गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 15 एप्रिल 2021 (09:47 IST)

वाटली डाळ : चैत्र महिन्यात ही डाळ करायची प्रथा

चैत्र महिन्यात चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीयेपर्यंत देवघरात छोटया पाळण्यात गौर विराजमान होते. महिनाभर लाडक्या माहेर वाशिणीच्या रूपाने चैत्र गौरीचे घरोघरी आगमन होते. पूजेतील अन्नपूर्णा आसनांवर बसवून तिची पूजा केली जाते. तिला नैवेद्य दाखवून जवळच्या सुवासिनींना हळदी-कुकुंवासाठी निमंत्रण दिले जाते. अन्नपूर्णा म्हणजेच साक्षात पार्वतीचं समोर आरस मांडून हळदी-कुकुंवाच्या समारंभात डाळीचं नैवेद्य दाखवलं जातं. या महिन्यात केल्या जाणार्‍या या डाळीला वेगळीच चव असते. जाणून घ्या सोपी कृती- 
 
साहित्य : 
दोन वाट्या चण्याची डाळ
पाव वाटी कैरीचा कीस 
पाच-सहा हिरव्या मिरच्या, 
तीन-चार सुक्या मिरच्या, 
मीठ चवीप्रमाणे, 
साखर चवीला, 
ओले किंवा सुके खोबरे, 
कोथिंबीर, 
फोडणीचे साहित्य.
 
कृती : 
डाळ करण्यापूर्वी चण्याची डाळ निवडून, चार तास आधी भिजत घालावी. 
त्यानंतर ती रोळीत उपसून घ्यावी व फडक्यावर पसरावी. 
नंतर ती मिक्सरमधून मिरच्यांसह वाटून घ्यावी. 
‍या मिश्रणात मीठ, साखर, कैरीचा कीस हे सर्व जिन्नस घालून ठेवावं.
अर्धी वाटी तेल कढईत गरम करुन त्यात मोहर्‍या, हिंग, जीरे खमंग फोडणी करावी.
त्यात डाळीचं मिश्रण घालून मंद आचेवर शिजवावी.
शिजल्यावर वरुन खोबरा बुरा व कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.