मातृभाषा व मातृभूमीला विसरू नका : नायडू
सांस्कृतिकदृष्ट्या भारत देश पुढारलेला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा गौरव करण्याची भारताची परंपरा आहे. आयुष्यात कितीही मोठे झालो तरी, मातृभूमीला विसरू नका, मातृभाषेवर प्रेम करा, मम्मी -डॅडी न म्हणता आपल्या मातृभाषेतच आई-वडिलांशी आदराने बोलावे, असे मार्गदर्शन उपराष्ट्रपती ए. व्यंकय्या नायडू यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी त्यांनी मला मराठी खूप आवडते याचा आवर्जून उल्लेख केला. तसेच पदवी स्वीकारणार्यात जास्त विद्यार्थिनी असल्यामुळे मला आनंद होत आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचा नववा पदवीदान समारंभ गुरुवारी पिंपरी, संत तुकारानगर येथे पार पडला. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, डॉ. डी.वाय. विद्यापीठाचे कुलपती पी.डी. पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपती ए. व्यंकय्या नायडू यांनी ज्येष्ठ संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, पारनेर येथील गुरू सेवा मंडळाचे अध्यक्ष अॅड. विष्णू पारनेरकर यांना 'डॉक्टर ऑफ लेटर्स' आणि केआयएसएसचे संस्थापक प्रा. अच्युत समंथा यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी बहाल केली.
भारताकडील आध्यात्किता ही भारताला जागतिक स्तरावर ओळख निर्माण करुन देते. यातून संकटांचा सामना करण्याची ऊर्जा मिळते. यातूनच अॅलोपॅथी, नॅचरोपॅथी यासारखे वैद्यकशास्त्र निर्माण झाले आहे. तसेच आधुनिक वैद्यकशास्त्रातील विविध शाखांना अध्यात्माची गरज भासत आहे, असे सांगत उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, 21 व्या शतकातील आव्हाने पेलण्याची गुणवत्ता नव्या पिढीकडे आहे.
पदवी मिळविणे म्हणजे ज्ञान मिळविणे. शिक्षण घेताना वाचलेला प्रत्येक शब्द आपल्या ज्ञानात भर घालतो. आपल्या कर्तृत्वातून समाजहित आणि राष्ट्रहित जपण्याचा प्रयत्न करावा. इंग्रजांनी त्यांची शैक्षणिक पद्धत आपल्यावर लादली तसेच त्यांनी भारतीयांची वैचारिक क्षमता देखील खुंटविली आहे. त्यामुळे भारताला आपला विकास करायचा असेल तर विचारांच्या कक्षा विस्तारायला हव्यात. इंग्रजी बोलणे चुकीचे नाही. पण, इंग्रजी बोलण्याच्या नादात आपण आपली मातृभाषाविसरत नाही ना, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे, असेही ते म्हणाले.