सहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार, एकाला अटक
इंदोरमध्ये एका सहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. सदर मुलीचा मृतदेह एका इमारतीच्या तळघरात सापडला असून या प्रकरणी पोलिसांनी सुनील भील (२१) नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
पीडित मुलगी व तिचे आई वडील सिंदोरा भागातील फुटपाथवर राहतात. मुलीच्या वडिलांचा फुग्यांचा व्यवसाय होता. सुनील देखील त्याच फुटपाथवर राहायचा. तो पीडित मुलीच्या वडिलांचा चांगला मित्र होता. शुक्रवारी रात्री मुलीचे आई वडील फुटपाथवर झोपलेले असताना सुनीलने मुलीचे अपहण केले. त्यानंतर तो झोपलेल्या त्या मुलीला घेऊन जवळच असलेल्या एका इमारतीच्या तळघरात गेला आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला जमिनीवर जोरात आपटून तिची हत्या केली.
सकाळी मुलीचे आई वडील मुलीला शोधू लागले तेव्हा सुनील देखील त्यांच्यासोबत शोधण्याचे नाटक करत होता. याप्रकरणी पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही तपासले असता त्यात मुलीच्या पालकांचे सांत्वन करणारा सुनीलच त्या मुलीला घेऊन इमारतीत आल्याचे पोलिसांना दिसले.