शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (15:16 IST)

मुंबईतून २ व्यापाऱ्यांना अटक

तब्बल 22 कोटी रुपयांचे जीएसटी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट मुंबई झोनच्या ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले आहे. याप्रकरणी दोन व्यापाऱ्यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची आणखी कसून चौकशी सुरू असून आणखी मोठी कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
 
सेंट्रल इंटेलिजेंस युनिट, मुंबई सीजीएसटी झोन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दोन व्यावसायिकांना अटक केली आहे जे वडील आणि मुलगा आहेत. मेसर्स शाह एंटरप्रायझेस आणि मेसर्स यूएस एंटरप्रायझेस या दोन वेगळ्या फर्मचे ॲाफिस कांदिवली पश्चिम, मुंबई येथे आहे. दोन्ही कंपन्या फेरस वेस्ट आणि भंगार इत्यादींच्या व्यापारासाठी जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहेत.
 
11.80 कोटी रुपये आणि 10.23 कोटी रुपयांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेउन त्यांना मंजूर करण्याच्या प्रक्रियेत या व्यक्ती गुंतल्या होत्या. सीजीएसटी कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा प्राप्त न करता बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट हे बनावट संस्थांकडून मिळवून ईतर नेटवर्कच्या संस्थांना देत होत्या. या दोघांना सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत कलम 132(1)(b) आणि (c) चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करून मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड, मुंबई यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
 
प्रामाणिक करदात्यांना अनुचित स्पर्धा निर्माण करणाऱ्या आणि योग्य कर न भरून फसवणूक करणाऱ्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट नेटवर्कचा बंदोबस्त करण्यासाठी सीजीएसटी मुंबई झोनने ही कारवाई सुरू केली होती. येत्या काही दिवसांत फसवणूक करणाऱ्या आणि करचोरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम विभाग अधिक तीव्र करणार आहे अशी माहिती ठाणे आयुक्तालयाचे सीजीएसटी आणि उत्पादन शुल्क आयुक्त राजन चौधरी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.