असलेल्या संघाला हरवावं लागेल. दोन्ही सेमीफायनल्स हरणारे संघ कांस्यपदकासाठी लढतील.
 
बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटच्या माध्यमातून प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचा हा प्रयत्न मानला जातोय.
 
तसेच या गेम्सनंतर 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याच्या दाव्याला बळ मिळेल.
 
क्रिकेटची लोकप्रियता एवढ्या शिगेला पोहीचली आहे की, 31 जुलैच्या भारत आणि पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटं आधीच विकली गेली आहेत.
 
बर्मिंघममध्ये भारतीय आणि पाकिस्तानी वंशाचे लोक सुद्धा राहतात. त्यामुळे त्याचा परिणाम या सामन्यातही पाहायला मिळणार आहे.
 
पहिला सामना खूप कठीण असेल
शुक्रवारी होणारा पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होईल. ऑस्ट्रेलियन संघ सध्याचा टी 20 वर्ल्डकप विजेता आहे.
 
कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी 2022 चा वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाची निवड करण्यात आली आहे. वर्ल्डकप जिंकताना संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले मॅथ्यू मॉट आता प्रशिक्षक नसले तरी संघात तगडे प्लेयर्स आहेत.
 
महिला क्रिकेटच्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दरारा आहे. याचा अंदाज लावायचा असेल तर आजपर्यंत सात टी 20 वर्ल्डकप खेळवण्यात आले. यातले पाच तर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या नावावर आहेत.
 
त्यामुळेच बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये ऑस्ट्रेलियन संघ फेव्हरिट ठरतोय. संघाची कर्णधार मेग लॅनिंग टी-20 क्रमवारीत टॉप प्लेयर बनली आहे.
 
कॉमनवेल्थ गेम्सच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने दोन्ही सराव सामन्यांमध्ये आयर्लंडचा पराभव केलाय. खराब हवामानामुळे पाकिस्तानबरोबरचा सराव सामना होऊ शकला नाही.
 
तर दुसरीकडे टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील 2020 च्या उपविजेत्या भारतीय संघाला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच कोव्हिड संसर्गाचा फटका सहन करावा लागलाय.
 
दोन खेळाडूंना कोव्हीडची लागण झाल्यामुळे 13 खेळाडूंचा संघ बर्मिंघमला पोहोचला. त्यानंतर मेघना सिंग कोव्हिड निगेटिव्ह आल्यानंतर संघात सामील झाली आहे. पण ऑलराउंडर असलेली पूजा वस्त्राकर अजूनही बेंगळुरूच्या आयसोलेशनमध्ये आहे.
 
भारताचा संघ कसा जिंकू शकतो?
 
ओपनिंग बॅटर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा सोबत मेघना सिंगला बॅकअपमध्ये ठेवण्यात आलंय. तर पूजा वस्त्राकरचं संघात नसणं हा मोठा धक्का आहे.
 
2022 च्या वनडे वर्ल्डकपपासून ऑलराऊंडर खेळाडू असलेली पूजा वस्त्राकार ही संघाचा आधारस्तंभ बनली आहे. खालच्या ऑर्डरमध्ये जोरदार फटके लगावून आणि वेगवान विकेट घेण्याची क्षमता तिच्याकडे आहे.
 
नुकत्याच पार पडलेल्या तीन टी 20 सामन्यांच्या सिरीजमध्ये भारताने श्रीलंकेला 2-1 ने हरवलं. यामुळे भारतीय संघाचं मनोबल उंचावलय.
 
आता कॉमनवेल्थ मध्ये पण जर भारताला एखादं पदक मिळवायचं असेल तर त्यासाठी स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा खेळ महत्वाचा ठरणार आहे.
 
तेच श्रीलंकेविरुद्धच्या सिरीजमध्ये गैरहजर राहिलेल्या विकेटकिपर यास्तिका भाटिया आणि स्नेह राणासारख्या तरुण खेळाडूही आपला जोश दाखवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. संघात अनुभवी खेळाडू आणि तरुण जोश यांचा उत्तम मिलाफ साधून आलाय.
 
आणि जर विषय ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत असा असेल तर मग काही हाय व्होल्टेज सामने बघितलेच पाहिजेत, जे भारताचा उत्साह वाढवणारे आहेत.
 
2018 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 48 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर 2020 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव केला होता. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघ स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर होता.
 
पण मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर 86,174 प्रेक्षकांसमोर ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले.
 
टी 20 क्रिकेट सामन्यांमध्ये बऱ्याचदा ऑस्ट्रेलियानेच बाजी मारली आहे.
 
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 23 सामने झाले असून या 16 सामन्यांमध्ये भारताचा पराभव झालाय. तर भारताने केवळ सहाच सामने जिंकले आहेत.
 
असं असतानाही दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येतात तेव्हा क्रिकेटप्रेमींमध्येही उत्साह संचारतो.
 
ऑस्ट्रेलिया वगळता या ए ग्रुपमधल्या पाकिस्तान आणि बार्बाडोस यांच्या तुलनेत भारतीय संघ मजबूत दिसतोय.
 
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या 18 सामन्यांपैकी 10 सामने भारताने जिंकले आहेत. तर पाकिस्तानसोबतच्या 11 टी 20 सामन्यांमध्ये भारताने 9 वेळा विजय मिळवलाय. त्यामुळे भारतीय संघ सेमीफायनल्स मध्ये सहज प्रवेश मिळवेल अशी अपेक्षा आहे.
 
भारतीय महिला क्रिकेटमधील नवं पर्व
2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ एका नव्या पर्वाला सुरुवात करेल.
 
गेल्या दोन दशकांपासून भारतीय महिला संघाचे चेहरे असलेल्या मिताली राज आणि झुलन गोस्वामी या दोघीही आता निवृत्त झाल्या आहेत.
 
झुलन गोस्वामीने 2018 मध्येच टी 20 क्रिकेटला रामराम ठोकला होता.
 
मिताली राजने 2019 पासून टी 20 सामने खेळणं बंद केलं.
 
पण वन डे संघात या दोन्ही खेळाडू असल्याने बाकीच्या फॉरमॅटवरही याचा परिणाम दिसून आलाय.
 
या दोन्ही खेळाडूंच्या हजेरीत भारतीय महिला क्रिकेटने मोठं यश मिळवलं आहे. मग यात 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील टेस्ट मॅच जिंकणं असो किंवा 2006 मध्ये ऑस्ट्रेलियन ग्राऊंडवर पहिली टी 20 सीरिज जिंकणं असो किंवा 2006 मध्ये इंग्लंडच्या ग्राऊंडवर मिळवलेला विजय असो. संघाने या दोघींच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केली आहे.
 
मिताली आणि झुलन या संघाच्या आधारस्तंभ होत्या. धक्कादायक पराभवाच्या प्रसंगीही या दोघींच्या अनुभवाने संघ पुन्हा उभा राहिला.
 
आता या दोघींचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आक्रमक बॅटर हरमनप्रीत कौरवर येऊन पडली आहे. हरमनप्रीत कौरसुद्धा हातची संधी जाऊ देणार नाही.
 
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे सामने
29 जुलैला भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियन संघ असा सामना झाला. उद्या 31 जुलै रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे.
 
4 ऑगस्टला अंतिम लीग सामन्यात भारतीय संघाचा सामना बार्बाडोसशी असेल. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री साडेदहा वाजता सुरू होईल. दोन्ही सेमी फायनल्स 6 ऑगस्टला होतील. तर 7 ऑगस्टला फायनल मॅच आणि ब्राँझ मेडलसाठी मॅच होईल.
 
कॉमनवेल्थ गेम्समधले टी 20 सामने भारतातील सोनी ग्रुप चॅनलवर पाहता येईल. सोनी सिक्स, सोनी टेन 1, सोनी टेन 2, सोनी टेन 3, सोनी टेन 4 वर या सामन्यांचं प्रक्षेपण होईल. याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनीलिव वर बघता येईल.