सर्व मातांना मातृदिनाच्या खूपखूप शुभकामना....
भारतामध्ये श्रावण अमावस्येच्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. आपल्या आईबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भारतीय संस्कृतीमध्ये मातेच स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. माता ही आपली सर्वश्रेष्ठ गुरु मानली गेली आहे.
ह्या दिवशी आई मुलांना वाण देते आणि मुलं आईच्या पाया पडुन आशिर्वाद घेतात ही खरी आपली पारंपारिक परंपरा ” आई – मुलाचं ” नातं म्हणजे ” विश्व ” आणि म्हणूनच मदर्स डे सेलिब्रेट करण्यापेक्षा पिठोरी आमवस्येच्या दिवशी तरी आईला पाया पडा , खरं तर आई – वडीलांना रोज पाया पडण हे मुलांच कर्तव्य पण हल्ली ते घडत नाही.
ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी मातेची महती वर्णन केलेली आहे. तिला सर्वांहून अधिक घनिष्ट आणि प्रिय मानले गेले आहे. अथर्ववेदामध्ये ‘मात्रा भवतु सम्मना:’ पुत्राने मातेला अनुकूल असा मनोभाव धारण करून राहावे असे सांगितलेले आहे. प्राचीन काळी गुरुकडील अध्ययन पूर्ण झाल्यानंतर शिष्याला निरोप देताना आचार्य उपदेश करीत असत. त्यात “मातृदेवो भव” मातेची देवाप्रमाणे पूजा कर असे सांगत असत. वसिष्ठाने मातेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना पुढीलप्रमाणे म्हटले आहे –
“दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे. शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आहे आणि एक सहस्र पित्यांपेक्षा एक माता ही अधिक श्रेष्ठ आहे.”
धर्मसूत्रांनी मातेची सेवा-शुश्रूषा आणि तिचे भरणपोषण हे पुत्राचे आवश्यक कर्तव्य म्हणून सांगितलेले आहे. गौतम ऋषींचा पुत्र चिरकारी याने मातृमहात्म्याचे सुंदर चित्र इंद्रापुढे उभे केले होते.
नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति:|
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया||
मातेसारखी छाया नाही, मातेसारखे आश्रयस्थान नाही, मातेसारखे रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय कुणीही नाही.
सर्व मातांना मातृदिनाच्या खूपखूप शुभकामना