गुरूवार, 25 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (23:43 IST)

परंपरा आणि ना‍वीन्य!

wedding gown
पूर्वी विवाहसमारंभासारख्या कार्यक्रमांना पारंपरिक पेहरावांना पसंती मिळत असे. तथापि, आता बदलत्या काळात पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न होताना दिसतो. यातूनच परंपरा आणि नवता यांचा सुरेख संगम असणारे फॅशनेबल कपडे बाजारात आले आहेत. मिडी, मॅक्सी, बेलबॉटम, पंजाबी ड्रेस, चुडीदार या फॅशनप्रवाहात बराच काळ मागे राहिलेली प्रकारची फॅशन लाँग स्कर्टच्या रूपाने पुन्हा एकदा चालू प्रवाहात आली. लाँग स्कर्टचे रूप, पोत, स्टाईल भलेही वेगळी असली तरी कन्सेप्ट आपल्या परकराशी जुळणारी. त्यानंतर चनियाचोळी, लाचा, शरारा या वेगवेगळ्या रूपात जुनीच परकर-पोलक्याची फॅशन पुन्हा एकदा चांगलीच रुळली.
 
एम्ब्रॉयडरी, नेट, बादलावर्क, आरसा वर्क अशा सगळ्या प्रकारांमध्ये लाचा-घागरा, शरारा हे प्रकार मिळत असले तरी त्या पोषाखाची नजाकत खर्‍या अर्थाने खुलते ते जरदोसी वर्कनेच. वर्कच्या कमी-अधिक प्रमाणानुसार मरगंडी, जॉर्जेट, अमेरिकन जॉर्जेट, सिक्सफोरफोर, मलई सिल्क असे वेगवेगळे कापडाचे प्रकार वापले जातात. वर्कचे ड्रेस गोल्डन, मरून, मोरपंखी, पोपटी लाल अशा रंगांमध्ये विशेष खुलत असले तरी ऑफ व्हाईट, बेबी पिंक, स्काय ब्ल्यू, राणी कलर अशा कोणत्याही शेडमध्ये हे ड्रेसेस उपलब्ध असतात.
 
कापडाचा प्रकार आणि वर्कच्या प्रमाणानुसार हजार-बाराशेपासून 15 ते 20 हजारांपर्यंत या ड्रेसेसच्या किमती असतात. वेगवेगळ्या सामाजिक परंपरानुसार लग्नासाठी महावस्त्र म्हणून शालू, पैठणी किंवा रेशमी साड्यांची खरेदी होत असली तरी रिसेप्शनसाठी मात्र नववधूला असाच पेहराव हवा असतो.