सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (14:45 IST)

गरोदरपणातील आहार कसा असावा जाणून घ्या

गरोदरपणी गर्भाचे पोषण हे आईच्या अन्नावरच होत असते. त्यामुळे आईने दीडपट आहार घेतला पाहिजे. पण जेवणाच्या वेळी गच्च पोट भरून जेवू नये. दोन घास कमीच खावेत. त्यामुळे पचनात अडचण येत नाही. थोडे थोडे करून 3-4 वेळा खावे.
 
भाकरी किंवा पोळी तसेच मेथी, शेपू, करडई, अळू, शेवगची पाने, अगस्तीचा पाला, आंबटचुका, पानकोबी, राजगिरची भाजी, कोथिंबीर, पालेभाजी जेवणात असलीच पाहिजे. कोणत्याही डाळीचे वरण किंवा आटी जेवणात असावी.
 
मटकी, मूग, हरभरा, चवळी, वाटाणा यापैकी कशालाही मोड आणून त्याची उसळ रोजच्या जेवणात असावी. गवार, दोडका, घोसावली, भोपळा अशा प्रकारच्या फळभाज्याही मधून-मधून जेवणात असाव्यात. मुळा, गाजर, बीट, टोमॅटो, काकडी वगैरे कच्चे खाणे चांगले. रोज दूध सकाळी व संध्याकाळी प्यावे.
 
पेरू, चिकू, केली, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी अशा प्रकारची फळे खावीत. जांभूळ, करवंद, बोरं, आवळा, कवठ ही फळेही आरोग्याच्या दृष्टीने चांगली असतात. मटण, मासे, अंडी, यापैकी काहीतरी जेवणात असावे. असा आहार समतोल आहार होईल.
 
मटण, मासे, अंडी असा आहार गरोदरपणात घ्यायला सांगतात. मग शाकाहारी लोकांनी काय करावे? शाकाहारी लोकांनी जेवणात कोणत्याही डाळीचे घट्ट वरण आणि मोड आलेली मटकी, दूध, हरभरे, भूईमुगाचे दाने, मूग, वाटाणे, सोयाबीन अशी कडधान्ये खाल्यास आवश्क ती प्रथिने मिळतात. मग मटण, मासे, अंडी घ्यायची गरज नाही.
 
गरोदर स्त्रीने ताजे अन्न खावे. 3-4 वेळा थोडे-थोडे करून जेवावे. एकावेळी पोटभर जेवू नये. 4 घास कमी खावेत. म्हणजे अन्न नीट पचते. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. दिवसभरात साधारणपणे 4-5 तांबे पाणी प्यावे. बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घ्यावी.