1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 6 मे 2021 (18:04 IST)

बाप्परे, मुंबईत युरेनियमचा सात किलो साठा जप्त

अणुबॉम्बसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत ज्वालाग्राही अशा युरेनियमचा मोठा साठा मुंबईत जप्त करण्यात आला आहे.  सात किलो युरेनियमसहीत मुंबईमधून दोघांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या युरेनियम किंमत 21 कोटी रुपये आहे. महाराष्ट्र एटीएसने  ही कारवाई केली आहे. 
 
महाराष्ट्र एटीएसने स्फोटके बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. जिगर पांड्या आणि अबू ताहिर अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनाही 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाण्यात राहणारा जिगर पांड्या हा युरेनियम विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीसच्या नागपाडा युनिटने सापळा रचून जिगरला अटक केली. पांड्या तसेच ताहिर या दोघांवर अॅटोमिक एनर्जी अॅक्ट 1962 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान, मानखुर्द येथे राहणाऱ्या अबू ताहिरकडून त्याला युरेनियम मिळाले असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे. त्यानंतर लगेचच पोलिसांनी अबू ताहिरला ताब्यात घेतले. पोलिसांनी जप्त केलेला हा युरेनियमचा साठा तपासणीसाठी भाभा अणुशक्ती केंद्रात पाठविण्यात आला होता.