मला आजही आठवतोय तो दिवस ज्या दिवशी तुला अखेरचं पाहिलं मी. अखेरचं बोलणं झालं तुझ्याशी. जात, धर्म, जग संस्कार, आई-वडील यांच्यासाठी आपण आपल्या प्रेमाची होळी केलेला दिवस मला आजही आठवतोय... आठवतंय का तुला? मी एकदा तुला म्हणालो होतो, आयुष्यात मी कधी मनातून रडेल ठाऊक आहे का तुला? तू अचंबित होऊन म्हणाली होतीस, ‘केव्हा रडशील?’ आणि मी हसत म्हणालो होतो, तुझं लग्न होईल त्या दिवशी.. व लगेच आपल्यात पसरलेली शांतता, तुझ्या ओल्या झालेल्या पापण्या मी कसा विसरेन? मला आजही तो क्षण तसाच आठवतोय...
आयुष्य जर खेचून मागे घेता आलं असतं तर मी ते क्षण आजच परत आणले असते. दोन वर्षे एकाच वर्गात शिकूनसुद्धा तुला कधीच काही बोलू न शकलेला मी. तुझ्याबद्दल मनात प्रेम दडवून बसलोय हे तुला शेवटी कळालंच व देवाने आपल्याला एकत्र आणलं. तूही अगदी भरभरून प्रेम दिलंस. जेव्हा तू आपल्या त्या ठरलेल्या ठिकाणी भेटायला यायचीस तेव्हा मला नेमका उशीर व्हायचा नाही का? मग मला ठाऊक असायचं की तू रुसली असणार, म्हणून मी येताना सोबत चॉकलेटस् आणायचो. तुला चॉकलेटस् आवडायची मला माहीत होतं. आणि मग आपण कुठे तरी निवांत ठिकाणी बोलत बसायचो. तुझ्या खाल्लेल्या त्या चॉकलेटस्पैकी एका चॉकलेटस्चं कव्हर मी तुझ्या नकळत खिशात घालायचो. त्या चॉकलेटस्ची खूपशी कव्हर्स आजही माझ्याकडे आहेत. कारण त्यांना कधी तुझा स्पर्श झाला होता म्हणून. जेव्हा तू सोबत असायचीस मला हे जग ठेंगणं भासायचं. तुझा आणि तुझ्या ओढणीचा स्पर्श मला हवा हवासा वाटायचा हे तुला तेव्हा सांगायचं राहूनच गेलं होतं. तुझा मिस कॉल आला की ते आपलं तासन् तास बोलणं माझ्या मित्रांना कंटाळवाणं वाटायचं. म्हणून मी त्यांना लगेच बाजू द्यायचो. दिवसभर फोनवर एकमेकांशी बोलूनही काही तरी राहिल्यासारखं वाटायचं ना. मग मध्यरात्रीपर्यंत आपले शब्दही आपली साथ सोडायचे नाहीत. ते मनातून केलेलं खरंखुरं एकमेकांवरचं प्रेम मला आजही आठवतं. कधी एकमेकांकडे मनं वळली, कधी एकमेकांची झाली कळलंच नाही ना! धर्म, जात, जग काहीच आडवं आलं नाही आपल्या प्रेमाच्या...
मग जेव्हा मी तुला लग्नाबद्दल विचारलं, तुझ्या ओठातून नकार व डोळ्यांतून पाणी का यावं? आपली मनं एकमेकांशी इतक्या अतूट प्रीतीच्या बंधनात जोडली गेलेली असताना समजा, जाती-धर्म यांच्यासारखी प्रश्नचिन्हं का निर्माण व्हावी? आकाश, मी शेवटपर्यंत तुझीच आहे रे वेड्या, पण आपलं प्रेम जगाला व समाजाला कधीच मान्य होणार नाही. हे आपलं प्रेम आपल्या घरचेही कधीच मान्य करणार नाहीत. कधीच स्वीकारणार नाहीत... हे तुझे शब्द आणि त्या शब्दांबरोबरच आपल्या डोळ्यांत वाहणा-या श्रावणधारा मी कसा विसरेन. त्या दिवशी आपलं हे झालेलं बोलणं आणि त्यानंतर कधीच न भेटलेली तू मला आजही तशीच आठवतेस... मी तुला दोष देणार नाही. शेवटी तूही एक स्त्रीच आहेस. मग तुला आई-वडिलांची प्रतिष्ठा, समाजाने घालून दिलेली बंधनं याचं ओझं पेलावंच लागणार होतं. त्यामुळे तूही तुझ्या वडिलांची मर्जी राखण्यासाठी, त्यांच्या प्रतिष्ठेसाठी त्यांच्याच मनावर लग्न कर. प्रेमाचा इतिहास साक्षीला आहे.
आपल्यासारख्या कित्येक प्रेमी पाखरांचे जीव या जाती-धर्माने पायदळी तुडवले आहेत. मग आपण कसे त्यातून वाचू शकतो? तू तुझं मन मारून इतका विरह सहन केलास, संयम ठेवायला जमलं तुला. कदाचित ही शक्ती एक स्त्री म्हणूनच निसर्गाने दिली असेल तुला; पण मला ते जमत नाही गं. माझं मन आजही तुझ्या वाटेकडे पाहात असावं गाळतंय.
तुला आजही खूप बोलावं वाटतंय. तुझ्या हातात हात घालून फिरावं वाटतं. तू जो संयम तुझ्या मनावर ठेवलास तो मला जमत नाही बघ. मनालाही आता कळून राहिलंय की तू परत येणार नाहीस कधी. पण तरीही कुणाची चाहूल लागली की खडबडून त्या दिशेला बघावं. वाटतं की तू परत आली असशील आणि नंतर ते निराशेनं खूप रडतं; पण मला हसावं लागतं. या जगाच्या गर्दीत मनात दु:ख लपवावं लागतं. मीही एके दिवशी खूप रडेन. मनातला सगळाच दु:खाचा ज्वालामुखी उद्रेक पावेल. मी अगदी मनातून रडेन... लहान, निरागस मुलांप्रमाणे ओरडून रडेन... त्या दिवशी तुझं लग्न झालेलं असेल..