रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शुक्रवार, 27 मे 2016 (09:13 IST)

कपालेश्वर मंदिरात तृप्ती देसाईंना धक्काबुक्की

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी काल कपालेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता तिथे जोरदार चकमक उडाली. पोलीस व भाविकांनी देसाई यांना गाभार्‍याच्या बाहेरच रोखले. यावेळी गर्दीतून देसाई यांच्या दिशेने चप्पलफेकही झाली. दरम्यान, देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
कपालेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात पुरुषांनाही प्रवेशबंदी आहे. त्या परंपरेवर बोट ठेवत तृप्ती देसाई यांना आधीही गाभाराप्रवेश नाकारण्यात आला होता. देसाई यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दुसर्‍यांदा मंदिरात प्रवेश करून गाभार्‍यात जाणाचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी मंदिरात मोठय़ा संख्येने भाविक हजर होते त्यांनीही देसाई यांना तीव्र विरोध केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी मंदिर परिसरात ‘बम बम भोले’अशा घोषणाही दिल्या जात होत्या. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी देसाई यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या सर्व कार्यकत्र्यांना ताब्यात घेतले.
 
दरम्यान, कपालेश्वर मंदिरात पुजार्‍यांची दादागिरी सुरू आहे. मी खालच्या जातीची असल्याचे सांगून या पुजार्‍यांनी मला विरोध केला आहे. त्यामुळे जसे महिलांना प्रवेश मिळावा म्हणून हे आंदोलन आहे तसेच जातीभेद संपवण्यासाठीही हे आंदोलन आहे, अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली.