वास्तुशास्त्रात दिशेचे महत्त्व
वास्तुशास्त्राला वेदात स्थापत्य वेद मानण्यात आले आहे. यात अर्थातच वास्तूसंदर्भातील माहिती आहे. या वास्तू म्हणजे मोठमोठी घरे, राजमहाल, मंदिर, सार्वजनिक वास्तू किंवा आपले साधे घर होत. या वास्तू कशा बांधाव्या, दिशा कशा पाळाव्या, त्यात काय कोठे असावे याचे अगदी तपशीलवार वर्णन त्यात आहे, याशिवाय या वास्तूत रहाणार्या व्यक्तींचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी मुळात ती वास्तू कशी असावी याविषयीही त्यात मार्गदर्शन केले आहे. या वास्तूत आपल्याला आयुरारोग्य लाभून आपली वाटचाल यशाच्या दिशेने व्हावी हा यामागचा उद्देश आहे.
या लेखात घराच्या दिशा आणि त्याचा प्रभाव याविषयी माहिती देण्यात आली आहे. अवकाशात नऊ ग्रह असल्याचे वास्तुशास्त्र मानते आणि हे ग्रह वेगवेगळ्या दिशांचे प्रतिनिधित्व करतात. सूर्यः सितो भूमिसुतोऽदय राहुः शनिः शशीज्ञश्च बृहस्पतिश्चप्राच्यादितोदिक्षुविदिक्षुचापिदिशामधीशाः क्रमतः प्रदिष्टा ॥४९॥११॥ मुहूर्त चिंतामणि॥
पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे. या दिशेला असलेले घर उत्तम मानले जाते. कारण पूर्वेकडूनच सूर्यकिरण येतात. म्हणजेच घरात प्रकाश येतो. उत्साह आनंद आणि समृद्धीही येते. त्यामुळे या दिशेला घर असणार्यांना उत्तम आरोग्य, धन-धान्याची प्राप्ती होते. वास्तूत काही दोष असला तरीही घरात रहाणार्यांना त्याचा त्रास होत नाही.
आग्नेय दिशेचा स्वामी शुक्र आहे. भौतिक सुख आणि प्रगती या ग्रहामुळे होते. या दिशेनुसार वास्तू बांधल्यास पैसा, प्रसिद्धी, भौतिक सुख, इच्छा पूर्ण होतात. हे मिळविण्यासाठी विशेष त्रास सहन करावा लागत नाही. घरात या दिशेने घाण, केरकचरा, शौचालय असायला नको. ही जागा लक्ष्मीचीही मानली जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाण तेथे नको.
दक्षिण दिशा मंगळाची आहे. घराच्या कर्त्या पुरुषावर मंगळाचा अधिक प्रभाव असतो. त्याचे आरोग्य व प्रगती या दिशेवर अवलंबून आहे. नैरृत्य दिशा राहूची आहे. या दिशेच्या संदर्भात वास्तूमध्ये काही दोष असल्यास घरात कलहाला प्रारंभ होतो. वंशवृद्धीवरही त्याचा परिणाम होतो. पश्चिम दिशेचा स्वामी शनी आहे. त्याचा प्रभाव भाऊ, मुलगा, धान्यावर पडतो. प्रगतीवर शनीचा छाया असते. पश्चिमोत्तर दिशेला चंद्र असतो. मनाची चंचलता, मन आणि गती याचे प्रतीक आहे. नोकर, वाहन आणि मुलगा यांच्यावर या दिशेचा प्रभाव पडतो. उत्तर दिशेला बुधाचे राज्य असते. विजय, पैसा आणि प्रगती यावर या दिशेचा प्रभाव आहे. पूर्वोत्तर दिशेचा स्वामी गुरू आहे. हा भाग स्वच्छ असल्यास मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आनंद घरी नांदतो. पूर्व किंवा उत्तर दिशांची किरणे
ज्यांच्या घरात पडतात त्या घरात रहाणार्यांची निरंतर प्रगती होते. त्यांचे जीवनही सुखी असते.
थोडक्यात घराचा प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिशा वेगवेगळ्या बाबींशी निगडित आहे. त्यामुळे प्रत्येक भागाकडे सारखे लक्ष दिले पाहिजे.