मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (09:11 IST)

मूळच्या पुण्याच्या IPS ऑफिसरची मृत्यूशी यशस्वी झुंज’,सीमा संघर्षात लागल्या होत्या गोळ्या

आसाम-मिझोराम सीमेवर 26 जुलैला झालेल्या हिंसाचारात  आसाम पोलीस दलाचे 6 जवान मृत्यूमुखी पडले होते. तर 45 हून अधिक जण जखमी झाले होते.या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. काछरचे पोलीस अधिक्षक वैभव चंद्रकांत निंबाळकर यांना हिंसाचारात गोळ्या लागल्या होत्या.त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.आता त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे.
 
वैभव निंबाळकर यांच्या पत्नी अनुजा निंबाळकर यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.फोटोमध्ये वैभव निंबाळक हे हॉस्पिटलमध्ये वॉकर घेऊन चालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत.त्यामुळे पुण्यासह महाराष्ट्रातील जनतेत आनंद व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राच्या या वीराने गोळ्या झेलून मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे. पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर हे सध्या मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

डॉक्टरांनीही निंबाळकर यांच्या प्रकृतीतील या सुधारणेबाबत समाधान व्यक्त केलं असून त्यांच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होत असल्याचं म्हटले आहे.

वैभव निंबाळकर हे मुळचे पुणे जिल्ह्यातील (Pune district) इंदापूरचे (Indapur) रहिवासी आहेत. ते 2009 च्या IPS बॅचचे अधिकारी असून, भारतीय पोलीस सेवेत निवड झालेले ते सर्वात तरुण अधिकारी आहेत. आसाम केडर प्राप्त झाल्यापासून ते आसाममध्ये कार्यरत आहेत.

आसाम-मिझोराम यांच्यातील सीमावादावरुन चकमक उडाली होती. यामध्ये निंबाळकर यांना गोळी लागली होती. त्यांच्या ओटीपोटात आणि मांडीच्या हाडाला गोळी लागली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं होतं. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आधी सिलचर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सिलचर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हेलिकॉप्टर अ‍ॅम्बुलन्सच्या सहाय्याने मुंबईला आणण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 17-18 दिवस उपचार केल्यानंतर त्यांच्या जखमा बऱ्या होत असून ते हळूहळू फिरू लागले आहेत.