शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 17 एप्रिल 2018 (10:03 IST)

मोरपिसे मनातली..

अलक..१
काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले मला .
मंजू काणे©
 
अलक...२
खूप दिवसांनी माहेरपणाला आलेली नणंद tv सिरीयल पहाता पहाता वहिनी ला म्हणाली वहिनी किती मायेने करता तुम्ही माझे , तर वहिनी म्हणाल्या अहो तुम्ही पण माहेरी समाधानाचे वैभव उपभोगायलाच येता की . सिरीयल मधल्या नणंदेसारखी आईचे कान भरून भांडणे कुठे लावता . मग मी तरी काय वेगळे करते. 
रिमोट ने tv केंव्हाच बंद केला होता.
मंजू काणे©
 
अलक.. ३
तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच
5000 चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला , म्हणाला लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता , माझा दोस्त बरा झाला की छानसी साडी घ्या.
त्या पाकिटा पुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.
मंजू काणे©
 
अलक..४
आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावतपळत घर गाठले तिने , स्वैपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.
मंजू काणे©
 
अलक..५
तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाईच्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती . त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.
मंजू काणे ©