रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (16:46 IST)

2 सख्ख्या भावांची जात वेगवेगळी, एक भाऊ कुणबी दुसरा मराठा

राज्यात मराठा आरक्षणावरून सध्या सगळीकडेच गदारोळ सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांसोबत अनेकजण आंदोलनात सहभागी आहे. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश ओबीसीत करण्याची मागणी केली जात असताना मराठा आणि कुणबी हे एकच आहेत यासंदर्भातील अनेक पुरावे शिंदे समितीला मिळाले आहे. मात्र या कुणबीमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचे समोर आलंय. 
 
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे या गावात दोन सख्ख्या भावांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीच्या वेगवेगळ्या नोंदी आढळून आल्या आहेत. एकाच्या प्रमाणपत्रावर कुणबी तर दुसऱ्या भावाच्या प्रमाणपत्रावर हिंदू मराठा अशी नोंद आढळली आहे. सख्ख्या भावांच्या दाखल्यावर वेगवेगळ्या नोंदी असल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर असे अनेक प्रकार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या शिंदे समितीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
 
आंबेगाव तालुक्यातील फक्त एका गावातच 1120 नोंदी आढळल्या आहेत. शाळेकडून सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. जना कृष्णाजी आंबटकर यांच्या दाखल्यावर कुणबी आणि त्यांचा भाऊ सुदाम कृष्णाजी आंबटकर यांच्या दाखल्यावर हिंदू मराठा अशी नोंद आहे.
 
कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाल्यानंतर अनेक ठिकाणी तरुणांनी ते जाळून देखील टाकले आहे. मात्र आंबेगाव तालुक्यातील दोन भावंडांची प्रमाणपत्र व्हायरल झाल्याने पुन्हा कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.