शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2019 (15:16 IST)

टेस्ट मॅचेसचा वर्ल्ड कप होतोय! 'काय?'

ICC Test Championship: टेस्ट क्रिकेट वर्ल्ड कपचे वेळापत्रक, संघ आणि गुणतालिका
टेस्ट मॅचेसचा वर्ल्ड कप होतोय!  'काय?'
हो. खरंय हे.
 
येत्या 1 तारखेपासून वर्ल्ड चॅम्पियनशिपला औपचारिकदृष्ट्या सुरुवात होत आहे. तांत्रिकदृष्ट्या याचं नाव असेल ICC टेस्ट चॅम्पियनशिप. परंतु रुढार्थाने हा असेल टेस्टचा वर्ल्ड कप.
 
क्रिकेटचा सगळ्यात जुना फॉरमॅट म्हणजे टेस्ट क्रिकेट. वनडे आणि ट्वेन्टी-20च्या आक्रमणानंतर टेस्ट क्रिकेट कालबाह्य होणार अशी लक्षणं दिसू लागली. टेस्ट मॅचेसना असलेली उपस्थिती घटू लागली. टेलिव्हिजन चॅनेल्सच्या व्ह्यूअरशिपचे आकडेही घटू लागले.
 
हे सगळं लक्षात घेऊनच ICCने या फॉरमॅटचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं. म्हणून चारदिवसीय टेस्टचं आयोजन करण्यात आलं. आता टेस्ट चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येत आहे.
 
कशी होईल टेस्ट चॅम्पियनशिप?
याआधी ICCने टेस्ट फॉरमॅटची सर्वोच्च स्पर्धा असावी, असं योजिलं होतं. 2010 मध्ये अशा संकल्पनेला मंजुरीही देण्यात आली. 2013 आणि 2017 मध्ये अशी स्पर्धा होण्यासंदर्भात प्रयत्नही झाले, मात्र प्रत्यक्षात अशी स्पर्धा झालीच नाही.
 
आता ICC टेस्ट रेटिंगपैकी नऊ संघ या स्पर्धेत सहभागी होतील. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, वेस्ट इंडिज, पाकिस्तान यांना खेळण्याची संधी मिळेल. अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वे हे तीन संघ या स्पर्धेत नसतील.
 
नऊ संघांना घरच्या मैदानावर तीन तर प्रतिस्पर्धी संघाच्या देशात तीन मालिका खेळायच्या आहेत.
 
ICCच्या स्पर्धांमध्ये समान संधीचं त्रैराशिक असतं. म्हणजेच प्रत्येक संघाला खेळण्याची समान संधी मिळते.
 
मात्र या फॉरमॅटमध्ये तसं होणार नाही. प्रत्येक संघ बाकी अन्य संघांशी खेळणार नाही. आठ संघांपैकी प्रत्येक संघाला सहा संघांचाच सामना करायचा आहे.
 
म्हणजे भारतीय संघाला टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि इंग्लंडचा घरच्या मैदानावर सामना करायचा आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात जाऊन मालिका खेळायची आहे. टीम इंडियाला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध खेळायचं नाहीये.
 
याव्यतिरिक्त प्रत्येक संघाला समान सामने खेळायचे नाहीत. म्हणजेच दोन संघांदरम्यानची मालिका 2, 3, 4, 5 अशा कितीही सामन्यांची असू शकते. म्हणजेच एखादा संघ टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग म्हणून वीसपेक्षा अधिक सामने खेळेल तर एखादा संघ पंधरापेक्षा कमी सामने खेळू शकतो.
 
प्रत्येक मालिका 120 गुणांसाठी खेळली जाईल. मालिकेत कितीही सामने असले तरी त्यातून मिळणारे गुण 120 इतकेच राहतील. तीन होम सीरिज आणि तीन अवे सीरिज म्हणून एखादा संघ सर्वाधिक 720 गुणांचीच कमाई करू शकतो.
 
सर्वाधिक गुण असणाऱ्या संघांमध्ये 2021 मध्ये अंतिम मुकाबला रंगेल.
 
गुणांचं विभाजन कसं?
कमी टेस्ट खेळणाऱ्या तोटा होऊ नये तसंच अधिक टेस्ट खेळणाऱ्या विनाकारण फायदा होऊ नये, यासाठी प्रत्येक मालिका 120 गुणांसाठी नियंत्रित करण्यात आली आहे. मेख अशी टेस्ट जिंकण्यासाठी गुण देण्यात येतील. मालिकेचा निकाल प्रमाण राहणार नाही.
 
120 गुण सीरिजमध्ये टेस्ट मॅचेस किती यानुसार विभागले जातील. उदाहरणार्थ, 2 मॅचची सीरिज असेल तर प्रत्येक टेस्ट जिंकण्यासाठी 60 गुण असतील. एखाद्या संघाने दोन्ही टेस्ट जिंकल्या तर त्यांना 120 गुण मिळू शकतात.
 
टेस्ट मॅच टाय झाली तर दोन्ही संघांना प्रत्येकी 30 आणि टेस्ट मॅच ड्रॉ झाली तर प्रत्येकी 20 गुण देण्यात येतील. हरल्यानंतर एकही गुण मिळणार नाही. हेच सूत्र बाकी समीकरणांना लागू होईल.
 
म्हणजे 3 टेस्टची सीरिज असेल तर जिंकण्याकरता 40 गुण, टायकरता 20 गुण तर ड्रॉ करता 13.3 गुण मिळतील.
 
4 टेस्टची सीरिज असेल तर जिंकण्याकरता 30, टायकरता 15 तर ड्रॉकरता 10 गुण मिळतील.
 
5 टेस्टची सीरिज असेल तर जिंकण्याकरता 24 गुण, टायकरता 12, ड्रॉ करता 8 गुण मिळतील.
 
अॅशेस वर्ल्ड चॅम्पियनशिपचा भाग असेल का?
हो. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात रंगणारी पारंपरिक अॅशेस मालिका चॅम्पियनशिपचा भाग असेल. मात्र सगळ्याच मालिका चॅम्पियनशिपचा भाग नसतील.
 
दोन वर्षांच्या कालावधीत दोन संघ एकमेकांविरुद्ध ICC फ्युचर टूरचा भाग म्हणून खेळू शकतील. या मालिका टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नसतील.
 
टीका का होते आहे?
कारण जेतेपदासाठी प्रत्येकाला समान संधी मिळत नाहीये.
 
सगळे संघ अन्य सगळ्या संघांशी खेळणार नाहीत. प्रतिस्पर्धी विभिन्न असल्याने प्रत्येक संघासमोरचं आव्हान एकसमान नाही.
 
एखादा संघ बलाढ्य संघांचा सामना न करताच जेतेपदाकडे वाटचाल करू शकतो. दुसरीकडे एखाद्या छोट्या संघांना सगळ्याच मालिका बलाढ्य संघांविरुद्ध खेळाव्या लागल्यास त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो.
 
दुसरं म्हणजे, होम-अवे सिस्टिम.
 
काही संघ आपल्या मायदेशातच, घरच्या मैदानांवर जास्त मालिका खेळतील, जे तुलनेनं सोपं असतं. प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या मैदानात धूळ चारणं हे आव्हानात्मक असतं. घरच्या मैदानावर जास्तीत जास्त सामने खेळणाऱ्या संघाला फायदा मिळू शकतो.
 
दुसरीकडे सर्वाधिक सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात खेळणाऱ्या संघाला बॅकफूटवर राहावं लागू शकतं. घरच्या मैदानांवर जिंकलं तरी आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानांवर जिंकलं तरी गुण समानच मिळणार आहेत. प्रत्यक्षात अवे मॅच जिंकणं हे अधिक खडतर आहे.
 
फायनल कुणकुणात होणार, हे कसं ठरणार?
सगळ्या मालिका झाल्यानंतर ज्या दोन संघांचे सर्वाधिक गुण असतील, त्यांच्यात अंतिम मुकाबला रंगेल. हा सामना टाय किंवा ड्रॉ झाल्यास गुणतालिकेत या सामन्यापूर्वी अव्वल राहिलेल्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल.
 
भारतीय संघासमोर कोणतं आव्हान?
भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग म्हणून 18 सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि इंग्लंड भारत दौऱ्यावर येतील तर भारतीय संघ वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.
 
भारतकाचा वेस्ट इंडिज दौरा तर 3 ऑगस्टपासून सुरू होतोय.