रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जानेवारी 2022 (12:39 IST)

गुळाची पोळी Gulachi Poli Recipe

गुळाची रोटी ही अत्यंत स्वादिष्ट पोळी असते जी मकर संक्रतीच्या निमित्ताने घरोघरी तयार बनवली जाते. या व्यतिरिक्त सामान्य दिवसातही ही पोळी बनवली जाऊ शकते परंतु गुळ गरम असल्यामुळे हिवाळ्यात गुळाची पोळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ही पोळी तयार करण्यासाठी फारसा वेळ द्यावा लागत नाही. होय तुम्हाला पटकन पोळी कशी तयार करायची याबद्दल जाणून घेयचे असेल तर नक्की रेसिपी वाचा-
 
साहित्य
अर्धा किलो गुळ किसलेला
अर्धा वाटी भाजलेल्या तिळाची पूड
अर्धी वाटी डाळीचे पीठ
एक लहान चमचा वेलची पूड
6 वाट्या गव्हाची कणिक
पाव वाटी कडकडीत तेलाचे मोहन
पीठ भाजण्यासाठी अर्धी वाटी तेल
आवडीप्रमाणे मीठ
 
डाळीचे पीठ तेलावर भाजून गार करुन घ्यावे. किसलेल्या गुळात डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून गुळ एकजीव करावा. 
आता कणिक चाळून घ्यावी. आणि त्यात तेलाचे मोहन, मीठ घालून घट्ट भिजवून घ्यावी. तेलाचा हात लावून ठेवावी. 
कणकेचे दोन गोळे घ्यावेत. एका गोळ्याएवढा गुळाचा गोळा घ्यावा. दोन्ही पाऱ्या छोट्या छोट्या लाटून घ्यावा. पहिल्या पारीवर गुळाची पारी आणि त्यावर पुन्हा कणकेची पारी ठेवावी. कडा दाबून पिठीवर पातळ पोळी लाटावी. 
पोळी चांगली खमंग भाजावी. तव्यावर तूपात भाजता येते किंवा कोरडी भाजून वरुन तुपाचा गोळा ठेवून देखील खाता येते.
विशेष टिपा: 
गुळाच्या पोळीसाठी तयार सारण 15-20 दिवसांपेक्षाही अधिक काळापर्यंत चांगलं राहतं.
पोळी हल्क्या हाताने लाटावी आणि कडेपर्यंत गुळ पसरलं पाहिजे याची खात्री करावी.
पोळी खमंग भाजावी नाहीतर गार झाल्यावर मऊ पडते. 
पोळी चिकटू नये म्हणून भाजताना तव्यावर थोडेसे तेल सोडू शकता.
पोळी तव्यावर फुटत असल्यास एक लहानसे फडके पाण्यात भिजवून तव्यावरून फिरवावं. याने दुसर्‍या पोळीला डाग पडत नाहीत.
गुळाच्या तयार पोळ्या देखील तीन-चार दिवस सहज टिकतात.