शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (15:30 IST)

"झाकलेली मूठ सव्वालाखाची"... म्हणून ही म्हण रुजू झाली

एकदा एका राज्यात एक राजा असतो. तो एके दिवशी आपल्या राज्याच्या देऊळात पूजा करण्याचा विचार करतो. आणि दवंडी पिटवतो की मी अमुक दिवशी देऊळात पूजा करण्यासाठी येणार आहे. राजा पूजेसाठी देऊळात येणार असे त्या देऊळाच्या पुजाऱ्याला कळतं. तो पुजारी त्या देऊळाची रंगरंगोटी करण्यासाठी सहा हजार रुपयांचे कर्ज काढतो आणि देऊळाची साज सजावट करतो. 
 
ठरलेल्या दिवशी राजा त्या देऊळात पूजेसाठी येतो आणि पूजा झाल्यावर दक्षिणाच्या स्वरूपात फक्त चार आणे ठेवतो. पुजाऱ्याला हे बघून राजा वर फार राग येतो. 
 
तो विचारात पडतो की आपण तर हा राजा देऊळात पूजेसाठी येणार म्हणून कर्ज काढून देऊळाची साज सजावट केली आणि या राजाने दक्षिणेत काय ठेवले तर फक्त चार आणे. असे करून या राजाने माझा अपमानच केला आहे. या राजाला आता मी सडेतोड उत्तरच देणार. 
 
तो पुजारी फार हुशार होता. राजा गेल्यावर त्याने ते चारआणे उचलून आपल्या मुठीत ठेवले आणि बाहेर येऊन सर्वांना सांगू लागला की आत्ता राजा पूजेसाठी आलेले असून त्यांनी देणगी म्हणून जे दिले आहे ते मला सांभाळता येणार नसून मी त्याचा लिलाव करीत आहे. आणि ती वस्तू मी माझ्या मुठीत ठेवलेली आहे.जो सर्वात जास्त बोली लावणार मी ती वस्तू त्यालाच दाखवणार आणि देणार. 
 
सर्वांनी विचार केला की राजाने देणगीत दिलेली वस्तू काही साधी सुधी नसून खासच असणार. लोकांनी बोली लावण्यास सुरुवात केली. पहिली बोली दहा हजार पासून सुरु झाली. परवडत नाही असे म्हणत पुजाऱ्याने नकार दिले. हळू-हळू लिलावात बोली वाढत वाढत पन्नास हजार पर्यंत पोहोचते.
 
इथे ही गोष्ट राजा पर्यंत देखील त्याचे पहारेकरी पोहोचवतात. ते त्याला सांगतात की महाराज आपण देऊळात दिलेल्या वस्तूचा लिलाव देऊळाचा पुजारी करीत आहे आणि ती वस्तू त्याने आपल्या मुठीत डांबवून ठेवली आहे तो कोणालाही ती दाखवत नाही. आणि काय वस्तू आहे ती सांगत देखील नाही. राजाला ही गोष्ट कळतातच तो आपल्या पहारेकरांना त्या पुजाऱ्याला बोलवायला सांगतो. पुजारी येतातच तो त्या पुजाऱ्याकडे जाऊन म्हणतो की ''बाबा रे मी तुला सव्वा लाख देतो पण तू तुझी मूठ झांकलेलीच ठेव" असे म्हणत राजा पुजाऱ्याला त्या मुठीचे सव्वा लाख देतो. पुजारी ते पैसे घेऊन आपल्या घरी येतो आणि आनंदात राहू लागतो. 
 
तेव्हा पासून ही म्हण म्हणायला सुरुवात झाली. "झाकलेली मूठ सव्वालाखाची"