गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2019 (11:39 IST)

मी...???

मी १ मुलगी १ बहिण १ मैत्रीण १ पत्नी १ सुन १ जाऊ १ नणंद १ आई १ सासु १ आजी १ पणजी....सर्व काही झाले ...पण 'मी'च व्हायचं राहुन गेलं ..आयुष्य संपत आलं ...अन् आता वाटतयं स्वतःसाठी जगायचंच राहिलं...कळत नव्हतं तोपर्यंत आईने आजीने नटवलं...नंतर दादा अन् बाबांनी बंधन घातलं ...वयात आल्यावर माझ्या प्रत्येक गोष्टींचे अर्थ निघु लागले ..अन् नकळत माझे चारित्र्यच चर्चेत यायला लागले ...माझ्या फिरण्या वागण्या बोलण्या हसण्या वर सोईस्कर रित्या बंधन आले...एका मिञाची मैत्रीण होतानाही समाजाने आडवे घातले ...अन् आता काय शिक्षण झाले म्हणून काका बाबा स्थळ बघायला लागले...नोकरी ? चा प्रश्न मांडायला गेले तर म्हणे नोकरी आता कशी करणार ...सासरच्यांना विचारुनच करावी लागणार ...बाजारात वस्तू दाखविल्याप्रमाणे १० वेळा माझाही दाखविण्याचा कार्यक्रम झाला ...प्रश्नांचं भांडार अन् अपेक्षांचा ढिग समोर माझ्या आला ..त्याचा हसत हसत स्विकारही केला साथीदाराकडे बघुन...नंतर त्याचे फोन त्याची मर्जी सुरु झाली ...मी स्वत्व अर्पण केल्यावर त्यानेही मला खुप अश्वासने दिली ...नकळत मी एका संसार नावाच्या नव्या विश्वात ढकलले गेले ...अन् पुढचे आयुष्य जणु मृगजळच झाले ...घर नवरा सासु सासरे यांच्यात गुंतले...छोट्या छोट्या गोष्टी येत नाहीत म्हणून बोलणे टोमणेही ऐकले...माहेरी नाही सांगितले वाईट वाटेल म्हणून ...हसतमुख राहिले नेहमी दुःख लपवून ...अन् अचानक माझ्यावर  कोडकौतुकाचा वर्षाव झाला सुरू ...कारण माझ्यामुळे येणार होतं घरात १ लेकरु ...मुलगा की मुलगी चर्चा झाली सुरू ....अन् खरचं मलाही कळत नव्हते काय काय करु...विस्कटलेल्या मनाने पुन्हा एकदा उभारी घेतली अन् कोमेजलेल्या फांदीला पुन्हा नवी पालवी फुटली..नऊ महिने सरले..अन् त्या निष्पाप जिवाकडे बघुन मी भरुन पावले...आई असे नवे नाव मला मिळाले ...त्या छोटयाश्या नावा सोबतच खुप मोठी जबाबदारी माझ्यावर आली...आनंद मानत राहिले नेहमी मुलांच्या आनंदात..वेगळीच धांदल उडु लागली माझी घर सांभाळण्यात ...आतापर्यंत साठवलेल्या स्वप्नांना गच्च गाठ मारली ..अन् मुलांसाठी पै पै साठवली....शिक्षण झाले भरपुर तशी नोकरीही मिळाली दोन्ही मुलांना ...आई वडिलांसह सोडून गेले देशाला..मधुन मधुन येत होते भेटी गाठी घेत होते ...लग्न तुम्ही जमवा म्हणाले तेच काय कमी होते ...लग्न झाले दोघांचे तशी सासुही झाले...मुलांपेक्षा जास्त आता नातवांची वाट पाहत राहिले ...उतारवयात आता त्यांच्याच आधार वाटु लागला ...अन् दुधात साखर म्हणजे १नातु माझा भारतात सेटल झाला...पुन्हा एकदा मन माझे त्याच्यात रमले...आता त्याचे लग्न झाले ...नातसुनेचे पाऊल घराला लागले ...मन आनंदाने भरुन गेले...अन् कवळी बसवलेल्या बोळक्याला हासु आले...अपेक्षांचा आलेख उंचावत होता...अन् मला पणतीचा चेहरा पहायचा होता ...ती ही इच्छा माझी पुर्ण झाली..घरात १ गोंडस पणती आली...पुन्हा एकदा मीही तिच्यासोबत बालपणात गेले..अन् आता मात्र सर्वजण माझ्या मरणाची वाट पाहू लागले ...तेंव्हा पानावलेल्या डोळ्यांनी मनात घर केलं...अन् सगळं काही झालं असताना उगाच काही तरी बाकी असल्यासारखं वाटु लागलं...संपूर्ण आयुष्याचा आढावा मी घेतला आणि लक्षात आले की...'मी'च व्हायचं  राहुन गेलं ...सर्वांची लाडकी झाले पण स्वतःची झालेच नाही कधी ...नेहमी दुसऱ्यांचा विचार केला स्वतःच्या आधी...हे सर्व लक्षात यायला ९० वर्षांचा काळ लोटला होता ...पण आता मात्र माझ्या मनाने ठाम निर्णय घेतला होता...कपाट उघडून माझ्या आवडीचा स्लिवजलेस ड्रेस घातला...मेकअप मस्त करुन तयार झाले मनसोक्त फिरायला ...कुठे जायचयं असं काहीच ठरलं नव्हतं ...देवाला मात्र सारं काही ठाऊक होतं ...त्यानेही मस्त गेम खेळला माझ्याशी ...पर्स घेऊन बाहेर आले तर यमराज उभा होता दाराशी ...!!
-vivek