मुंबईत पुढील 3 दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी
Mumabi Rain दिवसभराच्या विश्रांतीनंतर मंगळवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आणि शहरातील काही भागात संततधार पाऊस झाला. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मुंबई प्रादेशिक केंद्राने पुढील तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईची लाईफलाइन मानल्या जाणाऱ्या लोकल गाड्या मंगळवारी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गांवर सामान्यपणे धावत होत्या. मात्र रेल्वे सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असल्याचा दावा काही प्रवाशांनी केला.
रस्त्यांवर पाणी साचल्याचे वृत्त नाही
पावसामुळे काही ठिकाणी वाहनांची हालचाल मंदावली, परंतु एकूणच कुठेही मोठी वाहतूक कोंडी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सायन, माटुंगा कुर्ला, चेंबूर, अंधेरी आणि परळसह शहर आणि उपनगरांच्या बहुतांश भागात सोमवारी रात्रीपासून मध्यम ते जोरदार पाऊस झाला. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की त्यांची बस सेवा सामान्य होती आणि कोणताही मार्ग वळवला गेला नाही.
बुधवारी विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल
प्रादेशिक हवामान केंद्राने बुधवार ते शुक्रवार मुंबईसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. बुधवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.