शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (15:02 IST)

व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक

मुंबई : आयसीआयसीआय बँकेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने आज व्हिडिओकॉन कंपनीचे मालक वेणुगोपाल धूत यांना अटक केली आहे. या प्रकरणी सीबीआयने मागील आठवड्यातच आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
आर्थिक नियमितता आणि कर्ज प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्यानंतर वेणूगोपाल धूत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज सकाळी मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. धूत यांना थोड्याच वेळात विशेष सीबीआय कोर्टामध्ये हजर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सीबीआय कोठडीमध्ये असलेले चंदा कोचर आणि दीपक कोचर यांचा रिमांड आज संपणार आहे. त्यांना देखील सीबीआय आज कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणामध्ये तिन्ही आरोपींना एकत्रपणे हजर करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
नेमके प्रकरण काय?
२००९ ते २०११ दरम्यान आयसीआयसीआय बँकेने व्हीडिओकॉन समूहाला सुमारे १८७५ कोटींचे कर्ज दिले होते. परंतु या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत प्रारंभी बँकेने कोचर यांची बाजू घेतली होती. परंतु सीबीआयने तपास सुरू केल्यावर बँकेने भूमिका बदलली आणि जून २०१८ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.
 
या प्रकरणामुळे चंदा कोचर यांना बँकेचे सीईओपद सोडावे लागले होते. बँकेच्यावतीने देण्यात आलेल्या नियमबाह्य कर्जामुळे बँकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे, असे सांगण्यात येते. याप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर आणि व्हीडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआयने २२ जानेवारी २०१९ रोजी गुन्हा नोंदविला होता.
Edited By- Ratnadeep Ranshoor