तळेगाव प्रकरण: 117 जणांना अटक, 7 व्हॉट्सअॅप अॅडमिनवर गुन्हे दाखल
तळेगावात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराविरोधात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलीसांनी 117 जणांना अटक केली आहे. तर नाशिक शहर आणि ग्रामीण असे दोघांना मिळून एकूण 53 गुन्हे दाखल केले आहे. याशिवाय सायबर क्राईम अंतर्गत 7 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअॅप अॅडमिन आणि फेसबुक वापरणाऱ्याचाही समावेश आहे. याशिवाय हिंसाचारात पोलिसांच्या वाहनासोबतच सुमारे 2 कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल आणि पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळ असलेल्या तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर अनेक ठिकाणी हिंसक घटना घटल्या. दगडफेक आणि बस जाळण्यात आल्या. यासगळ्याप्रकारानंतर पोलीसांनी कडक कारवाई करत शांतता आणि सुव्यवस्था कायम केली आहे. सध्या नाशिकमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. शाळा आणि बससेवा गुरुवारपासून सुरळीतपणे सुरु आहे. मात्र मोबाईल इंटरनेट सेवा अजून सुरु करण्यात आलेली नाही. सदरची इंटरनेट सेवा शनिवारपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे संचारबंदी सुरु असलेल्या गावांमधील संचारबंदी शनिवारपासून शिथील करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नाशिकमधील तणाव बघता अफवा आणि स्वतः तर्क वितर्क लावून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शोध नाशिक पोलिसांनी घेतला आहे.विविध कलमांतर्गत अफवा पसरवणे, दंगल पसरवणे, समजात अशांतता निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे याअंतर्गत 7 अॅंडमीनवर गुन्हे पोलीस यंत्रणेने दाखल केले आहेत. याबाबत जिल्हा सायबर सेल अफवा पसरवणाऱ्यावर लक्ष ठेऊन होता. समाजात अशांतता निर्माण करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगार दोषी आढळतील त्यांना तीन वर्षाची शिक्षा आणि रोख रकमेचा दंड अशी शिक्षा आहे.
एसटी महामंडळाचे सर्वाधिक नुकसान
नाशिकमधील तणावामध्ये सर्वाधिक नुकसान एसटी महामंडळाचे झाले आहे. या आंदोलनात तब्बल १९ एसटी बस जाळल्या. तर एसटी सेवा बंद राहिल्यामुळे महामंडळाला ३ कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे.
अॅट्रॉसीटीचे फक्त ६ गुन्हे दाखल
शहरामध्ये आंदोलनादरम्यान १०० पेक्षा अधिक अॅळट्रॉसीटीचे गुन्हे दाखल करण्यात आले अशी चर्चा होती. ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. काही गावांमध्ये ठरावीक घरांना लक्ष करून हल्ले करण्यात आले आहेत. त्या नागरीकांच्या तक्रारीनुसारच त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अॅमट्रॉसीटीचे अवघे ६ गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विनॉय चौबे यांनी दिली आहे.