शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (17:39 IST)

मला न विचारताच पाणीपुरीचं पार्सल का आणलं? या वरून पत्नीची आत्महत्या

संसारात पती-पत्नीचे कशावरून खटके उडतील याचा नेम नाही. मग अशाच छोट्या मोठ्या कुरबूरीतून कधी कधी धक्कादायक घटना घडतात. अशीच एक घटना पुण्यातील आंबेगाव पठार येथे घडली आहे. प्रतीक्षा गहिनाथ सरवदे (वय 23 रा. आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तर गहिनाथ सरवदे (वय 33) असं अटक केलेल्या पतीचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहिनाथ आणि प्रतीक्षा यांचा विवाह फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता. गहिनीनाथ हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. त्यांना एक मुलगा आहे. दरम्यान, गहिनीनाथ हा उच्चशिक्षीत असून , तो एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो. पत्नी गावी राहत होती. तर गहिनीनाथ हा नोकरीनिमित्त पुण्यात राहत होता. त्यावरून त्यांच्यात वाद होत असत. असाच किरकोळ वाद मागील आठवड्यात दोघांमध्ये झाला. गहिनाथ सरवदे हे कामावरून येताना पाणीपुरीचे पार्सल घेऊन आले. 'मला न विचारता पाणीपुरी का आणली' यावरून प्रतीक्षा यांनी गहिनाथ यांच्यासोबत वाद घातला.
 
त्यानंतर पुढील दोन दिवस गहिनाथ कामावर जाताना डब्बा घेऊन जात नव्हते. या दोघांमध्ये त्या दोन दिवसात देखील किरकोळ वाद सुरूच होते. यातून प्रतीक्षा यांनी शनिवारी विषारी द्रव्य प्राशन केलं. विष पिल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, प्रतीक्षा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पती गहिनाथ सरवदे यांना अटक केली असून, तपास सुरू असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले.