शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2022 (09:49 IST)

गोवा राज्यात 8 डिसेंबरपासून पावसाची शक्यता, बंगाल खाडीतील कमी दाबाच्या पट्टय़ाचा परिणाम

rain
पणजी :बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्याचे चक्रिवादळात रुपांतर होण्याची शक्यता असून त्यामुळे गोव्यात येत्या 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर या दरम्यान पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
 
गोव्यात काही दिवसांपूर्वी कडाक्याची थंडी पडली. त्यानंतर पुन्हा हवामानात बदल झाल्याने गेले आठ दिवस राज्यात उकाडा निर्माण झाला. शनिवारपासून तापमान वाढू लागलेले आहे. पुढील दोन दिवसात जनतेला असह्य उकाडय़ाला सामोरे जावे लागेल. अरबी समुद्रात देखील पावसाळी ढग मोठय़ा प्रमाणात जमले आहेत. त्यांचे कमी दाबाच्या पट्टय़ात रुपांतर झालेले नाही. हवामान खात्याने तशी शक्यता फेटाळली आहे. तथापि, काही तज्ञांच्या मते अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे चक्रिवादळात रुपांतर होऊ शकते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोव्यात येणार आहेत. मोपा विमानतळावर भव्य शामियाना उभारुन तिथे उद्घाटनाचा समारंभ होईल. उद्घाटनानंतर पंतप्रधान जनतेला उद्देशून आपले विचार मांडतील. मात्र गोव्यात दि. 8 पासून 12 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता असल्याने त्याचा कार्यक्रमावर परिणाम होईल की काय? असा अंदाज आहे.
 
दरम्यान, कांपाल मैदानावर देखील दि. 8 पासून जागतिक आयुर्वेद परिषद होणार असून तिथे देखील पावसाची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor