गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (10:28 IST)

Rajya Sabha: 6 जागांसाठी मतदान सुरू, 'MIMची 2 मतं शिवसेनेला जाणार'

voting
राज्यसभेच्या 6 जागांसाठी विधानभवनात मतदान सुरू झालं आहे. पहिल्या तासात साठ आमदारांनी मतदान केलं असून मतदानाची प्रक्रिया सुरू आहे.
 
पण ऐनवेळी कॉंग्रेसने त्यांची पहिल्या पसंतीची 44 मतं ही त्यांच्याच उमेदवाराला देण्याचं घोषित केल्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
शिवसेना आमदार हॉटेलमधून विधानसभेत चालत गेले आहेत.
 
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक सध्या गंभीररित्या आजारी आहेत. त्यांना व्हीलचेअरवरून विधानभवनात आणण्यात आलं आहे.
 
महाराष्ट्रातून एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांनी अर्ज भरले आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार मैदानात आहेत.
 
राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपासून मतमोजणी होणार आहे.
 
"आज 7 वाजता चित्र स्पष्ट होईल, महाविकास आघाडीचे ४ उमेदवार निवडून येतील. भाजपचेसुद्धा 2 उमेदवार निवडून येतील. चूरस वगैरे काही नाही. आम्हाला 169 आमदारांचा पाठिंबा आहे. आजच्या निवडणुकीत तुम्हीला हे आकडे स्पष्ट दिसतील," असं शिवसेना उमेदवार संजय राऊत यांनी म्हटलंय.
 
प्रफुल्ल पटेलांसाठी राष्ट्रवादीनं कोटा वाढवल्याचा बातम्या विरोधीपक्षांकडून पेरल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजिबात नाराज नाहीत. माझी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे, असं राऊत पुढे म्हणाले आहेत.