रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 27 जानेवारी 2020 (15:28 IST)

नागीण आजार, माहिती आणि औषधोपचार

"नागीण" हे नाव एकल्यावरच अंगाचा थरकाप उठतो. या आजाराविषयी समज कमी तर गैर समज जास्त आहे. नागिणीने विळखा मारला की जीवाला धोका असतो. खरं तर योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करता येतो. त्यासाठी योग्य वेळेस औषधोपचार करायला हवे. नागिणीचा आजार कशा मुळे होतो, त्याची लक्षणे, आणि त्यासाठीचे काय औषधोपचार आहे आणि काय काळजी घ्यावयाची असते हे जाणून घेऊ.....
 
नागीण होण्यामागील कारण
उन्हाळा सुरू झाल्यास वाढत्या तापमानामुळे साथीचे आजार पसरतात. या ऋतूत विषाणू जास्त पसरतात आणि सक्रिय असतात. लहान मुलांमध्ये कांजण्या होतात. लहानपणी होणाऱ्या कांजण्यांमुळे त्या आजाराचे विषाणू रुग्णात मज्जारज्जू मध्ये वास्तव्य करतात. शरीरातील रोग प्रतिरोधक शक्ती कमी झाल्याने हे सुप्त विषाणू जागृत होऊन नागिणीचा आजार पसरवतात. 
मधुमेह, प्रतिरोधक शक्ती कमी करणारे औषधे, एड्स, केमोथेरपी मध्ये वापरल्या जाणार्‍या औषधांमुळे शरीराची रोग प्रतिरोधक शक्ती कमी होते आणि नागिणीचा आजार उद्भवतो.
 
लक्षणे: 
1 नागीण होण्याआधी काही वेळेला त्या भागात दुखायला लागते.
2  त्वचा हुळहुळी होऊन त्वचेची आग होते.
3  या दुखण्यात प्रचंड आग होते.
4  चमका येतात.
5  2 -3 दिवसानंतर लाल पुरळ येतात. नंतर ते फोड बनतात, आणि त्या फोडांमध्ये पाणी होते.
6  ज्या नसेवर ते फोड होतात त्या नसेची त्वचा लालसर होते. 
 
नागिणीने विळखा मारला, किंवा दोन तोंडे एकमेकांना जुळले की जीवास धोका असतो असे गैरसमज आहे. पण ह्यात काहीही तथ्य नाही. नागीण ही शरीराच्या एका बाजूस येते, काही वेळेस एकाच नसेवर हा आजार होतो. इतर वेळेस दोन-तीन किंवा अधिक नसांना ह्या आजाराची लागवणं लागू शकते. वेळेवर उपचार केल्यास रुग्ण पूर्ण पणे बरा होतो. या आजाराची लक्षणे दिसल्यास 
त्वरित 48 तासातच वैद्यकीय उपचार घेतल्यास रुग्ण 5 -7  दिवसांत पूर्णपणे बरा होतो.
 
काही जणांचा गैरसमज असतो की या आजारांवर औषधोपचार नाही त्यामुळे ते घरगुती किंवा अन्यत्र उपाय करतात. दूर्वा, जळालेले खोबरे, तांदळाचा लेप लावतात. त्यामुळे जखम चिघळते आणि आजार पसरतो, दुखणे लांबणीला जाते. त्रास वाढतो.
 
उपचार :-
1 नागीण झाल्याचे लक्षात आल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ल्याने औषधोपचार करावे.
2  गोळ्यांचा पूर्ण डोस घ्यायलाच हवा.
टीप :- गरोदरपणात हा रोग झाल्यास पण हे औषधे घेता येते. काही दुष्परिणाम होत नाही. 
 
या आजारात घ्यावयाची काळजी :-
1 जास्त दगदग टाळावी
2  हलका आहार घ्यावा
3  अंघोळी नंतर जागा टिपून घ्यावी
4  स्वतःचे कपडे, साबण, अंथरूण, पांघरुणं, वेगळे ठेवावे
5  स्वच्छता बाळगावी